Categories: करमाळा

माजी आमदार. स्व.रावसाहेब पाटील करमाळ्याच्या राजकारण, समाजकारणातले निस्पृह व्यक्तिमत्व – ॲड.अजित विघ्ने( प्रवक्ता. राष्ट्रवादी काँग्रेस, करमाळा/ माजी सरपंच.केत्तुर

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर अनेक मात्तबर नेते मंडळी घडुन गेली त्यामधे केत्तुरचे स्व.रावसाहेब भगवानराव पाटील यांचे नाव आदराने घेतले जाते.१९८५च्या विधानसभेत उगवता सुर्य हे चिन्ह घेऊन अपक्ष निवडुन आलेले हे आमदार होते. देशभक्त स्व. नामदेवरावजी जगताप आणि स्व. रावसाहेब पाटील यांचेत त्यावेळी झालेली विधानसभेची निवडणुक खुपच अटीतटीची झाली होती. खरे तर ही निवडणुक करमाळाच्या राजकारणाला नवे वळण देणारी ठरली. मात्तबर आणि करारी असणाऱ्या आणि देशाचे उपपंतप्रधान स्व. यशवंतरावजी चव्हाण साहेबांचे मानसपुत्र समजले जाणाऱ्या बलाढय नामदेवरावजी जगतापांसमोर त्या काळात विरुद्ध ऊभे राहायची कोणाचीच हिम्मत नव्हती. अकलुजच्या शंकरराव मोहिते- पाटलांनी संपूर्ण ताकद करमाळ्यातील जगताप विरोधी पुढाऱ्यांना दिली होती. वस्तुतः करमाळ्यातल्या कोणत्याही पुढाऱ्याला नामदेवरावजींच्या विरुद्ध निवडणुक लढविण्याची हिम्मत होत नव्हती. तळागाळातील कार्यकर्त्यांमधे त्यावेळी जगताप गटाचे जबरदस्त नेटवर्क होते.आज जे आपण मिडीयाचा वापर करतोय तो मिडीया नावालाही नव्हता. गावतल्या प्रमुख पाटलांनी आदल्या दिवशी सांगितले की बुथ यंत्रणा लागायची, गाडयांना स्पिकर भोंगे आणि माईकवरून प्रचार असायचा,ती प्रचाराची गाडी पण खडबडीत दगडांच्या रस्त्याने आणि फुफाट्यात न्हाऊन निघायची. पारावरचा प्रचार रंगलेला असायचा.अशा काळात गावागावातले मात्तबर पुढारी झऱ्याचे स्व.विलासराव पाटील,मांगीचे भागवत आप्पा बागल,नेरल्याचे बप्पा पाटील, माजी जि प अध्यक्ष काकासाहेब निंबाळकर, वांगीचे देशमुख, आप्पासाहेब झांजुर्णे,कोर्टीचे शेरे आप्पा,माजी उपसभापती व पोमलवाडीचे रामकृष्ण ऊर्फ पोपटराव पाटील, सातोलीचे शंकरबापू साळुंखे, स्व.गिरधरदास देवी यांचे सह अनेक बुजुर्गांनी नामदेवरावजी जगतापासारख्या बलाढय नेत्याला परास्त करायचेच म्हणुन चंग बांधला होता परंतु त्यांचे विरुद्ध उभे राहायचे कोणी? हा प्रश्न होताच.. सुरुवातीला स्व. पोपटराव ऊर्फ रामकृष्ण पाटील यांचे नाव सर्वसंमतीने पुढे आले. परंतु त्यांनी यु टर्न घेतला. काकासाहेब निंबाळकर, गिरधददास देवी यांचीही नावे चर्चेत होती परंतु सर्वचजण माघार घेत होते.. अशात केत्तुरचे उंचे पुरे आणि दिमाखदार असणारे व मोहिते पाटलांचे जवळ असणारे रावसाहेब पाटील नामदेवरावजींच्या विरोधात ऊभे राहण्याचे धाडस दाखविले. अतिशय नम्र आणि स्वच्छ प्रतिमेच्या रावसाहेब पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने करमाळा तालुका पिंजुन काढला आणि इतिहास घडला.. मात्तबर असणाऱ्या स्व. नामदेवराव जगताप साहेबांचा या निवडणुकीत पराभव झाला. स्व.रावसाहेब पाटील यांनी संधीचे सोने केले. पांढरे शुभ्र धोतर, वर पांढरा शुभ्र शर्ट, डोक्यावर पांढरी शुभ्र गांधी टोपी.. उंच शरिरयष्टी, बोलताना अगदी मृदु आणि सौम्य शब्दातले बोलणे अशी प्रतिमा असणारे स्व. रावसाहेब पाटील यांनी १९८५ ते १९९० च्या काळात आमदार म्हणुन कारकीर्द घडवली. पुढील काळात स्व. नामदेवरावजींचे निधन झाले..१९९० साली पुन्हा जगताप गटाने अपक्ष म्हणुन माजी आमदार. जयवंतराव भाऊ जगताप यांना नेतृत्व बहाल केले आणि स्व. रावसाहेब पाटील यांचा काँग्रेस पक्षाचे उमेदवार असुनही पराभव केला. त्यावेळी देशाचे नेते, माजी मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार यांचे स्व. रावसाहेब पाटील यांचे प्रचाराला आलेले हेलिकॉपटर वरूनच हात करून गेले आणि तरुण तडफदार राजाभाऊचा सिंह विधानसभेत पोहोचला. दरम्यानचे काळात करमाळ्याचे राजकारणात बरेच फेरबदल घडत होते जगताप गट विरुद्ध मोहिते पाटील गट असे दोन गट आमने सामने येत होते. मोहिते पाटील गटाचे नेतृत्व स्व. रावसाहेब पाटलांनी बरेच काळ केले. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे त्यांनी चेअरमन म्हणुन केलेली त्यांची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहीली. स्व. रावसाहेब पाटील व स्व. गिरधदास देवी या स्वच्छ प्रतिमेच्या नेत्यांनी आदिनाथ कारखाना सक्षमपणे आणि सचोटीने चालवला.१९९० नंतर करमाळा तालुक्याचे राजकारणात नविन पिढी उदयास आली.. माजी आमदार. जयवंतराव जगताप, माजी मंत्री स्व.दिंगबर मामा बागल यांनी जगताप गट आणि बागल गटाचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. स्व.रावसाहेब पाटील यांचे नंतर मोहिते पाटील यांनी नविन पत्ता काढण्या आधीच जगताप आणि बागल या दोन गटाभोवतीच राजकारण फिरत राहीले.पुढे पाटील गटाचा उदय झाला आणि त्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचाही स्वतंत्र शिरकाव झाला आहे. आता राजकारणाची दिशा पुर्ण बदलली आहे. आता गावातल्या पाटलांच्या वाडयावरून होणारे राजकारण पुर्ण बंद झाले आहे.नविन पिढी विकासाच्या नव्या वाटा शोधताना भाजपा,राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, रासप यासह अनेक पक्षात स्थिरावली आहे.गटातटाच्या राजकारणात विखुरलेल्या करमाळ्यात आजही जगताप, बागल, पाटील,शिंदे गट आपली वेगळी चूल मांडून विस्तारत आहेत. विकासाबरोबरच कट्टरतेचा मंत्र जपणारे कार्यकर्ते आणि नेते रोज वेगवेगळ्या दिशेला धावत आहेत. दिशाहीन चाललेले हे राजकारण पाहताना कधी कधी राजकारणा पासुन दूर जावे वाटते.स्वच्छ सरळ आणि वैचारिक दृष्टिकोन ठेऊन चालणारी जुनी मंडळी आता कुठेच आढळत नाहीत. स्व.रावसाहेब पाटील यांचे स्मृती दिना निमित्त आज भावपुर्ण आदरांजली अर्पण करताना भविष्यकाळातील राजकारणात सक्षम, अभ्यासु,वैचारिक क्षमतेची नविन पिढी उदयास यावी ही भावना आहे. स्व. रावसाहेब पाटील यांचे नाव एक आमदार पेक्षाही स्वच्छ प्रतिमेचा माणूस म्हणुन कायमच अजरामर राहणार आहे!!

saptahikpawanputra

Recent Posts

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी पिंपळवाडीत ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा

करमाळा : प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील पिंपळवाडी येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाची वार्षिक यात्रा यंदा अक्षय…

24 hours ago

करमाळ्यात ज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्यसैनिक नरसिंह चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त १९ एप्रिल रोजी भव्य नागरी सत्कार श्री स्वामी समर्थ स्मारकाचे लोकार्पण

करमाळा : प्रतिनिधी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा पत्रकार  श्री. नरसिंह मनोहरपंत चिवटे यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त…

2 days ago

२५ वर्षांनंतर रेशन कार्ड वाटप मोहीम पुन्हा सुरू करण्याची मागणी; मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन- औदुंबरराजे भोसले

  करमाळा (प्रतिनिधी): सुमारे पंचवीस वर्षांपासून बंद असलेली रेशन कार्ड वाटपाची मोहीम पुन्हा सुरू करावी,…

2 days ago

साऊथ कोरिया येथील महत्त्वाच्या प्रकल्पासाठी अभिजीत मच्छिंद्र जायभाय यांची प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago

पुण्यातील MNC मध्ये अभिजीत जायभाय यांची साऊथ कोरिया प्रकल्पासाठी प्रोजेक्ट मॅनेजरपदी निवड

करमाळा प्रतिनिधी पॅकेजिंग क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या BOBST India Private Limited या बहुराष्ट्रीय कंपनीने…

2 days ago