करमाळा प्रतिनिधी चालुवर्षी पाऊस खूपच कमी पडल्याने सर्वांना दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे . सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण सुद्धा कमी पाऊस झाल्याने अर्ध्या क्षमतेपेक्षा जास्त भरले नाही . करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा उजनी धरणासाठी खूप मोठा त्याग आहे . कित्येक शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या तेव्हा कुठे हरित पट्टा विकसीत झालेला आहे . तालुक्यातील ३७ गावामधील शेतकरी धरणग्रस्त आहेत खरंतर त्यांचा या पाण्यावर प्रथम हक्क आहे . एकुण ११०.८९ टीएमसी क्षमतेपैकी धरणग्रस्त शेतकऱ्यांचे हक्काचे २ टीएमसी पाणी सदैव अबाधित राहीले पाहिजे . जिल्हा प्रशासनाने याबाबत काटेकोर नियोजन केले पाहिजे . मात्र प्रसार माध्यमातून व समाज माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडून उजनी काठच्या गावांमधील वीज कपात करण्याबाबतच्या निर्णय झाल्याचे कळत आहे . जर या शेतकऱ्यांची वीज कपात केली तर ऊस , केळी व इतर पिके जळून खाक होतील , कोट्यावधी रुपयांचे नुकसान होवून शेतकरी अडचणीत येतील . सध्या या परिसरात ऊस पट्टयासह केळीचा पट्टा विकसीत होत आहे . येथिल केळीला जगात मागणी असून प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात येथील केळी निर्यात केली जात आहे . ऊसाच्या तुलनेत केळीला चांगला भाव मिळाल्याने तालुक्यासह जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती मिळत आहे . चालु वर्षी सुद्धा ऊस व केळी पिकांचे लागणी सह खोडवे व निडवे अशी उभी पिकं आहेत . जरी दुष्काळी परिस्थिती असली तरी पिण्याच्या पाण्यासह या परिसरातील शेतकरी त्यांचे पशुधन व उभी पिकं पण वाचली पाहिजेत त्यासाठी आपण नेहमीच शेतकऱ्यांसोबत आहोत अन् त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय होता कामा नये असे मत जगताप गटाचे यूवा नेते तथा भाजपा जिल्हा यूवा मोर्चा अध्यक्ष शंभूराजे जगताप यांनी व्यक्त केले आहे . तालुक्यातील विवीध पक्षा च्या नेत्यांनी खरं तर अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे पण तसे होताना दिसत नाही . प्रशासनाने विज कपातीचा निर्णय घेवू नये .कमित कमी दररोज ८ तास पूर्ण दाबाने वीज पुरवावी अन्यथा जिल्हाप्रशासन व महावितरण कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असेही त्यांनी सांगितले आहे.