करमाळा प्रतिनिधी- करमाळा तालुक्यातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सध्याच्या तीन जिल्हा मार्गांना राज्य मार्गाचा दर्जा मिळण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लेखी पत्र दिले, असून याबाबत लवकरच कार्यवाही होईल. असे मकाईचे माजी चेअरमन व जिल्ह्या भाजपाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज सांगितले. याबाबत अधिक बोलताना श्री बागल म्हणाले की करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा पारेवाडी जिंती चौक ते डिकसळ, कुगाव शेटफळ जेऊर ते साडे, आणि घोटी ते जेऊर हे रस्ते सध्या जिल्हा मार्ग म्हणून दळणवळणाच्या सेवेत आहे. सदरचे जिल्हा मार्ग पुणे सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांना जोडणारे प्रमुख मार्ग असून सिना- कोळगाव उजनीलाभक्षेत्रालगत असल्यामुळे या परिसरातील ऊस केळी व इतर अन्य पिके या रस्त्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. तसेच त्यांची वाहतूक व दैनंदिन दळणवळण व वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर या रस्त्यांवरून होते. तसेच या रस्त्यांच्या परिसरात सहा ते सात साखर कारखाने असून या परिसराला आर्थिक दृष्ट्या संपन्न करण्यासाठी सध्याच्या या तिन्ही जिल्हा मार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राज्य मार्गाचा दर्जा देऊन सदर रस्ते विकसित करणे गरजेचे असून याबाबत तालुक्यातील जनतेची मागणी असून या मागणीचा गांभीर्याने शासन स्तरावर विचार व्हावा, तसेच या मार्गांना राज्यमार्गाचा दर्जा दिल्यास सदर रस्त्यांची कामे अधिक चांगल्या पद्धतीने होतील जेणेकरून सुरळीत वाहतूक व दळणवळण होईल याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रविंद्रजी चव्हाण साहेब यांना पत्र देऊन तशी विनंती केली असल्याचे शेवटी श्री बागल यांनी सांगितले आहे.