करमाळा प्रतिनिधी- उजनी जलाशयाच्या काठावरील शेतीपंपाचा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे म्हणजे आठ तास तातडीने सुरळीत करण्यात यावा असे आवाहन मकाई कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज केले. याबाबत अधिक बोलताना श्री. बागल म्हणाले की गतवर्षी अपुऱ्या पर्जन्यामुळे उजनी धरण केवळ 60 टक्के भरले होते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने खालावली व वजा 60 टक्के धरण झाले. त्यामुळे प्रशासनाने उजनीकाठावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा आठ तासाच्या ऐवजी सहा तास केला होता. परंतु सध्या सर्वत्र पडत असलेल्या समाधानकारक पावसामुळे उजनी धरणांमधील पाणी पातळी हळूहळू वाढत असून उजनी धरण सध्या वजा 32 टक्के इतके झाले आहे. पुणे, मावळ व उजनी लाभक्षेत्रात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे थोड्याच दिवसात उजनी धरण भरण्याची शक्यता असून, तसे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. सध्या उजनी धरणाची वाढत चाललेली पाणी पातळी लक्षात घेता उजनी जलाशयाच्या काठावरील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे म्हणजे आठ तास सुरळीत करण्यात यावा अशी उजनी काठावरील शेतकऱ्यांची मागणी आहे. सध्या सहा तास वीज पुरवठा चालू असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस झाल्याने सध्या पाण्याची मागणी सर्वत्र कमीच आहे. तरी जिल्हा प्रशासनाने उजनी जलाशयाच्या काठावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत म्हणजे सलग आठ तास करावा, याबाबत आपण स्वतः माननीय जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे विनंती केली असून लवकरच याबाबत निश्चित कार्यवाही होईल, असे शेवटी श्री. बागल यांनी सांगितले.