करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ महेंद्र नगरे तर प्रमुख पाहुणे सौ रोहिणी नगरे आणि डॉक्टर अमोल घाडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि आर्ट ऑफ लिविंग चे प्रणेते तथा गुरु श्री श्री रविशंकर आणि पं. बोळंगे गुरुजी यांच्या पादुकांची पूजा करण्यात आली. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉक्टर नगरे म्हणाले की,व्यक्तीच्या जन्मानंतर त्याचा पहिला गुरू असतो आई, मग आयुष्याला मार्ग दाखवणारा आपला मार्गदर्शक गुरू. खरं तर जी व्यक्ती आपल्याला नवी वाट दर्शवते, जीवनाला गंध देणारं नव ज्ञान देते, आपली चूक नकळत सुधारते, ती व्यक्ती जीवनात आपल्या गुरूच्या स्थानी जाते. गुरु शिवाय मार्ग नाही. गुरुचे महत्व अगदी सोप्या भाषेमध्ये पटवून दिले. यावेळी रोहिणी नगरे डॉक्टर घाडगे , प्रा बाळासाहेब नरारे यांचीही भाषणे झाली. मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिविंग चे भजने गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी संगीत रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉक्टर स्वाती घाडगे यांनी केले. सूत्रसंचालन कु. वानेश्री घाडगे यांनी तर आभार अर्चना सोनी यांनी मानले.