Categories: करमाळा

एक एक पाऊल टाकत जाऊ काम करत राहू! महाराष्ट्राने गमावला  दिलदार, शिस्तप्रिय  विकासाभिमुख नेता- अजित दादा पवार भावपूर्ण श्रद्धांजली दादा -ॲड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी आजचा दिवस माझ्या आयुष्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वांत काळ्या दिवसांपैकी एक ठरला आहे. माझा अत्यंत आवडीचा माणूस, लाखो कार्यकर्त्यांचा आधारवड, आणि राज्याच्या विकास प्रक्रियेला दिशा देणारे माननीय अजित अनंतराव पवार (अजितदादा) काळाच्या पडद्याआड गेले, यावर अजूनही विश्वास बसत नाही. त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता काळजाचा ठोका चुकवणारी असून, संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले आहे.
सकाळपासूनच कामाची सुरुवात, प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून पुढील दिवसाचे अचूक नियोजन—हा दादांचा दिनक्रम होता. नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, स्पष्ट वक्तेपणा, स्वच्छतेची आवड, परफेक्ट नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी ही त्यांची ओळख होती. बोलणे कधी कठोर वाटायचे, पण मन मात्र अतिशय प्रेमळ आणि दिलदार होते.
शालेय जीवनापासूनची ओढ
माझ्या शालेय जीवनापासूनच माननीय अजितदादा पवार हे माझे आवडते नेते राहिले. कर्मधर्मसंयोगाने माझे पदवी शिक्षण तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथे झाले, तर त्यानंतरचे विधी शिक्षण विद्या प्रतिष्ठान लॉ कॉलेज, बारामती येथे पूर्ण झाले. त्यामुळे दादांचे कार्य जवळून पाहण्याची आणि त्यांचे विचार आत्मसात करण्याची संधी मला लाभली—आणि ती मी कधीच सोडली नाही.
दादांना विनाकारण, कामाशिवाय भेटायला येणे कधीच आवडत नसे. “सहज भेटायला आलोय” हा शब्द त्यांना खटकायचा. त्यामुळे जायचं असेल तर काही तरी काम घेऊनच—हा अलिखित नियम होता. शालेय जीवनापासूनच मनाने दादांचा कार्यकर्ता असलेला मी, कायम त्यांच्या जवळ जाण्यासाठी, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी धडपड करत राहिलो.
राजकीय प्रवास आणि जवळीक
करमाळ्याचे स्थानिक राजकारण गटातटांत विखुरलेले होते. माझी सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली असली, तरी मनात दादांच्या नेतृत्वाची ओढ कायम होती. मात्र अशा नेत्याच्या जवळ जाण्यासाठी आणि तशी राजकीय परिस्थिती निर्माण होण्यासाठी बराच काळ जावा लागला.
सन २०२२ मध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास सुरुवात केली. एकदा बोलताना मी मामासाहेबांना अजितदादांविषयीचे माझे प्रेम आणि त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझे ते शब्द त्यांनी मनात ठेवले. सोलापूर दौऱ्याच्या वेळी, दादा नेहमीप्रमाणे नगोर्लीच्या फार्महाऊसला थांबणार होते. मामासाहेबांनी मला आवर्जून बोलावले—आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय भेट घडली.
विश्वासाची संधी आणि जबाबदारी
यानंतर मामासाहेबांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या करमाळा तालुका प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली. जनसामान्यांची कामे करणे आणि पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवणे, हे या पदाचे खरे महत्त्व आहे. लहानपणापासूनची सामाजिक कार्याची आवड जपत, तालुक्यातील विविध गटांत काम करत असताना, आवडत्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला.
विकासकामांत दादांचा ठसा
चांडगाव–पोमलवाडी पुलासाठीचा आग्रह मी संजयमामांकडे धरला. मामासाहेबांनी दादांकडे सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित अधिकाऱ्यांसोबत कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. दादांनी मंत्री दत्तामामा भरणे यांनाही विशेष लक्ष देण्यास सांगितले. निधीअभावी मार्चच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्याचे आश्वासन दिले गेले.
डिकसळ–कोंढार–चिंचोली पुलासाठी ५५ कोटींचा निधी दादांनीच उपलब्ध करून दिला. जुना पूल पाडू नये, तर तो ‘हेरिटेज’ म्हणून जतन करण्यासाठी वेगळा निधी द्यावा, अशी सूचनाही त्यांनी दिली. कुगाव–शिरसोडी दरम्यानच्या पुलास मंजुरी देऊन तातडीने काम सुरू करण्यामागेही दादांचेच योगदान होते.
आपत्तीच्या काळात माणुसकी
अतिवृष्टीमुळे करमाळ्याच्या पूर्व भागात निर्माण झालेल्या परिस्थितीत दादांनी कोर्टी, संगोबा आदी भागांत प्रत्यक्ष पाहणी केली. संगोब्यात पाण्यातून चालत पाहणी करताना, तेथील पुलाचे स्ट्रक्चर बदलून नव्या पुलास तात्काळ मंजुरी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचे आवाहन केले आणि सरकारकडूनही आवश्यक सहकार्य मिळवून दिले.
कामात तडजोड नाही
विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनापूर्वी इमारतीच्या रंगछटांबाबत दादांनी स्वतः पाहणी केली. चुकीचा रंग दिसताच ठेकेदाराला झापून, कार्यक्रमापूर्वी दुरुस्ती करून घेतली. इंदापूर न्यायालयाच्या उद्घाटनावेळी गॅलरीतील अंधार त्यांच्या लक्षात येताच, “निधी वाढवू, पण काम दर्जेदार हवे,” असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.
नेता गेला, विचार राहिले
राजकीय चढ-उतार, टीका, पराभव—हे सारे दादांनी दिलदारपणे स्वीकारले. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महानगरांचा विकास होताना त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. विचारांच्या लढाईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असले, तरी पुन्हा एकत्र येण्याचे संकेत देत असतानाच, ही दुःखद घटना घडली.
आज सकाळी बारामती मतदारसंघात नियोजित सभांसाठी दादा वेळेवर निघाले होते. मात्र लँडिंगदरम्यान झालेल्या अपघातात क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. कार्यकर्त्यांचा हंबरडा, अश्रू आणि हातातील घड्याळावरून ओळख पटलेला नेता—ही वेदना शब्दांत मांडणे अशक्य आहे.
“एक एक पाऊल टाकत जाऊ… काम करत राहू!”
हा संदेश देणारे दादांचे घड्याळ आजही आम्हाला पुढे जाण्याची दिशा दाखवत आहे.
असा नेता पुन्हा होणे नाही.
माझ्या लाडक्या नेत्याला, आदरणीय अजितदादांना हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
— शोकाकुल
ॲड. अजित सर्जेराव विघ्ने
प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस
करमाळा तालुका

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago