Categories: करमाळा

माझ्या आठवणीतल्या मामी-स्व.सुमित्राबाई सुर्यवंशी


सुमित्रा मामी अचानक गेल्या, तसं त्यांचं जाणं हे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आजारपणामुळे अनपेक्षित जरी नसलं तरी अगदी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेण्याइतपत तब्येत सुधारलीय असं वाटत असताना त्यांची झालेली एक्झिट ही साऱ्या परिवाराच्या दृष्टीने कमालीची धक्कादायक ठरली.मामींच्या जाण्यामुळे आमच्या परिवारातील उरलेल्या काही वडीलधाऱ्यापैकी एक मायेचा आधारवड कोसळला.
मामींच्या जाण्यामुळे त्यांच्या अनेक आठवणी मनात दाटून आल्यात.आदर,धाक वाटावा…कधीतरी सणवारानिमित्त भेटून पायावर डोकं ठेऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा,अशा मामी गेल्यामुळे पोरकेपणाची
जाणीव,मायेची…वात्सल्याची उणीव मनाला अस्वस्थ
करते आहे.माझे मोठे मामा कै. प्रतापराव तथा भाऊमामा यांच्या पत्नी सुमित्रा म्हणजे माझ्या,आमच्या मोठ्या मामी ! सर्वात मोठी आणि अतिशय प्रेमळ अशा पुण्याच्या शांतामावशी,त्यानंतर मधु तथा भाऊमामा, माझी आई,मग कालिंदी मावशी व त्या पाठचे सुधाकर,सुरेश,अरुण हे मामा ! मामी या सूर्यवंशी परिवारातल्या मोठ्या सुनबाई.मला आठवत नाही कारण माझ्या जन्माआधीचा तो काळ होता. मोठे मामा सुरुवातीस पोलीस भरती झाले होते आणि त्याच काळात मामांचं नान्नज(उत्तर सोलापूर) येथील भोसले परिवारातील मामींशी १९५६ साली लग्न झालं. ग्रामीण भागातील आणि लहान वयात लग्न झालेल्या मामी शब्दशः निरक्षर होत्या आणि लग्नानंतर मामांनी त्यांना लिहायला,वाचायला,हिशोब वगैरे करायला शिकवलं होतं हेही आम्ही ऐकलेलंच.पण पुढील काळात मामींनी हे शिक्षण परिवारातील कर्त्या सुनेची भूमिका पार पाडताना सार्थ ठरवलं हे आम्ही पाहिलं अन अनुभवलंय !
मोठे मामा प्रतापराव रामकृष्ण सूर्यवंशी हे तसे अतिशय तामसी,शीघ्रकोपी,जन्मतःच मजबूत शरीरयष्टी अन ताकदवान असे पण वृत्तीने हेकेखोर आणि लहरी पण क्वचित प्रसंगी खूप हळवे,प्रेमळ पण मनाचा हा कंगोरा देखील व्यक्त न करणारं असं आमच्या लहानपणापासून धाक,दरारा असलेलं आमच्या दृष्टीने तर गूढ व्यक्तिमत्त्व. जर आमची पोरासोरांची त्या वयात ही भावना असेल तर मग मामींनी तर आयुष्यभर संसार निभावताना मामांच्या किती लहरी,किती मर्जी सांभाळली असेल ते त्यांनाच ठाऊक…पण त्यातलं बरचसं मला आठवतंय तिथपासून मी व आम्ही सगळीच आत्ये-मामे भावंडं पहात आलोय.मामांच्या आधी पुण्याची मोठी शांतामावशी आणि माझ्या आईचं लग्न झालेलं.आमचे आजोबा रामकृष्ण बाजीराव सूर्यवंशी(डोईफोडे) हे मामा व उर्वरित दोन बहिणी,तीन भावंडं लहान असतानाच वारले,जे त्या पिढीतील नामवंत आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जायचे…त्यांची आठवण त्यांच्या पुढील पिढीतील आज हयात असलेल्या काही मंडळींना अजून आहे.आजोबांच्या अकाली जाण्यानंतर जेऊरस्थित असलेल्या या कुटुंबाचे संगोपन आज्जीने म्हशी पाळून दुधविक्रीचा व्यवसाय करून केलं.
१९५५ ला आमच्या आईचं,नंतर भाऊमामाचं लग्न झालं,दरम्यान थोरला भाऊ व भावजयी म्हणून धाकटी एक बहीण व तीन भावंडांच्या पालकत्वाची जबाबदारी मामा-मामींवर आली.ही जबाबदारी निभावताना त्या-त्या वेळी मामींनी त्यांना मनापासून साथ दिली.काही वर्षांत आज्जीचेही निधन झाले त्यावेळी सुधाकर,सुरेश,अरुण ही भावंडे मार्गी लागायची होती.धाकटा अरुण तर शिकतच होता.ही भावंडं मार्गी लावेपर्यंत त्यांचे पालकत्व या उभयतांनी आपुलकीनं निभावून नेलं.
पोलीस खात्याची नोकरी अल्पावधीत सोडून कृषी खात्यात कायम झालेल्या मामांनी काही कारणामुळे मुलं लहान असताना,रागाच्या भरात नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यानंतरचा काही वर्षांचा काळ हा अक्षरशः मामींच्या धैर्याची,धीराची,व्यवहारीपणाची कसोटी पाहणारा ठरला…आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वकष्टातून अचानक उदभवलेल्या या परिस्थितीला यशस्वीपणे तोंड देऊन त्यावर मात केली. पुढे १९८४ च्या दरम्यान थोरला विश्वजित पोलिस खात्यात भरती झाला त्याच दरम्यान विशेष बाब म्हणून मामांनादेखील कृषी खात्यातील नोकरीत पुन्हा रुजू करून घेतलं गेलं आणि हळूहळू मामींना स्वास्थ लाभू लागलं,पुढे यथावकाश सर्व मुलामुलींची लग्न,नातवंडे अशा परिवारात रमत गेलेल्या मामींचं आणि आमच्या आईचं (अक्का) ट्युनिंग पहिल्यापासूनच खूप छान होतं.थोरली भावजय व वयाने मोठी नणंद या नात्याने दोघी एकमेकींचा मान आणि मन सांभाळून असायच्या,या जिव्हाळ्यातूनच मामा-मामींच्या दोन्ही मुली आमच्या आईने आपल्या सुना करून घेतल्या,दुसरा मुलगा विक्रम(बाळू) चव्हाण कॉलेजमध्ये नोकरीला लागल्यानंतर मामींच्या समाधानात आणखी भर पडली असं म्हणावं लागेल.मामांच्या अखेरपर्यंत त्यांचा शब्ददेखील खाली पडू न दिलेल्या मामींनी, त्यांची मर्जी राखून,प्रतिकूल परिस्थितीला संयमाने सामोरं जाऊन प्रपंचाचं सुकाणू यशस्वीपणे पेललं ही बाब आजच्या काळाच्या दृष्टीने तर खरोखरच उल्लेखनीय अशीच आहे.२००६ मध्ये मामांच्या जाण्यानंतर २०१२ मध्ये थोरल्या विश्वजितचं अकाली जाणं,२०२० मध्ये थोरल्या जावयाचं देखील असंच अकाली जाणं अशा दुःखद प्रसंगांना उतारवयात मामींनी धीराने तोंड दिलं.
धाकटा असलेल्या विक्रमने दरम्यानच्या काळात घरातले कर्तेपण निभावून मामींना सगळ्याच अर्थानं सुख-समाधान दिलं हे नक्कीच. गोऱ्या,उंच,देखण्या असं व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मामींच्या चेहऱ्यावर कधीही त्रागा नसायचा उलट नेहमी स्मितहास्य असलेलंच आम्ही पाहिलंय. त्या काळात ग्रामीण भागातून आलेल्या मामींच्या स्वभावात उपजतच समजूतदारपणा,प्रसंगावधान,प्रसंगी हजरजबाबीपणा होता आणि विशेष म्हणजे विनोदाची जाण असलेल्या मामींच्या स्वभावात भांडखोरपणा, हेकेखोरपणा असं काहीही नसल्यानं मामींनी थोरलेपणाच्या जाणिवेतून सगळी नाती आयुष्यभर जबाबदारीने जपली,जोपासली.
प्रत्येकाच्या भावविश्वामध्ये आई-वडिलांसह आणखी काही वडीलधाऱ्या,आदरणीय व्यक्तींसाठी विशेष असं स्थान असतं.माझ्याही भावविश्वात असलेल्या अशा काही व्यक्तींमध्ये मामींचं स्थान अढळ असंच आहे…आणि राहील. अशा या मामींची उणीव ही उर्वरित आयुष्यात आम्हा सगळ्यांनाच सतत जाणवत रहाणार आहे परंतु दैवाधीन असलेल्या काही बाबी स्वीकारणे ही मानवी जीवनाची अपरिहार्यता आहे. मामींच्या अमीट स्मृतींना भावपूर्ण अभिवादन..!
– *विवेक शं. येवले*,करमाळा
दि.११/०४/२०२४

saptahikpawanputra

Recent Posts

भाजप युवा मोर्चाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…

21 hours ago

कोल्हापूरच्या पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई.

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…

1 day ago

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार देशभक्त नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…

1 day ago

करमाळा तालुक्यातील पत्रकारीता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असल्याने त्यांना सन्मानित करण्याचा ‌ सार्थ अभिमान- भरत भाऊ आवताडे

करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…

2 days ago

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सोलापूर जिल्हयाचे भाग्यविधाते देशभक्त कै.नामदेवरावजी जगताप यांची १०५ वी जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…

2 days ago

करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…

2 days ago