करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची गळीत हंगाम 2022 – 23 मधील 4- पंधरवड्याची ऊस बिलाची रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. सदरची देय असलेली ऊस बिलाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी संचालक मंडळांनी प्रयत्न करून कर्ज मंजूर करून घेतलेले आहे. सदर कर्जाचे वितरण बँकेच्या सी.डी. रेसिओ (क्रेडिट डिपॉझिट रेसिओ)वाढवून औद्योगिक कर्जाची मर्यादा या आर्थिक वर्षात समाप्त झाल्यामुळे या मंजूर झालेल्या कर्जाचे वितरण एप्रिलमध्ये होईल. कर्ज वितरण झाले नंतर तात्काळ ऊस बीलाची सर्व थकीत रक्कम एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल. या गळीत हंगामामध्ये ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेअभावी अपेक्षेपेक्षा कमी झालेले ऊस गाळप देशांतर्गत उतरलेले साखरेचे दर व कारखान्यांमध्ये केलेली नवीन सुधारणा यामुळे ऊस बिलाची रक्कम वेळेत अदा करण्यास विलंब झालेला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी दिली. यावेळी संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. आर्थिक अडचणीमुळे ऊस बिल देण्यास विलंब झालेला आहे त्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत, असल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले. व सर्व सभासदांनी आजवर आमच्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल ऋण व्यक्त करून येणाऱ्या गळीत हंगामासाठी माननीय संचालक मंडळाने योग्य नियोजन केलेले असून या पुढील काळात ऊस बिलाची रक्कम थकणार नाही .याची आम्ही दक्षता घेत आहोत. त्यामुळे या पुढील काळातही सर्वांनी अशाच पद्धतीचा विश्वास माननीय संचालक मंडळावर ठेवण्याचे आवाहन चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले आहे.