करमाळा प्रतिनिधी करमाळा तहसील व प्रशासकीय कार्यालय नवीन जागेत स्थलांतर विरोधात माजी आमदार नारायण (आबा) पाटील उद्या धरणे आंदोलन करणार असून यासाठी निवेदनाची प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि करमाळा येथील सध्याचे तहसील कार्यालय करमाळा शहरापासून दीड किलोमीटर दूर स्थलांतरित करून नवीन जागेत बांधण्याचा घाट विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी बांधला आहे. या कामाचे टेंडर निघण्या अगोदरच घाई गडबडीत या कामाचे भूमिपुजन करण्यात आले आहे. या कामाची टेंडर नोटिफिकेशन आता उशिरा काढण्यात आली असून 12 ऑक्टोबर ही टेंडर भरण्याची शेवटची मुदत आहे. यामुळे नागरिकांची मागणी नसतानाही हा निर्णय घेतला जातं आहे. वास्तविक पाहता करमाळा तहसील कार्यालयाची सध्याची इमारत ही अतिशय भक्कम आणि वास्तुशास्त्राचा एक उत्तम दाखला म्हणून ओळखली जाते. या तहसील कचेरीच्या अगदी हाकेच्या अंतरावर पंचायत समिती, जमीन खरेदी विक्री, सार्वजनिक बांधकाम, भूमी अभिलेख व नोंदणी कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन, न्यायालय आदी कार्यालये असून एकदा कचेरी आवारात आले कि नागरिक आपल्या अन्य कामांचा पाठपुरावा अगदी सहजपणे करू शकत आहे. शिवाय करमाळा शहराची मुख्य बाजारपेठ, बसस्थानक व बाजार समिती मध्ये जाणे त्याला शक्य होत आहे. परंतु आता विद्यमान आमदार शिंदे यांनी जाणीवपूर्वक तहसील कार्यालय नवीन जागेत घेऊन जाण्यासाठी आपली ताकद पणाला लावली असून कसल्याही परिस्थितीत आपण करमाळा शहरातील हे लोकांच्या सोयीचे व गजबजाटीचे ठिकाण शहरापासून दूर नेणार असा ठाम निर्णय घेतला आहे. या निर्णयला आवाहन देण्यासाठी तालुक्यातील मोठ्या राजकीय गटापैकी पाटील गटाने उघडपणे विरोध करावयाचे ठरवले असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृवाखाली उद्या बुधवारी सकाळी अकरा वाजल्या पासून कचेरीच्या आवारात समोर पोलीस मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँगेस (शरद पवार गट ) सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पदाधिकारी, विविध गावातील स्थानिक स्वराज संस्था अर्थात ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच, सदस्य तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आंदोलनास करमाळा शहरातील व्यापारी तसेच छोटे व्यावसायिक यांचाही पाठिंबा असल्याचे समजते. यामुळे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उद्याच्या आंदोलनाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या निवेदनाच्या प्रति राज्याचे प्रधान सचिव, बांधकाम मंत्रालय सचिव, महसूल विभाग सचिव, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, प्रांत यांनाही पाठवन्यात आल्या आहेत. तसेच उद्याच्या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.