सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील प्रमोद झिंजाडे हे नाव मागील वर्षभरात महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांतील लहान-मोठ्या गावांत बऱ्यापैकी माहीत झाले आहे. त्याचे कारण, विधवाप्रथा निर्मूलनाच्या संदर्भात त्यांनी केवळ पहिले पाऊल उचलले असे नव्हे तर सातत्याने वर्षभर त्यासंदर्भात चळवळच आकाराला आणली आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींनी विधवाप्रथा निर्मूलनाचे ठराव केले आहेत. प्रमोद झिंजाडे यांना या कामगिरीसाठी या वर्षीचा महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांच्या वतीने दिला जाणारा एक लाख रुपयांचा विशेष कार्यपुरस्कार नुकताच दिला आहे. विधवाप्रथा निर्मूलनाच्या संदर्भातील त्यांच्या कामाचा प्रारंभ सांगणारा लेख साधनाच्या मागील अंकात प्रसिद्ध झाला होता. त्यांचा त्यापूर्वीचा कालखंड या लेखातून समजून घेता येईल.
________________________________
माझा जन्म 1 जून 1957 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी झाला. माझं सहावीपर्यंतचं प्राथमिक शिक्षण हे कोथरे या गावी झालं. शिक्षकाबरोबर वाद झाल्याने माझ्या वडिलांनी मला जामखेडजवळीलच हाळगाव या गावातल्या शाळेत सातवीत घातलं. तिथं मला खूप चांगले शिक्षक भेटले. त्यानंतर आठवी ते जुनी अकरावी इथपर्यंतचं शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, करमाळा या ठिकाणी झालं. त्यानंतर मी दोन वर्षं अहमदनगरमधील प्रगत कला महाविद्यालय, तारकपूर या ठिकाणी ‘आर्ट टीचर डिप्लोमा’ हा चित्रकलेचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण केला. मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. कधी कोळसा घेऊन तर कधी पेन्सिल घेऊन त्या काळातील जुन्या घरांवर चित्र काढायचो. तेव्हा मला जे शिक्षक भेटले होते त्यांनीच सांगितलं होतं की, ‘तुझी चित्रकला चांगली आहे तर तू हा विषय ठेव.’
माझ्या वडिलांचे नाव नामदेव आणि आईचे नाव हरिबाई. वडिलांना पहिल्यापासून जुगाराचा नाद होता. जमिनीकडं त्यांनी कधी बघितलंच नाही. आई आणि आम्हीच लहानपणी कामं करायचो. वडील त्यांचे जुगारातून आलेले पैसे जुगारीतच घालवायचे. माझ्या मामांनी मात्र आम्हांला अन्नधान्य सगळं पुरवलं. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी दोन वर्षे नोकरी केली. एक वर्ष परांड्यातील तांदुळवाडीत आणि नंतर खोपोलीतील जनता विद्यालयात चित्रकलेचा शिक्षक म्हणून.
माझे वडील शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. आजूबाजूला कुठं कोणावर अन्याय झाला तर आमच्या घरात नेहमी चर्चा व्हायची. मग आलेल्या लोकांसाठी चटई टाक, चहा दे, कपबशा धू- अशी कामं मी करायचो. ते कार्यकर्ते नव्हते, पण त्यांचे मित्र पूर्ण वेळ कार्यकर्ते असल्याने त्यांची ऊठबस असायची. त्यामुळं त्यांचा विचार मला चांगला वाटायचा, माझे आजोबा पोलिस पाटील होते. पूर्वी दलितांसाठी वेगळ्या कपबशा वापरल्या जायच्या. मी म्हणायचो, ‘‘आपण आणि ते सारखेच आहोत तर कशाला वेगळ्या कपबशा वापरायच्या?’’ माझ्या आजोबांना ते आवडायचं नाही.
1979 मध्ये माझं लग्न झालं. माझ्या बायकोचं नाव अलका. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिक्षणही माझ्यापेक्षा जास्त. आमच्या समाजात सर्वांत जास्त शिकलेली मुलगी. ती जास्त शिकल्यामुळं तिच्या बरोबर कुणी लग्न करायला तयार होत नव्हतं. वडील आणि मी मुलगी बघून आलो आणि लग्न झालं. वयाचा फरक इथं महत्त्वाचा नसतो तर समजूतदारपणा महत्त्वाचा असतो, असं मी मानतो.
अहमदनगरमधील चित्रकला महाविद्यालयात असताना शिल्प शिकवायचं म्हणून एकदा आमच्याकडून शाडू मातीसाठी पन्नास रूपये घेतले होते. मात्र आम्हांला त्यांनी शाडू मातीच दिली नाही आणि शिकवलंही नाही. मग मी त्या प्राध्यापकांना भेटून सांगितलं, ‘‘तुम्ही हे जे केले करताय ते बरोबर नाही.’’ मग त्यांनी मला प्राचार्यांच्या खोलीत नेऊन भलताच दम दिला. मीपण माघार घेणाऱ्यांपैकी नव्हतो. मग मी तेव्हाचे कला संचालक बाबुराव सडवेलकर यांना एक पंधरा पैशांचं पोस्टकार्ड लिहून पाठवलं. त्या पत्रात माझं सगळं म्हणणं मांडलं होतं आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी विनंतीही केली होती. त्यानंतर एक दिवस ते अचानक महाविद्यालयात आले. मुलांच्या घोळक्यातून मला त्यांनी बोलावून घेतलं. तिथल्या शिक्षकांनाही बोलावून घेतलं. त्यांच्याशी बोलून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शाडू माती आणून आम्हांला शिकवायलाही सुरुवात झाली.
खोपोलीत मी चित्रकलेचा शिक्षक असताना एका शिक्षकावर अन्याय झाला म्हणून मी त्यांची बाजू घेऊन तिथल्या मॅनेजमेंटला काही प्रश्न विचारले होते. त्याचं त्यांना खूप वाईट वाटलं होतं. मग ते म्हणाले, ‘‘झिंजाडे हा माणूस चांगला आहे, मात्र पुढं आपल्याला घातक ठरेल.’’ मला ते म्हणाले, ‘‘पुढच्या वर्षी आम्ही तुम्हांला इथं ठेवणार नाही. म्हणून तुम्ही दुसरीकडं अर्ज करा आणि नोकरी बघा.’’ तिथला क्लार्क मला म्हणाला, ‘‘तुम्हांला काही कळतं का नाही? कुणाची हिम्मत नाही होत त्या चेअरमनला असं बोलायची. ते बी.एन. पाटील राज्यमंत्री आहेत.’’ मी म्हटलं, ‘‘असू दे. ते आपल्यातूनच निवडून येऊन मंत्री झालेत.’’ म्हणजे खरं बोललं की रागच येतो आपला.
आमच्या गावामध्ये रेशन दुकानात माल मिळत नव्हता. त्या वेळी गहू, तांदूळ, डालडा, साबण, रॉकेलसहित सगळ्या गोष्टी रेशनवर असायच्या. मी पिशवी घेऊन रांगेत उभा होतो. एकदा माल असतानाही दुकानदाराने दुकानाला टाळं लावलं आणि सांगितलं, ‘‘माल संपला आता उद्या या.’’ तेव्हा मी मित्रांसोबत दुकानाच्या जवळच कबड्डी खेळायचो. बैलगाडीतून आणलेला माल दुकानात ठेवलेला मी पाहिला होता. सकाळपासून नंबरला थांबलो होतो आणि लोकही अजून जास्त आलेले नव्हते तर हा माल गेला कुठं? मी त्या दुकानदाराकडं जाऊन तक्रार केली. त्याने दोन पैलवान बोलावले आणि मला दिले दोन दणके! मग मी काही लोकांच्या सह्या घेऊन तहसीलदारांना अर्ज केला. त्यात सांगितलं की, ‘अमुक अमुक दुकानदार गरीब लोकांना रेशनचा माल देत नाही. तुम्ही लक्ष घाला.’
मग चार-आठ दिवसांनी तलाठी आणि अजून एक अधिकारी आले. त्यांनी मला बोलावून घेतलं आणि म्हणाले, ‘‘हा बघ अर्ज आणि वाच : आम्ही सह्या करणारे लोक लिहून देतो की, अमुक तारखेला प्रमोद झिंजाडे यांनी केलेला अर्ज चुकीचा आहे. सदरहू आम्हां सर्वांना रेशनचा माल व्यवस्थित मिळतो.’’ मी म्हटलं, ‘‘हे चुकीचं आहे. मी जो अर्ज केला होता, त्यातील सह्या आणि अंगठे मला तपासायचे आहेत.’’ मग ते जरा घाबरले. दुकानदाराला त्यांनी सांगितलं, ‘‘याला प्रमोद नाही म्हणायचं. झिंजाडे साहेब म्हणायचं आणि यांच्याकडून पैसे न घेता सगळा माल पाच-पाच किलो फुकट द्यायचा.’’ दुकानदार म्हणाला, ‘‘ठीक आहे.’’ मी म्हटलं, ‘‘हे नाही जमणार. गरिबांचा माल गरिबांनाच मिळाला पाहिजे.’’ मला मग जेवायचा आणि दारू घेण्याचाही आग्रह त्यांनी केला. मी त्यांचं जेवण आणि दारू घेतली नाही. या घटनेमुळं गावातील लोकांना रेशनचा माल मिळायला लागला. शंभर टक्के मिळायचा असं म्हणता येणार नाही, पण पूर्वीच्या तुलनेत फरक मात्र पडला. असा हा पहिला प्रयोग होता.
1981 च्या दरम्यानचा काळ होता. रोजगार हमीच्या कामासाठी तेव्हा तीस पैसे रोज मिळायचा. पण त्याच्यातही मजुरांना पैसे कमी मिळायचे. म्हणून मी काही मजुरांना सोबत घेऊन तहसीलदारांना अर्ज करायचं ठरवलं, परंतु ते मजूर मुकादमाला घाबरायचे. तहसीलदारांना अर्ज केल्यावर त्यांनी मला भेटायला बोलावलं. ते म्हणाले, ‘‘पाठीमागेही तू मला त्रास दिला होता. आताही अर्ज घेऊन आला आहेस. तुला आमच्याकडून पैसे पाहिजेत, म्हणून तू आम्हांला ब्लॅकमेल करतो की काय? तू आम्हांला सारखं सारखं कामाला लावतोस. तुझ्याकडं बघायला पाहिजे.’’ मी म्हटलं, ‘‘नाही सर. हा तुमचा गैरसमज आहे. तसं काही नाहीये. लोकांना मजुरी पूर्ण मिळाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे.’’ तहसीलदार मला म्हटले, ‘‘तुलाच एखादं दुकान चालवायला देतो. तूच एखादी संस्था काढ.’’ तेव्हा कापड दुकान, रेशन दुकान गावात चालायचे.
1985मध्ये जामखेड तालुक्यातील धानोरे गावात मी सायकलवरून लग्नाला चाललो होतो. रस्त्यात काही बायामाणसं भेटली. ते सांगत होते, ‘‘रोजगार हमीवर आम्हांला पैसे कमी मिळत आहेत. दगड फोडून फोडून आमच्या हाताला फोड आले आहेत.’’ मी तो दगड पाहिला. तो दगड अतिशय कडक होता. एका ठोक्यात छोटासा तुकडा फुटायचा. मग मी रोजगार हमीच्या कामाचं दरपत्रक पाहिलं. त्याच दरम्यान माझं पुण्याच्या एका संस्थेत रोजगार हमीचं टे्रनिंग घेण्याचं काम चालू होतं. त्यामुळं याची मला बारकाईने माहिती होती. दरपत्रकावर त्या दगडाचा उल्लेखच नव्हता. दरपत्रकावर दगडाचा दर, खडकाचा दर, मुरुमाचा दर, मातीचा दर ठरलेला असायचा. त्याच संध्याकाळी करमाळ्याला जाऊन मी विधान परिषदेचे सदस्य सदानंद वर्दे यांना फोन केला. त्यांना हा सगळा प्रकार सांगितला. वर्देसाहेब म्हणाले, ‘‘मला त्या दगडाचा नमुना पाठवून दे.’’ मी पोस्टाने त्यांना दगडाचा नमुना पाठवून दिला. त्यानंतर त्यांनी धुळ्याच्या रोहिदास पाटलांना ही गोष्ट सांगून एक सदस्यीय कमिटी नेमली. नगरला ही कमिटी आली. त्यांनी ते सगळं काम कसं चालतं हे तपासून आणि दरपत्रकातील त्रुटी पाहून त्यात सुधारणा सुचवल्या. मला याचा आनंद झाला की, आपल्यामुळे पहिल्यांदाच कमिटी नेमली गेली होती.
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…