गावाचा विकास हा केवळ कागदोपत्री योजनांमधून नव्हे, तर गावातील नागरिकांच्या प्रत्यक्ष अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या प्रयत्नातून साध्य होतो. याच उद्देशाने पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित सर्जेराव विघ्ने यांनी सुरू केलेल्या गावभेट दौऱ्याला सुरुवात केली असून, या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी गोयेगाव येथे त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधत गावातील विविध विकासकामे, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या अडचणींचा सविस्तर आढावा घेतला.
ॲड. विघ्ने सकाळी लवकरच गोयेगाव येथे पोहोचले. त्यांच्या गावभेटीच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, आशा सेविका, बचत गटांच्या प्रमुखांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या चर्चेत गावाची लोकसंख्या, पाणीपुरवठा, रस्ते, स्मशानभूमी, दलित वस्ती योजना, वीज, महिला व बालकल्याण, एसटी महामंडळ, महावितरण, पुरवठा विभाग, आयुष्यमान कार्ड तसेच वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांबाबत माहिती घेण्यात आली. या योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनही ॲड. विघ्ने यांनी केले.
गोयेगाव हे पुनर्वसित ग्रामपंचायत असून पुनर्वसन विभागाकडून मंजूर असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे काम निधीअभावी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी जुन्या व्यायामशाळेच्या इमारतीमध्येच ग्रामपंचायत कार्यालय सुरू केले आहे. गावाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक असल्याचे गावभेटीदरम्यान प्रकर्षाने जाणवले.
गावातील जुनी पाणीपुरवठा योजना मोडकळीस आली असून नवीन जलजीवन योजनेचे कामही अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भविष्यात पाणीपुरवठ्याची अडचण निर्माण होऊ नये यासाठी जलजीवन योजनेचे काम तातडीने व प्रभावीपणे पूर्ण करण्याची गरज असल्याचे ॲड. विघ्ने यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी बसविण्यात आलेल्या आरओ फिल्टर संचामुळे नागरिकांना चांगल्या प्रतीचे पाणी उपलब्ध होत असल्याचेही दिसून आले.
गोयेगावच्या ग्रामस्थांनी नदीपात्राशेजारी मोठ्या परिश्रमातून स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून घेतली असून तेथे निवारा शेड उभारण्यात आले आहे. मात्र, भविष्यातील गरज लक्षात घेता स्मशानभूमीसाठी आणखी वाढीव जागा आवश्यक आहे. तसेच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले.
गोयेगावच्या जिल्हा परिषद शाळेने वेधले लक्ष
गावभेटीदरम्यान ॲड. अजित विघ्ने यांनी गोयेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिलेली भेट विशेष ठरली. ग्रामीण भागातील शाळा असूनही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याबरोबरच शाळेचा संपूर्ण परिसर हिरवाईने नटविण्यात आला आहे. परसबाग, औषधी वनस्पती तसेच विविध झाडांचे संवर्धन करून शाळेने पर्यावरणपूरक वातावरण निर्माण केले आहे.
विद्यार्थ्यांना देण्यात येणारा शालेय पोषण आहार दर्जेदार असून स्वयंपाकगृहातील स्वच्छताही समाधानकारक असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व मुतारीची व्यवस्था, तसेच सुसज्ज सायन्स हॉल ही शाळेची वैशिष्ट्ये आहेत. स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून शिक्षक गिरी सर व तोरमल सर विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने ज्ञानदानाचे काम करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा शोध घेऊन त्यांना योग्य संधी देण्याचे काम शिक्षकांकडून केले जात असून ग्रामस्थांचेही शाळेला चांगले सहकार्य मिळत आहे. ग्रामीण भागातील या शाळेतील विद्यार्थ्यांची प्रगती आणि शाळेचा परिसर पाहून ॲड. विघ्ने यांनी समाधान व्यक्त केले. आधुनिक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या माध्यमातून गोयेगावची जिल्हा परिषद शाळा ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अंगणवाडी व वस्त्यांवरील रस्त्यांचाही प्रश्न
प्राथमिक शाळेच्या परिसरात सध्या दोन अंगणवाड्यांचे कामकाज सुरू असून मुलांना देण्यात येणाऱ्या आहाराची योग्य काळजी घेतली जात असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. मात्र, घाडगे वस्ती येथील अंगणवाडीची स्वतंत्र इमारत तातडीने उभारणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. सध्या तेथील मुले गावातील एका वर्गात बसत असल्याने स्वतंत्र इमारतीची गरज आहे.
गावाच्या पूर्वेकडील पाटील वस्ती, पवार वस्ती, शेंडगे वस्ती आणि गायकवाड वस्ती येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे वास्तव्य आहे. या वस्त्यांकडे जाणारे रस्ते चांगले होणे गरजेचे असल्याची मागणी ग्रामस्थांनी केली. पवार वस्ती येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या वस्ती शाळेलाही ॲड. विघ्ने यांनी भेट देऊन पाहणी केली. शाळेची इमारत सुसज्ज असून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाधानकारक आहे. शिक्षकांचे ज्ञानदानाचे कामही चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले.
वृक्षारोपण व मंदिर परिसराचेही कौतुक
गोयेगावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन केल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिर परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले आहे. गावातील पुरातन श्री हनुमान मंदिरासह इतर मंदिरे सुस्थितीत असून त्यांचा परिसर स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्यात आला आहे.
ठप्प बचत गटांना पुन्हा उभारी देण्याचे आवाहन
महिला बचत गटांच्या बाबतीत मात्र अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे या दौऱ्यात स्पष्ट झाले. गावातील एकूण सात बचत गटांचे कामकाज सध्या ठप्प असल्याने ते पुन्हा कार्यान्वित करण्याबरोबरच नव्याने बचत गट स्थापन करण्यासाठी ॲड. विघ्ने यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास गावाच्या विकासालाही मोठी चालना मिळू शकते, त्यामुळे बचत गटांचे पुनरुज्जीवन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी बससेवा सुरू करण्यासाठी महामंडळाला सूचना
गोयेगाव येथे सध्या एसटी बससेवा उपलब्ध नसल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी मांडला. विद्यार्थ्यांसह नागरिकांना यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन एसटी महामंडळाला तातडीने आवश्यक सूचना देण्यात आल्याचे ॲड. विघ्ने यांनी सांगितले.
गावभेटीदरम्यान ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागांच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, पाणीपुरवठा योजना, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, मंदिरे, रस्ते आणि इतर सार्वजनिक ठिकाणांची स्वतंत्र छायाचित्रे संकलित करून संपूर्ण माहितीसह स्वतंत्र फाईल तयार करण्यात आली आहे.
गावभेट दौरा हा केवळ पाहणीपुरता मर्यादित न ठेवता ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर पाठपुरावा करण्याचा उपक्रम आहे. गावातील नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला गांभीर्याने घेऊन संबंधित विभागांच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी भूमिका ॲड. अजित विघ्ने यांनी व्यक्त केली.
ॲड. विघ्ने यांच्या या उपक्रमाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, स्थानिक अधिकारी-कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका-मदतनीस तसेच युवकांनी कौतुक केले. प्रत्यक्ष गावात येऊन समस्या जाणून घेणाऱ्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
— ॲड. अजित सर्जेराव विघ्ने
उपसभापती, पंचायत समिती करमाळा
करमाळा प्रतिनिधी: अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये…
करमाळा प्रतिनिधी: गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेतकरी वर्ग सातत्याने अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे.…
करमाळा प्रतिनिधी बैलपोळा हा केवळ बैलांच्या पूजनाचा सण नसून, कृषीसंस्कृती, पशुप्रेम, कृतज्ञता आणि भारतीय परंपरेतील…
* करमाळा प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत…
करमाळा प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरे…