Categories: करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करा; मगच बागल गटावर टीका करा! पाटील गटाने जनतेसमोर वास्तव मांडावे; समोरासमोर चर्चेस आम्ही तयार – धनंजय डोंगरे

करमाळा प्रतिनिधी
“कोणत्याही परिस्थितीत आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणार,” अशी भीष्मप्रतिज्ञा करून सत्तेवर आलेल्या पाटील गटांनी कारखाना सुरू न होण्यामागील वास्तविक कारणे जनतेसमोर स्पष्ट करावीत. कारखाना सुरू करण्यात आलेल्या अपयशाचे खापर बागल गटावर फोडून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असून, पाटील गटाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा घणाघाती आरोप आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांनी केला.
माढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना डोंगरे म्हणाले, की आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत पाटील गटाने शेतकरी आणि सभासदांच्या हिताचे आश्वासन देत सत्ता मिळवली. निवडणुकीच्या काळात कारखाना सुरू करण्याबाबत मोठमोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सत्ता मिळून बराच कालावधी उलटून गेला तरी कारखाना सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत, याचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याऐवजी विरोधकांवर आरोप करण्याचे राजकारण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
डोंगरे पुढे म्हणाले, की बागल गट हा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनासाठी आणि विकासासाठी सकारात्मक भूमिका घेण्यास तयार आहे. कारखान्यासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीही सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. मात्र सध्याचे व्यवस्थापन आणि त्यांची भूमिका सकारात्मक नसल्यामुळे कारखान्याचे प्रश्न अधिकच गंभीर होत चालले आहेत. त्यामुळे इतरांवर टीका करण्याऐवजी कारखान्याची खरी परिस्थिती शेतकरी, सभासद आणि जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी दीदी बागल आणि युवा नेते दिग्विजय बागल यांच्या प्रयत्नांचाही उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आदिनाथ कारखान्यासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी बागल गट सकारात्मक असूनही, पाटील गट विनाकारण बागल गटावर टीका करत आहे. त्यामुळे जनतेसमोर दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पाटील गटाने आदिनाथ कारखान्याच्या प्रश्नावर समोरासमोर चर्चा करण्याची तयारी ठेवावी. आम्ही कोणत्याही वेळी खुल्या चर्चेसाठी तयार असल्याचे डोंगरे यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, मकाई सहकारी साखर कारखान्यामुळे आदिनाथ कारखाना अडचणीत आल्याचा आरोपही यावेळी फेटाळण्यात आला. मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी स्पष्ट केले की, आदिनाथ आणि मकाई या दोन्ही कारखान्यांचा परस्परांशी कोणताही संबंध नाही. मकाई कारखान्याला मिळालेला १४० कोटी रुपयांचा निधी हा केवळ मकाई कारखान्याच्या उभारणी, आधुनिकीकरण आणि विकासासाठीच वापरण्यात आला असून त्याबाबतचा संपूर्ण आराखडा साखर आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.
 मकाई कारखान्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्यक्षात मकाई सहकारी साखर कारखाना येत्या गळीत हंगामात कोणत्याही परिस्थितीत सुरू करण्याचा व्यवस्थापनाचा निर्धार असून त्यासाठी आवश्यक सर्व तयारी सुरू आहे.
साखर उद्योग अनेक अडचणींचा सामना करीत असताना शेतकरी, सभासद आणि कामगारांच्या हितासाठी कारखाने सक्षमपणे चालविणे ही काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण करण्यापेक्षा सर्व घटकांनी एकत्र येऊन कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू निळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

saptahikpawanputra

Recent Posts

मानवता हाच खरा धर्म मध्यरात्री महामार्गावर शंभूराजे जगताप ठरले देवदूत; समयसूचकतेमुळे गंभीर जखमीचे वाचले प्राण

​करमाळा प्रतिनिधी  'संकटाच्या वेळी धावून जाणे आणि अनोळखी व्यक्तीच्या जीवाची पर्वा करणे' हीच खरी लोकसेवा…

6 hours ago

पवार जनरल हॉस्पिटलच्या विशेष आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३४० हून अधिक रुग्णांची तपासणी ऑर्थोपेडिक दंत तज्ज्ञ डॉक्टरांसह संपूर्ण टीमच्या सेवाभावाचे कौतुक

करमाळा प्रतिनिधी पवार जनरल हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले विशेष आरोग्य शिबिर नागरिकांच्या उत्स्फूर्त…

1 day ago

शिष्यवृत्ती परीक्षेत उर्दू शाळेच्या विद्यार्थिनींची चमकदार कामगिरी; मौलाना अबुल कलाम आझाद फाउंडेशनतर्फे सन्मान

करमाळा : प्रतिनिधी — करमाळा शहरातील कै. नामदेवराव जगताप नगरपालिका उर्दू शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत…

1 day ago

करमाळ्यात रंगणार उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार … कृषीमंत्री मा.ना.दत्तात्रयमामा भरणे व मा.आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन.

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या…

1 day ago