करमाळा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. विविध राजकीय पक्ष, आघाड्या तसेच अपक्ष उमेदवारांकडून अर्ज भरण्याची लगबग सुरू असून मंगळवारअखेरपर्यंत जिल्हा परिषदेसाठी १६ तर पंचायत समितीसाठी ५० असे एकूण ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
विशेष म्हणजे आतापर्यंत तब्बल ६५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे निवडणूक कार्यालयात बुधवारी मोठी गर्दी आणि राजकीय हालचालींना कमालीचा वेग येण्याची शक्यता आहे.
मंगळवारी जिल्हा परिषदेसाठी केम, चिखलठाण, वीट, पांडे, कोर्टी, साडेगण, हिसरे, रावगाव, वांगी, केतूर, आदी गटांमधून अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. यामध्ये संजय देवकर, साधना पवार, कल्याणी तळेकर, केरबा गलांडे, अश्विनी चिवटे, राणी वारे, ज्योती सावंत, सविता राजेभोसले, वनिता गुळवे, योगिनी राजेभोसले, राजलक्ष्मी मोरे पाटील, महावीर तळेकर, उद्धव भोसले, बाजीराव माने, दशरथ घाडगे, शशिकांत शेलार, भरत अवताडे, आकाश अवताडे, नवनाथ जगदाळे, हनुमंत निळ, समाधान फरतडे, दीपा कांबळे, जितेश कांबळे, सोनाली तकिक, गायत्री शेळके, शर्मिली रोकडे, संतोष वारगड, सुहास मिसळ, विठ्ठल मोरे, अजिनाथ विघ्ने, उदयसिंह मोरे, शहाजी पाटील, बाळासाहेब जरांडे, नितीन राजेभोसले, विलास कोकणे, किरण निंबाळकर, अमोल जरांडे, संभाजी शिंदे, संजयकुमार जाधव, नानासाहेब आढाव, सुमित गिरांजे, मोहम्मद शरीफ जमीर शेख, नाना झाकणे, नवनाथ दुरंदे, रेवणनाथ साखरे आदींचा समावेश आहे. काही गटांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याचे चित्रही दिसून येत आहे.
दरम्यान, करमाळा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार नारायण आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी त्यांच्या गटाकडून अधिक जोमाने अर्ज भरण्यात येणार असून, संभाव्य उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युतीकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. युतीला मिळालेल्या जागांवर सौ. रश्मी बागल यांच्यासह इतर उमेदवारांचे अर्ज विलासराव घुमरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात येणार आहेत. तसेच माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काही उमेदवारांनी आधीच अर्ज दाखल केले असून, उर्वरित उमेदवारांचे अर्ज बुधवारी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाकडूनही समर्थक कार्यकर्त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्या पक्षाकडूनही शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत.
एकूणच करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तिरंगी की चौरंगी होणार, याबाबतचे स्पष्ट चित्र बुधवारी उमेदवारी अर्जांची अंतिम संख्या जाहीर झाल्यानंतर समोर येणार आहे. गटातटाच्या राजकारणाला यंदा पक्षीय स्वरूप प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून, सर्व प्रमुख राजकीय गटांकडून रणनीती आखून जोरदार तयारी सुरू असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…