करमाळा प्रतिनिधी – बैलपोळा सण हा ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परंपरेचा उत्सव आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी गावखेड्यात शेतातील बैलांची पूजा करुन, त्यांना नवैद्य देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र यांत्रिकीकरणाच्या या युगात शेतकरी प्रगतशील झाल्याने पुर्वी शेती मशागतीची बैलांकरवी करून घेण्यात येणारी परंपरागत कामे आता ट्रॅक्टरद्वारे सर्रास करून घेण्यात येतात. शेती कामात बैलाचा वापर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल जोडी क्वचितच दिसून येते. मात्र करमाळ्याच्या सावंत कुटुंबीयांकडून बैल पोळ्यासाठी खास जीवंत बैल जोड्या विकत घेऊन त्यांची पूजा केली जाते.७२ वर्षांपूर्वी बैल पोळा उत्साहात साजरा करण्याची सुरुवात केलेले स्व. अनंतराव (आबा) सावंत आणि त्यांच्यानंतर कष्टकरी आणि कामगारांचे नेते मानले गेलेले स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या कुटुंबात बैलपोळा या सणाला पूर्वापार दिवाळीपेक्षा जास्त महत्त्व देण्यात येते. सध्याच्या काळात कुटुंबाच्या मालकीची १०० एकर शेत जमीन असली तरी यांत्रिकीकरणामुळे बैलांचा शेतीकामासाठी चा वापर कमी झाला असून ट्रॅक्टरद्वारेच शेतीची सर्व कामे करून घेतली जातात. तीन वर्षांपूर्वीपर्यंत सावंत फार्ममध्ये बैलजोड्या जोपासण्यात येत होत्या. मात्र अलीकडील काळात शेती कामासाठी ट्रॅक्टरचा वापर होत असल्याने कुटुंबात पूर्वापार चालत आलेली बैलपोळ्याची परंपरा जपण्यासाठी सावंत कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य विठ्ठलआप्पा सावंत हे बैलपोळ्यापूर्वी महिनाभर अगोदर कर्जत, राशीन, जामखेड, काष्टी, गेवराई आदी ठिकाणच्या जनावरांच्या बाजारांना भेटी देऊन दर्जेदार अशा खिलार बैल जोड्या विकत घेतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सावंत कुटुंबीयांकडून पंधरा बैल जोड्यांची खरेदी केली गेली. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी या बैलांचे खांदे गरम पाण्याने धुवून हळदीने खांदे मळणी करण्यात आली. पोळ्या दिवशी सकाळीच या पांढऱ्याशुभ्र बैलांना स्वच्छ अंघोळ घालून शिंगांना सोनेरी रंग लावला गेला. बैलांच्या अंगावर गुलाल टाकून शिंगांना बेगड लावल्या गेल्या. आणि मग सावंत यांच्या निवासस्थानापासून या सजवलेल्या बैलांची ढोल ताशा बँड पथक आणि हलग्यांच्या कडकडात भव्य मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत सावंत यांच्या नातेवाईक आणि इष्टमित्रांसह संपूर्ण सावंत गल्लीतील अठरापगड समाज सामील झाला. सावंत गल्लीतील मारुती मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक फुलसौंदर चौक-जय महाराष्ट्र चौक -गुजर गल्ली-छत्रपती शिवाजी महाराज चौक-दत्तपेठ आदी प्रमुख मार्गांवरून जात असताना शहरातील महीला भगिनींनी या बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवद्य दिला. सायंकाळी पाचच्या सुमारास ही मिरवणूक पुन्हा सावंत यांच्या निवासस्थानासमोर आली. या ठिकाणी या बैलांचे पारंपारिक पद्धतीने लग्न लावले गेले. लग्नासह विविध पारंपारिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सालाबाद प्रमाणे उपस्थित सर्वांसाठी सावंत कुटुंबीयांकडून पुरणपोळीच्या जेवणाचा बेत झाल बैलपोळ्याच्या या संपूर्ण सोहळ्यात सावंत कुटुंबातील विठ्ठलआप्पा सावंत, गोपाळबापु सावंत, दादासाहेब सावंत, ॲड. राहुल सावंत, माजी नगरसेवक संजय (पप्पू) सावंत, सुनीलबापू सावंत, जनावरांचे व्यापारी किरण सावंत यांच्यासह सचिन गायकवाड, दादा इंदलकर, फारूक जमादार, आनंद रोडे, दौलत वाघमोडे, गणेश मुरूमकर, अशोक दोशी, व्यापारी संतोष गाडे (कुर्डू), सारंग ढवाण (काष्टी), सारंग भोसले (काष्टी), दासा मोडाळे (राशीन), मच्छिंद्र काळे (राशीन), संदीप जाधव (पाडळी) आदी मान्यवरांसह सावंत गल्ली येथील अनेक जण उपस्थित होते. *मागील ७२ वर्षांपासून सावंत कुटुंबात बैलपोळा सण उत्साहाने साजरा केला जातो. यांत्रिकीकरणामुळे बैलांचा शेतीसाठी वापर कमी झाला असल्याने सहसा शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल दिसत नाही. शहरी भागात तर मातीच्या बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला जातो. मात्र भावी पिढीला या परंपरागत सणाची ओळख राहावी म्हणून आम्ही जामखेड, गेवराई, राशीन, कुर्डूवाडी, काष्टी आदी भागातून उमद्या बैल जोड्या खरेदी करून पोळ्याच्या सण साजरा करतो. विठ्ठलआप्पा सावंत व्यापारी हमालीचा व्यवसाय करता करता आमचे आजोबा स्व. अनंतआबा सावंत यांनी एका खोंडाची खरेदी करून जनावरांचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आमचे वडील स्व. सुभाष अण्णा सावंत यांनी पुढे चालू ठेवला. स्व. आण्णा राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरल्यानंतर आमचे चुलते श्री. विठ्ठलआप्पा सावंत यांनी हा व्यवसाय पुढे चालवला. प्रामुख्याने शेतकऱ्यांची दिवाळी मानला गेलेला बैलपोळा हा सण बैलां अभावीच साजरा करण्याची प्रथा पडू नये म्हणून आम्ही दरवर्षी अनेक बैल जोड्या खरेदी करून बैल पोळा उत्साहात साजरा करतो. ॲड.राहुल सावंत अध्यक्ष हमाल पंचायत करमाळा.सदस्य- जिल्हा नियोजन समिती सोलापूर. आमचे वडील विठ्ठलआप्पा यांनी आसपासच्या बाजारपेठांत कर्नाटकातून सुद्धा देखण्या बैल जोड्या आणून त्यांची विक्री केली. सध्याच्या काळात केवळ हौस म्हणून बैल जोड्या क्वचित जोपासल्या जातात त्यामुळे हा व्यवसाय कमी झाला असला तरी आता केवळ दुभत्या जनावरांचा व्यवसाय जोमाने सुरू आहे. किरण सावंत व्यापारी