Categories: करमाळा

करमाळ्याच्या शेतकऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम राजे रावरंभा शेतकरी कंपनीला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा ‘कृषी निर्यात राज्यस्तरीय पुरस्कार–२०२६ प्रदान

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना एकत्र आणून आधुनिक शेती, कृषी निर्यात आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणाऱ्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीला वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा ‘कृषी निर्यात पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला. कृषी दिनाचे औचित्य साधून बुधवार (दि. १ जुलै) रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात कंपनीचा गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे करमाळा तालुक्याच्या कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण वाटचालीला राज्यस्तरावर मोठी मान्यता मिळाली आहे.
राज्यात कृषी, ग्रामीण विकास, कृषी प्रक्रिया, निर्यात आणि शेतकरी सक्षमीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १८ व्यक्ती व संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीची निवड ही तिच्या उत्कृष्ट कृषी निर्यात कामगिरी, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांच्या आधारे करण्यात आली. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि ३५ हजार रुपयांचा धनादेश असे होते.
महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र बारवाले, सचिव दीपक पाटील, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, डॉ. बकुल पटेल, माजी आमदार मुश्ताक अंतुले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत तुळवे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाबार्ड व कृषी विभागाच्या १० हजार एफपीओ प्रकल्पांतर्गत स्थापन झालेल्या राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने अत्यंत कमी कालावधीत राज्यभरात वेगळी ओळख निर्माण केली आहे. करमाळा तालुक्यातील तब्बल ७५६ सक्रिय शेतकऱ्यांना एकत्रित करत कंपनीने ३३ लाख रुपयांचे भागभांडवल उभारले असून ५ कोटी रुपयांहून अधिक वार्षिक उलाढाल गाठली आहे. शेतकऱ्यांना बाजारपेठ, तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाची जोड देत सामूहिक शेती व्यवस्थापनाचे प्रभावी मॉडेल कंपनीने उभे केले आहे.
डिसेंबर २०२२ मध्ये पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने दुबई येथे केळीचा कंटेनर यशस्वीपणे निर्यात करून कंपनीने करमाळा तालुक्याच्या कृषी इतिहासात नवा अध्याय लिहिला. स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पादनाला थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यात ही कामगिरी महत्त्वाची ठरली. या ऐतिहासिक यशाची दखल केंद्र सरकारने घेत १५ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी कंपनीच्या अध्यक्षांना विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित केले होते.
जागतिक दर्जाची निर्यात व्यवस्था उभारण्यासाठी कंपनीने विप्रो, ट्रायडेंट आणि एस. के. यांसारख्या नामांकित आंतरराष्ट्रीय निर्यातदार कंपन्यांशी थेट व्यावसायिक करार केले आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार योग्य दर आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध होत आहे.
केवळ निर्यातीपुरतेच नव्हे तर आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीतही कंपनीने मोठी झेप घेतली आहे. करमाळा–कुडूवाडी मार्गावरील स्वतःच्या एक एकर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे पॅक हाऊस, बायोमासवर चालणारे कोल्ड स्टोरेज, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित हवामान केंद्र, ६० टन क्षमतेचा डिजिटल वजन काटा, ड्रोन सेवा तसेच आधुनिक कृषी अवजारे बँक उभारण्यात आली आहे. या सुविधांमुळे शेतमालाची गुणवत्ता टिकविणे, काढणीनंतरचे नुकसान कमी करणे आणि निर्यातीसाठी आवश्यक दर्जा कायम ठेवणे शक्य झाले आहे.
विशेष म्हणजे, कंपनीच्या कार्याची दखल घेत वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या पुरस्कार निवड समितीने कोणताही अर्ज किंवा प्रस्ताव न मागवता थेट पुरस्कारासाठी निवड केली. ही बाब कंपनीच्या कामावरील विश्वास आणि गुणवत्तेची पोचपावती मानली जात आहे.
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांना संघटित करून आधुनिक कृषी व्यवस्थापन, निर्यात, मूल्यवर्धन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाचे नवे मॉडेल उभे केले आहे. त्यामुळे मिळालेला हा पुरस्कार केवळ कंपनीचा नव्हे, तर करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या कष्टांचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याची भावना कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
चौकट : ‘प्रस्ताव नव्हे, कामगिरी पाहून पुरस्कार’
राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या पुरस्कार समितीने कोणताही प्रस्ताव न मागवता थेट कंपनीची निवड केली. राज्यातील कृषी निर्यात, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतकरी संघटन आणि मूल्यवर्धन या क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानामुळे कंपनीच्या यशस्वी वाटचालीवर या प्रतिष्ठित पुरस्काराने मानाची मोहोर उमटली आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

3 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

4 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

5 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

5 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

6 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

6 days ago