Categories: Uncategorized

करमाळा पोलिसांचा दणका ट्रॅक्टर चोरीचा छडा; ३.७५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वीट येथील शेतातून ट्रॅक्टर लंपास; तांत्रिक तपासातून दोघे ताब्यात

करमाळा प्रतिनिधी
वीट (ता. करमाळा) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून चोरीस गेलेला सोनालीका कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा करमाळा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत शोधून काढला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.
वीट येथील शेतकरी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३) यांच्या गट क्रमांक ८१३ मधील शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर उभा करण्यात आला होता. २५ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते २६ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा चोरी करून नेला.
ट्रॅक्टर चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर गाडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण विभागाने तपासाला वेग दिला.
पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीबरोबरच तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान दिपक रामदास बरडे (वय ३२, रा. चिखलठाण नं. १, ता. करमाळा, जि. सोलापूर, मूळ रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) आणि आकाश रामदास बरडे (वय २६, रा. अमळनेर (भांडाचे), ता. पाटोदा, जि. बीड) यांची नावे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर चोरीस गेलेला ट्रॅक्टर आणि पाळीचा मोगडा हस्तगत करण्यात आला.
हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोनालीका कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (आरटीओ क्रमांक एमएच ४५ एफ ८०१९) आणि २५ हजार रुपये किमतीचा पाळीचा मोगडा यांचा समावेश आहे. ट्रॅक्टरचा चेसिस क्रमांक DZYSW259723/3, तर इंजिन क्रमांक 310E1131260490F3 असा आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
शेतीसाठी अत्यावश्यक असलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण होत असताना करमाळा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून चोरीचा मुद्देमाल शोधून काढल्याने शेतकरी गाडे यांना दिलासा मिळाला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस. आणि करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हणुमंत जाधव, पोलीस नाईक वैभव ठेंगल, पोलीस कॉन्स्टेबल इसामिया बहिरे,रविराज गटकुळ, अमोल रंदिल, योगेश येवले, अर्जुन गोसावी, गणेश शिंदे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जाहिरान नाईकवाडी यांनी सहभाग घेतला आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनासाठी संजयमामा शिंदे ॲक्शन मोडवर! पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आवर्तन एक महिना अगोदर सुरू करण्याची मागणी

  करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…

3 days ago

करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे सचिन (मालक) गायकवाड यांच्या हस्ते दिमाखात उद्घघाटन

करमाळा (प्रतिनिधी) : करमाळा शहरातील दिव्यरत्न सिटी येथे चॅम्पियन क्लब हाऊसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या…

5 days ago

ऊसदर आणि अतिवृष्टी अनुदानासाठी १३ नोव्हेंबर रोजी करमाळ्यात शेतकऱ्यांची बैठक; आंदोलनाची दिशा ठरणार – राजाभाऊ कदम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६…

7 days ago

दुष्काळात मुक्या जीवांसाठी कै बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानचा माणुसकीचा झरा सात वर्षांपासून वन्यजीवांसाठी चारा-पाण्याची अखंड सेवा

करमाळा प्रतिनिधी दुष्काळाच्या झळा केवळ माणसांनाच सोसाव्या लागत नाहीत, तर जंगलातील मुके वन्यजीवही पाण्याच्या थेंबासाठी…

7 days ago