मांगी तलावातील पाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासाठी वळविण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधितांची भूमिका जाणून घेतली जाईल. त्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात येणार असून, तोपर्यंत या प्रस्तावित निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ. रश्मीदिदी बागल यांनी सांगितले. या निर्णयामुळे करमाळा तालुक्यातील तेरा गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मांगी तलावातील पाणी वळविण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सौ. रश्मीदिदी बागल यांनी आज जलसंपदा मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा तालुक्याच्या पाणीहक्काबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी मांगी तलावावर अवलंबून असलेल्या तेरा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गांभीर्याने मांडला. भविष्यातील वाढती पाणीगरज लक्षात घेता कोणताही निर्णय घेताना स्थानिक नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणी त्यांनी केली.
सौ. बागल यांनी निवेदनात नमूद केले की, मांगी तलाव हा करमाळा तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत असून हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज या तलावातून भागविली जाते. अशा परिस्थितीत तलावातील पाणी अन्यत्र वळविण्यात आल्यास भविष्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक परिस्थितीचा आणि नागरिकांच्या गरजांचा सखोल विचार होणे आवश्यक आहे.
यावेळी त्यांनी या प्रश्नावर विधायक आणि दीर्घकालीन पर्यायही शासनासमोर मांडला. मांगी तलावाची साठवण क्षमता वाढवून ती दीड टीएमसीपर्यंत करण्यात यावी. त्यापैकी एक टीएमसी पाणी करमाळा तालुक्यासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावे, तर उर्वरित अर्धा टीएमसी पाणी अहिल्यानगर जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयासाठी उपलब्ध करून द्यावे. या माध्यमातून दोन्ही भागांच्या गरजा पूर्ण होऊन कोणत्याही भागावर अन्याय होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निवेदनाची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधित पक्षांची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. बैठकीत सर्व बाजू ऐकून, वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत प्रस्तावित निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याची माहिती सौ. रश्मीदिदी बागल यांनी दिली.
या घडामोडींमुळे करमाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी सर्वपक्षीय बैठकीत करमाळा तालुक्याच्या पाणीहक्काचे संरक्षण करताना विकासकामांनाही न्याय देणारा समतोल आणि कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सौ. रश्मीदिदी बागल यांनीही करमाळा तालुक्याच्या पाणीहक्काबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे.
* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…
करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…
करमाळा प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…
करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…
सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…
करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…