Categories: Uncategorized

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; घरफोडी प्रकरणाचा छडा लावत तीन आरोपी अटकेत, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील सिध्दार्थनगर परिसरात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा करमाळा पोलिसांनी अल्पावधीत छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून चोरीस गेलेला सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनील रंगनाथ गोरे (वय ५४, व्यवसाय – चालक, रा. सिध्दार्थनगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर) हे दि. १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी आपल्या घरी एकटे होते. घरातील काम करताना हातातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी खराब होऊ नये म्हणून त्यांनी ती काढून दिवाणच्या गादीखाली ठेवली होती. त्यानंतर त्यांना रंभापुरा येथे ज्योतीबा देवीच्या आरतीसाठी जायचे असल्याने त्यांनी दुपारी सुमारे १२.३० वाजता घराला कुलूप लावून तेथे प्रस्थान केले. घाईगडबडीत अंगठी पुन्हा घालणे ते विसरले.
सायंकाळी सुमारे ४ वाजता घरी परतल्यानंतर त्यांनी घराचा पुढील दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता घराचा मागील दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे दिसले. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. पुढील पाहणीत कपाट उघडलेले असून त्यातील ड्रॉवर खाली पडलेले दिसले. तसेच दिवाणची गादी हलवलेली आढळली. त्यांनी कपाटातील रोख रक्कम व गादीखाली ठेवलेली सोन्याची अंगठी तपासली असता ती चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. मागील दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुरनं २९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ), ३११(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपास सुरू केला. गोपनीय बातमीदार, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला असता आरोपी करण ज्ञानदेव भोसले (वय ३२), ओंकार उर्फ दादया पप्पू रजपूत (वय २०) व एक १७ वर्षीय विधी संघर्ष बालक (सर्व रा. सिध्दार्थनगर, करमाळा, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांचा सहभाग निष्पन्न झाला.
पोलीस पथकाने तातडीने कारवाई करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून सुमारे ७५ हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी तसेच १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक (क्र. ५३८) अशपाक शेख हे करत आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंजना कृष्णा व्ही. एस. (भा.पो.से.) तसेच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोहेकॉ अजित उबाळे, पोना मनिष पवार, पोना वैभव ठेंगल, पोकॉ रविराज गटकुळ, पोकॉ अर्जुन गोसावी, पोकॉ हनुमंत भराटे, पोकॉ अमोल रंदिल व पोना शेख आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे कामगिरी बजावली आहे.
करमाळा पोलिसांच्या तत्पर व प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जाआहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

12 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

1 day ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

1 day ago