Categories: करमाळा

अधिक मासानिमित्त करमाळा शिवमय; शिव महापुराण महाकथेला अभूतपूर्व प्रतिसाद* *संत गजानन महाराज मंदिर परिसरात भक्तिरसाचा महासागर; ह.भ.प. स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांच्या अमृतवाणीतून शिवमहिमा उलगडला

करमाळा, प्रतिनिधी :
पवित्र अधिक मासानिमित्त करमाळा शहरातील संत गजानन महाराज मंदिर परिसरात सुरू असलेल्या भव्य शिव महापुराण महाकथेला करमाळा शहरासह तालुकाभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसर “हर हर महादेव”च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. संत गजानन महाराज मंदिराला बारा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सातदिवसीय आध्यात्मिक पर्वामुळे करमाळा शहर अक्षरशः शिवमय झाले आहे.
१५ मे ते २१ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या शिव महापुराण महाकथेचे निरूपण आदरणीय ह.भ.प. सुश्री स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांच्या अमृतमय, ओजस्वी आणि रसाळ वाणीतून होत आहे. कथा झांकी, संगीतमय सादरीकरण आणि प्रभावी विवेचनामुळे भाविक भक्तिरसात तल्लीन होत असून दररोज सायंकाळी ६ ते ९ या वेळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
शिव महापुराण कथेच्या प्रारंभी शुक्रवारी (दि. १५ मे) शिव महापुराण ग्रंथाची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज, टाळ-मृदंगाचा निनाद आणि “हर हर महादेव”च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच बालगोपाळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
महाकथेच्या पहिल्या दिवशी श्री गणेश कथेचे प्रभावी व रसाळ निरूपण करण्यात आले. कथा झांकीसह संगीतमय पद्धतीने सादर करण्यात आल्याने उपस्थित भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. कथेदरम्यान अध्यात्मिक ऊर्जा, भक्तिभाव आणि शिवमय वातावरण अनुभवायला मिळाले.
या महाकथेचे मुख्य यजमान सौ. संगीता खाटेर व श्री श्रेणीकशेठ खाटेर यांचे सुपुत्र ॲड. संकेत खाटेर आणि सुनबाई सौ. मोक्षा खाटेर यांनी प्रमुख भूमिका बजावली. संत गजानन महाराज मंदिर भक्त परिवाराच्या वतीने श्रीमती रंजना कुरुलकर मॅडम यांनी कथा व्यासपीठावरील ह.भ.प. स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महाकथेच्या दुसऱ्या दिवशी भगवान शिव हे सृष्टीचे मूळ असल्याचे सांगत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. “भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंतकाळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात. नामस्मरणात मोठी ताकद आहे,” असे त्या म्हणाल्या.
“मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव आठवेलच याची खात्री नसते. आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंतकाळी देव आठवणार कसा?” असा मार्मिक प्रश्न उपस्थित करत त्यांनी उपस्थितांना अध्यात्माचा संदेश दिला.
आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, “पूर्वी घरांवर ‘शुभ लाभ’ लिहिलेले असायचे, नंतर ‘सुस्वागतम’ आले आणि आता ‘कुत्र्यापासून सावध राहा’ असे फलक दिसतात. संस्कृती बदलत असली तरी संतांनी दिलेले संस्कार अजूनही टिकून आहेत. जगात अनेक देश आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत; मात्र संस्कारांच्या बाबतीत भारताची संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे.”
कथेदरम्यान त्यांनी शिव महापुराणातील विधेश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटीरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता यांचे महत्त्व स्पष्ट केले. रुद्रसंहितेमधील सती खंड, सृष्टी खंड, पार्वती खंड, कुमार खंड आणि युद्ध खंडातील विविध प्रसंग आगामी दिवसांत कथेतून साकारले जाणार असल्याचे सांगत भाविकांनी दररोज उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी निर्जीव भिंत चालविल्याचा प्रसिद्ध प्रसंग बालकलाकारांनी झांकी स्वरूपात सादर केला. या प्रसंगाला उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
कथेच्या समाप्तीनंतर प्रमुख शिवभक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यामध्ये श्री श्रेणीकशेठ खाटेर, सौ. भारती शेंडे (वैभव गॅस एजन्सी), श्री दीपक पाटणे, श्री प्रियाल अग्रवाल, श्री चक्रधर पाटील, श्री कैलास घोगरे, श्री संजय कोठारी, श्री विजय साळुंखे, श्री रवींद्र विद्वत, श्री संदीप चुंग आणि श्री चेतन किंगर यांचा सहभाग होता.
दुसऱ्या दिवसाच्या महाआरतीप्रसंगी ॲड. संकेत खाटेर, डॉ. रोहन पाटील, श्री गणेश बोरा, श्री आशिष बोरा सहपरिवार, श्री गिरीश शहा सहपरिवार, श्री कचरूलाल मंडलेचा, श्री संतोष कुलकर्णी, श्री जगदीश शिगची, श्री सुनील सुबराव महाडिक, श्री अनिलशेठ सोळंकी, श्री राजेंद्र काळे, श्री शुभम शंकर रासकर आणि श्री कमलाकर भालेराव यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
या आध्यात्मिक सोहळ्यात महिला भगिनींचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. श्रीमती रंजना कुरुलकर, सौ. आशाबाई देशमुखे, सौ. भावना गांधी, सौ. कविता नीळ मॅडम, सौ. राणी महाडिक, सौ. विणा विद्वत, सौ. संगीता गुंड, सौ. आडकर मॅडम, जी. जी. सातपुते, सौ. मनीषा कानडे, श्रद्धा जोशी, सौ. स्वाती मसलेकर, सौ. छाया देवकर, सौ. वैशाली कोळी, सौ. रत्नमाला शिंदे आणि सौ. कमल चव्हाण यांच्यासह एसटी कॉलनी व शहरातील महिलांनी आयोजन यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
ही कथा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री श्रेणीकशेठ खाटेर, श्री विठ्ठलराव भणगे, श्री जगदीश शिगची, नगरसेवक श्री दीपक चव्हाण, श्री नारायण पवार, पत्रकार श्री दिनेश मडके, नवनाथ चौधरी,श्री कचरुशेठ मंडलेचा, श्री चरणसिंग परदेशी, श्री रवींद्र विद्वत, श्री प्रदीप देवी, आडकर सर, श्री कैलास घोगरे, श्री वैभव दोशी, श्री सुरेश आटोळे, श्री गणेश महाडिक, श्री संदीप चुंग, श्री आशिष बोरा, श्री विजय देशपांडे, श्री दर्शन कुलकर्णी, श्री हनुमान परदेशी, श्री दयालसिंह परदेशी, श्री दिलीप शिरगिरे, श्री वर्धमान खाटेर, ननवरे मामा, श्री विजय बरिदे, श्री गिरीश शहा, श्री अक्षय शिंदे, श्री सुरेश चव्हाण, श्री अर्जुन गंधे, श्री संतोष कुलकर्णी, श्री नरेंद्रसिंह ठाकूर, श्री अभिराम भणगे श्री गणेश बोरा दिनेश मुथ्था आदीं विशेष परिश्रम घेत आहेत.
समितीच्या वतीने यापूर्वी भागवत कथा, रामकथा, ढोक महाराज यांची कथा तसेच कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे अनेक वेळा आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी अनुराधा दीदी यांच्या भागवत कथेचेही यशस्वी आयोजन झाले होते. त्यामुळे करमाळ्यातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक बळकट होत असल्याचे दिसून येत आहे.
श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समिती, संत गजानन महाराज मंदिर समिती, भक्त परिवार आणि एसटी कॉलनी महिला मंडळ यांच्या वतीने अधिक मासातील या पवित्र शिव महापुराण महाकथेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago