Categories: Uncategorized

पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या गावभेटीत कोंढार-चिंचोलीच्या विकासाची सकारात्मक वाटचाल अधोरेखित! शाळेची गुणवत्ता, ग्रामस्थांचा एकोपा आणि स्वच्छतेचे कौतुक; पाणी, रस्ते व एसटी सेवेसाठी ठोस पाठपुराव्याचा निर्धार

करमाळा प्रतिनिधी 
कोंढार-चिंचोली, ता. करमाळा : ‘आपलं गाव-आपला विकास’ या उपक्रमांतर्गत अॅड. अजित विघ्ने यांनी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे गाव असलेल्या कोंढार-चिंचोलीला भेट देऊन गावातील विकासकामे, शैक्षणिक प्रगती आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांची पाहणी केली. गावात आगमन होताच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिमच्या ठेक्यात केलेले उत्स्फूर्त स्वागत विशेष लक्षवेधी ठरले. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांमध्ये असलेली एकजूट आणि सकारात्मक वातावरण पाहून अॅड. विघ्ने यांनी समाधान व्यक्त केले.
कोंढार-चिंचोली हे भिगवण, बारामतीसारख्या शहरी भागांच्या जवळ असून परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध असतानाही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थी पटसंख्या चांगली आहे, ही विशेष अभिमानाची बाब असल्याचे अॅड. विघ्ने यांनी नमूद केले. शाळेने विविध पुरस्कार मिळविले असून येथील विद्यार्थ्यांनीही विविध स्तरांवर विशेष प्रावीण्य मिळविले आहे. शिक्षकांचे योगदान आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच परिसर विकासाचेही एक चांगले उदाहरण निर्माण केले आहे.
शाळेसमोरील क्रीडांगण, यानाची आकर्षक प्रतिकृती, झाडांनी तयार केलेली सुंदर कमान, सुसज्ज सायन्स हॉल, वाचनालय तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे यांची पाहणी करताना शाळेतील विद्यार्थ्यांचे भाषा ज्ञान आणि गणित विषयातील प्रगतीही विशेष जाणवली. गोयेगावच्या शाळेत गेल्यानंतर जशी सकारात्मक अनुभूती मिळाली, तशीच अनुभूती कोंढार-चिंचोलीच्या शाळेतही आल्याचे अॅड. विघ्ने यांनी सांगितले. या शाळेच्या प्रगतीमागे शिक्षकांची मेहनत आणि ग्रामस्थांचे सहकार्य अत्यंत मोलाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
गावातील अंगणवाड्याही विविध सुविधांनी सुसज्ज असल्याचे पाहायला मिळाले. शिक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत गावाने केलेली प्रगती निश्चितच कौतुकास्पद असल्याचे अॅड. विघ्ने यांनी नमूद केले. विशेष म्हणजे गावाच्या विकासकामांमध्ये राजकीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामस्थ एकत्रितपणे काम करत असल्याचे चित्र दिसून आले. हीच एकजूट गावाच्या भविष्यातील विकासाला अधिक गती देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोंढार-चिंचोलीची स्मशानभूमीही स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीने उल्लेखनीय आहे. परिसरातील झाडे, नागरिकांसाठी करण्यात आलेली बसण्याची व्यवस्था आणि अन्य सुविधांमुळे स्मशानभूमीलाही प्रसन्न वातावरण प्राप्त झाले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणताना ग्रामस्थांनी दाखविलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे अॅड. विघ्ने यांनी सांगितले.
दरम्यान, उजनीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. कोंढार-चिंचोलीमध्ये फिल्टरचे पाणी वापरण्याची व्यवस्था असली तरी उजनीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेत प्रभावी फिल्टरेशनची सुविधा उपलब्ध नाही. नदीपात्रातील प्रदूषित पाण्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने या प्रश्नाकडे ग्रामपंचायतींसह शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्या, औद्योगिक आस्थापना आणि नगरांच्या सांडपाणी व्यवस्थेवर प्रभावी नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उजनीकाठच्या प्रत्येक गावासाठी विशेष निधी उपलब्ध करून आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रणा उभारावी, यासाठी ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून शासनदरबारी आवाज उठवावा, अशी भूमिका अॅड. विघ्ने यांनी मांडली. कंपन्या व स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सीएसआर निधीच्या माध्यमातून उजनीकाठच्या गावांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. या निधीतून पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावता येईल.
पुनर्वसन गाव असल्यामुळे कोंढार-चिंचोलीमध्ये अंतर्गत रस्त्यांचे मजबुतीकरण, बंदिस्त गटार योजना आणि इतर मूलभूत सुविधांची कामे होणे आवश्यक आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी गावात सुरू असलेले नियोजन अधिक प्रभावी करण्याची गरज असून, युवकांसाठी ओपन जिम उभारण्याचीही आवश्यकता आहे. आण्णाभाऊ साठे नगरातील दलित वस्तीमधील जुनी पाण्याची टाकी दुरुस्त करणे तसेच जुन्या ग्रामपंचायत इमारतीची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे अॅड. विघ्ने यांनी निदर्शनास आणून दिले.
तालुक्याच्या पश्चिम टोकावरील गाव असूनही कोंढार-चिंचोलीपर्यंत एसटी बससेवा पोहोचत नसल्याची खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठी नियमित एसटी सेवा अत्यावश्यक आहे. ग्रामस्थांची मागणी असूनही एसटी महामंडळाकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने या प्रश्नासाठी प्रशासन आणि एसटी महामंडळाकडे ठोस पाठपुरावा करण्याची भूमिका अॅड. विघ्ने यांनी व्यक्त केली.
कोंढार-चिंचोलीच्या विकासाची आणि येथील जिल्हा परिषद शाळेची दखल खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही घेतली असून त्यांनी शाळेला आवर्जून भेट दिली आहे. शाळेच्या उपक्रमांचे तसेच गावातील सकारात्मक कामाचे त्यांनी कौतुक केले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शिक्षकांच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळाले आहे.
‘गावात एकी आहे, विकासाची इच्छाशक्ती आहे आणि प्रगतीची दिशा स्पष्ट आहे,’ असे चित्र कोंढार-चिंचोलीच्या गावभेटीत अॅड. अजित विघ्ने यांना अनुभवायला मिळाले. शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, सार्वजनिक सुविधा आणि सामाजिक एकोपा या क्षेत्रांत गावाने निर्माण केलेली सकारात्मक ओळख निश्चितच कौतुकास्पद आहे. काही मूलभूत प्रश्न प्रलंबित असले तरी ग्रामस्थांची एकजूट आणि विकासाची सकारात्मक मानसिकता पाहता कोंढार-चिंचोली भविष्यात आणखी प्रगतिपथावर जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे गाव आपल्या केत्तूर पंचायत समिती गणातील असल्याचा निश्चितच अभिमान असल्याचे अॅड. अजित विघ्ने यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

भाजपच्यावतीने भव्य ‘दहीहंडी’ उत्सव; करमाळ्यात सिनेमॅटिक रील्स स्पर्धेची रंगत तरुणाईच्या कलागुणांना मिळणार व्यासपीठ; विजेत्यांना १५ हजार, ७ हजार व ३ हजार रुपयांची रोख पारितोषिके

करमाळा प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दहीहंडी उत्सवानिमित्त करमाळ्यात ‘सिनेमॅटिक रील्स स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले…

45 mins ago

करमाळा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ६ लाख ३० हजारांचे २८ गहाळ मोबाईल शोधून तक्रारदारांना परत CEIR पोर्टल व तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर नागरिकांमध्ये समाधान

करमाळा प्रतिनिधी: मोबाईल हरवल्यानंतर तो परत मिळण्याची शक्यता कमी असल्याचे अनेक नागरिकांना वाटते; मात्र आधुनिक…

1 hour ago

डॉक्टरकीसोबत फिटनेसचा आदर्श; भोसले दाम्पत्याची सातारा हिल मॅरेथॉनमध्ये चमकदार कामगिरी २१ किलोमीटरची खडतर हिल हाफ मॅरेथॉन दुसऱ्यांदा पूर्ण; दमट हवामानावर मात करत जिद्द, चिकाटीचे दर्शन

करमाळा प्रतिनिधी : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच आरोग्यदायी जीवनशैली, नियमित व्यायाम आणि फिटनेसचे महत्त्व…

2 hours ago

मायेची सावली हरपली; आठवणींचा ठेवा कायमचा सोबत कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ११ सप्टेंबरला तरटगावात हरी किर्तन

करमाळा प्रतिनिधी: प्रेम, माया आणि आपुलकीने माणसांना जोडून ठेवणारे कै. डॉ. प्रदीपकुमार (आबा) जाधव-पाटील यांच्या…

1 day ago

हिंगणी गाव स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज होणार ॲड. अजित विघ्ने यांच्याकडून गावातील विकासकामांची पाहणी; वृक्षारोपणासह विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

करमाळा प्रतिनिधी केत्तूर पंचायत समिती गणातील मौजे हिंगणी गावाला भविष्यात ‘स्मार्ट आणि ग्रीन व्हिलेज’ बनविण्यासाठी…

2 days ago