करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर गाव हे महत्वाची बाजारपेठ असलेले मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी मध्य रेल्वेचे रेल्वे स्थानक देखिल असुन, या गजबललेल्या ठिकाणी शाळा, कॉलेज, बँका, महसुली कार्यालय, पोष्ट ऑफीस,यासह मोठी माशांची बाजारपेठ देखिल आहे. या गावात पुर्वीपासुन एक देशी दारूचे सरकारमान्य दुकान असुन अवैध धंदे मुबलक प्रमाणात चालतात. देशी दारू शिवाय या ठिकाणी बेकायदेशिरपणे खुले आम सार्वजनिक क्षेत्रात हातभट्टी दारू, इंग्लिश दारू विक्री होत आहे. यामुळे गावातील व परिसरातील सार्वजनिक वातावरण अवैध दारू धंद्यामुळे दुषीत झालेले आहे. सदरच्या ठिकाणची दारू बंद करण्यासाठी यापुर्वी देखिल अनेकांनी पुढाकार घेतला परंतु दारू बंद होण्याऐवजी पोलिसांचे राजीमर्जीतून हे धंदे अधिकच बोकाळले. येथील अवैध दारू विक्रेत्यांवर तात्पुरत्या स्वरूपाच्या कारवाया कित्येक वेळा पोलिस प्रशासनाकडून झाल्या परंतु दारू कायमस्वरूपी बंद झाली नाही. अनेक तरुण व्यसनाधिन होताना उघड्या डोळ्यानी पाहावे लागत होते. वस्तुस्थितीने आजही केत्तुर येथील दारूचे अड्डे आणि दारुडे यांचेवर कसलेच नियंत्रण नाही तसेच हे दारूधंदे वाले निर्लज्ज पणे प्राथमिक शाळा, हायस्कुल , मंदीर व बाजार परिसरात बिनधास्त दारू विक्री करत आहेत. त्यामुळे गावातील प्रमुख महिला मंडळींनी पुढाकार घेत गावची अवैध दारू हद्दपार करायची याबाबत पुढाकार घेतला. दिनांक -१५ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामपंचायत सदस्य सौ. कमल पवार यांनी पुढाकार घेऊन झेंडावंदनाचे वेळी दारू बंदीकरीता हाक दिली याला गावातील सर्व ग्रामस्थांनी पाठींबा दर्शविला असता, ग्रामपंचायतीचे मासिक सभा ऑगस्ट २०२४ मधे पार पडली त्यामुळे दारू बंदीचा एकमुखी ठराव संमत केला , त्यानंतर आज दिनांक-२६/०८/२४ सोमवार रोजी ग्रामपंचायतीमधे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला गावातील असंख्य महिलावर्गासह सर्व ग्रामस्थ व युवक मंडळींची हजेरी होती. या प्रसंगी सौ. कमल पवार, माजी सरपंच सौ. निर्जलाताई नवले, श्रीमती.कमल गुंजाळ, बेबीताई कनिचे यांचे सह अनेकांनी आपली मते नोंदवली. यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वच मंडळींनी दारू बंदी करणेबाबत एकदिलाने ठराव संमत केला आहे. सदर ग्रामपंचायत सभेचे ठराव वरिष्ठ पातळीपर्यंत देऊन गावात संपुर्ण दारुबंदी बाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्याचे ठरलेले असुन, नक्कीच पोलिस प्रशासनही आता आलर्ट होईल असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. केत्तुरचे दारू धंदे बंद करण्यासाठी सरसावलेल्या महिलांना पोलिस प्रशासन कसे सहकार्य करणार आहे हे आगामी कालावधीत दिसुन येईलच. सदर ग्रामसभेला सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, सर्व ग्रा पं सदस्य, सर्व महिला मंडळी, युवक मंडळ उपस्थित होते.