Categories: करमाळा

पोलीस बनून वृद्धेला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; करमाळा पोलिसांकडून लाखोंचे सोनं जप्त


करमाळा प्रतिनिधी 
पोलीस असल्याचे भासवून वृद्ध महिलेची फसवणूक करत सुमारे ९ लाख ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा करमाळा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले ६.५० तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
कौशल्या मोहनराव शेलार (वय ६८, रा. गणेश नगर, करमाळा) या २४ मार्च रोजी दुपारी टमटमने देवीच्या माळाकडे जात असताना टागडे मळा परिसरात दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार इसमांनी त्यांना अडवले. संबंधितांनी आपण पोलीस असल्याचे सांगत परिसरात लूटप्रकरण घडल्याचे कारण देत तपासणी सुरू असल्याचे सांगितले.
बनावट ओळखपत्र दाखवत शेलार यांना अंगावरील सोन्याचे दागिने काढून पर्समध्ये ठेवण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर “पर्समध्ये संशयास्पद वस्तू आहे” असे सांगत तपासणीच्या बहाण्याने त्यांची पर्स हिसकावून आरोपी फरार झाले.
या घटनेत दोन सोन्याच्या बांगड्या (३० ग्रॅम), एक पाटली (२५ ग्रॅम) आणि एक मिनी गंठण (१० ग्रॅम) असा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान कंबर उर्फ डंबर शहाजहान ईराणी (वय ४५, रा. श्रीरामपूर) याला अटक करण्यात आली.
चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरीस गेलेले सर्व दागिने पोलिसांकडे सुपूर्द केले. उर्वरित आरोपी अन्सेन बरकतअली ईराणी (भिवंडी), रिजवान खान जमान ईराणी व सौढा शब्बीर ईराणी (मूळ रा. भोपाळ, सध्या परळी) यांचा शोध सुरू आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग यांच्यासह अजित उबाळे, मनीष पवार, वैभव ठेंगल, हनुमंत भराटे, अर्जुन गोसावी, अमोल रंदील, अमोल पवार, रविराज गटकुळ यांनी सहभाग घेतला.दरम्यान, करमाळा पोलिसांच्या या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका: जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन

​करमाळा: प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज…

12 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

1 day ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

1 day ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

2 days ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

3 days ago