आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जगताप गट या निवडणुकीपुरता तटस्थ राहणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी केली. करमाळा तालुक्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व गोंधळ लक्षात घेता, पक्षातील वरिष्ठांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जगताप गटाच्या मतदारांनी आपल्या गावाचा व परिसराचा सर्वांगीण विकास करणाऱ्या योग्य उमेदवारालाच मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयवंतराव जगताप म्हणाले की, “सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात निष्ठा, शब्द आणि तत्त्व यांना फारसे स्थान उरलेले नाही. भ्रष्टाचार, बंडखोरी, लक्ष्मीदर्शन, बेईमानी तसेच ताटली–बाटलीच्या राजकारणाला उधाण आले आहे. सोनं आडगळीला पडलं तरी त्याची किंमत कमी होत नाही. आज जरी पितळ चमकत असल्यासारखं वाटत असलं, तरी शेवटी ते पितळच असतं.”
ते पुढे म्हणाले की, “जनतेची सेवा करण्यासाठी सत्तेतच असावं लागतं, असं नाही. कै. नामदेवराव जगताप व कै. आण्णासाहेब जगताप यांच्यापासून आमच्या रक्तात तत्त्व, प्रामाणिकपणा आणि दिलेला शब्द पाळण्याची शिकवण आहे. मी आजही शिवसेना पक्षातच असून पक्षाचंच काम करत राहणार आहे. मात्र, तालुक्यातील सध्याच्या राजकीय गोंधळामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपुरता तात्पुरता ‘पॉझ’ घेण्याचा निर्णय घेतला आहे.”
जगताप गटाला सुमारे ७० वर्षांची राजकीय परंपरा असल्याचे नमूद करत त्यांनी कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन केले. “योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर पुन्हा नव्या उमेदीने व ताकदीने जगताप गट उभारी घेईल, याचा मला पूर्ण आत्मविश्वास आहे,” असेही त्यांनी सांगितले.
या भूमिकेमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये नवे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, जगताप गटाची तटस्थ भूमिका आगामी निवडणुकीत महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…