करमाळा प्रतिनिधी
उजनी जलाशयात ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. कीर्ती रामचंद्र ढवरे (वय २६, रा. वांगी नं. १, ता. करमाळा) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा गळा आवळून खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह उजनी जलाशयात फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील भगवान महादेव कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आठ जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम, तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेजची पाहणी आणि नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अवघ्या दोन दिवसांत या गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात करमाळा पोलिसांना यश आले.
दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मौजे बिटर्गाव (वांगी), ता. करमाळा येथील नागनाथ राखुंडे यांच्या शेताजवळ उजनी जलाशयात अंदाजे २८ वर्षे वयोगटातील महिलेचा मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपासासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजित माने यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली.
मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, पुणे ग्रामीण, पुणे शहर, अहिल्यानगर, धाराशिव, बीड आणि लातूर या आठ जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. त्याचबरोबर उजनी जलाशयातील बंडगार वस्ती, बोळकरी ते शहा परिसरातून येणाऱ्या लाँच व बोटींची माहिती घेण्यात आली. प्रवासी तसेच मासेमारी करणाऱ्या नागरिकांकडे चौकशी करण्यात आली. लाँच व बोटींच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मृत महिलेच्या अंगावरील कपडे आणि ब्लँकेटमधील कपड्यांची बारकाईने पाहणी करण्यात आली. या तपासातून पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि मृत महिलेची ओळख कीर्ती रामचंद्र ढवरे अशी निष्पन्न झाली.
त्यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाइकांचा शोध घेतला असता तिची आई रूपाली सुखदेव चांदणे या कांडलगाव, ता. इंदापूर, जि. पुणे येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्याकडे चौकशी केली असता भगवान महादेव कांबळे याच्याविरुद्ध यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली. तसेच यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यातील तक्रार मागे घेण्यासाठी संबंधित महिलेला धमकी दिल्याची बाबही तपासात पुढे आली. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून संशयिताचा शोध सुरू केला.
मृत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९००३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८(ए), २३८(बी) व ३५१(२) प्रमाणे दि. ७ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथक कार्यरत केले. तांत्रिक माहिती, उपलब्ध पुरावे आणि विविध ठिकाणी केलेल्या चौकशीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. भगवान महादेव कांबळे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलीस प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर करीत आहेत.
या संपूर्ण तपास मोहिमेत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर, दुय्यम पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार दुश्यंत ढेंबरे, अलिम मलिक शेख, मयूर गव्हाणे, पोलीस नाईक चंद्रकांत गोरे, गणेश शिंदे, अर्जुन गोसावी, योगेश येवले, अमोल बागल तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल जहीरान नाईकवाडी यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते आरोपीला अटक करण्यापर्यंत करमाळा पोलिसांनी दाखविलेली तत्परता आणि विविध जिल्ह्यांतील पथकांशी साधलेला समन्वय यामुळे या गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
करमाळा प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी व कठोर…
करमाळा प्रतिनिधी पंचायत समिती करमाळा कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा परिषद…
करमाळा (प्रतिनिधी) :- ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावून त्या उत्कृष्ट व…
करमाळा प्रतिनिधी भारतीय संस्कृतीत गोमातेला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान असून, गोसेवा ही श्रद्धा, संस्कार…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (टें.) येथील आदर्श सरपंच तथा विठ्ठल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक श्री. यशवंत संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील कमलाभवानी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य श्री. बाळासाहेब…