करमाळा (दि.22) – अयोध्येतील राम मंदीर व राम मूर्ती प्रतिष्ठापणा निमित्ताने आज ढोकरी येथे गुड्या उभारून प्रभू रामचंद्र व राम भक्त हनुमान यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.ढोकरी गावचे ग्रामदैवत राम भक्त हनुमान आहे. अयोध्येतील राम मंदीर लोकार्पण सोहळा व राम लल्ला च्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठा सोहळा आज दिनांक 22 जानेवारी रोजी भव्य दिव्य प्रमाणात साजरा होत असताना सकाळ पासून च ढोकरी गाव सडा समार्जन, रांगोळी याने सजले गेले . सुप्रभात किर्तन कार अनिरुद्ध महाराज निंबाळकर यानी ही किर्तन करताना या दिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते.त्या प्रमाणे गाव ,वाड्या वस्त्यावर सूर्योदय झाल्याबरोबर घरोघरी गुड्या उभारण्यात आल्या . सकाळी 9 वाजता ग्रामस्थ ,महिला भगिनी सजून धजून हनुमान मंदिरासमोर एकत्र आले . यावेळेस रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा यांचे वाचन व श्रवण करण्यात आले .त्यानंतर प्रभू रामचंद्र व हनुमान यांच्या प्रतिमांचे यथासांग पूजन करून गावातील प्रमुख मार्गावरून शोभा यात्रा काढण्यात आली. राम नामाच्या घोषणांनी उजनी जलाशय काठावरील ढोकरी गाव दणाणून गेले.शोभायात्रे नंतर सुरेल आवाजात मंदीरात भजन करण्यात आले. बरोबर ठीक 12 वाजून 20 मिनीटांनी प्रभू रामचंद्र व हनुमान यांच्या प्रतिमा वरती अक्षता व पुष्प वर्षाव करण्यात आला .अखेरीस आरती होऊन सुग्रास महाप्रसाद सेवन करण्यात आला.