जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ग्रामीण भागातील मुलीही यशाची उत्तुंग शिखरे गाठू शकतात, हे करमाळा तालुक्यातील देवीचामाळ येथील कन्या ऐश्वर्या पदमाकर सूर्यपुजारी यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या लोकार्पण सोहळ्यात मेट्रोचे सारथ्य करण्याचा मान त्यांना मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात ऐश्वर्या यांनी मेट्रो ट्रेन पायलट म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
ऐश्वर्या यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा येथे झाले. त्यानंतर पंढरपूर येथील नामांकित स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर मेट्रो क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी कठोर परिश्रम घेतले. जिद्द, चिकाटी आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी मेट्रो सेवेत आपले स्थान निर्माण केले. यापूर्वी त्यांची ट्रेन कंट्रोलर म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यात ट्रेन पायलट म्हणून मेट्रो चालविण्याची महत्त्वपूर्ण संधी त्यांना मिळाली.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोचे सारथ्य करण्याचा बहुमान मिळणे ही ऐश्वर्या यांच्या आयुष्यातील अभिमानास्पद घटना ठरली आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मेट्रोसारख्या महत्त्वाच्या वाहतूक व्यवस्थेत जबाबदारी सांभाळताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिली आहे.
ऐश्वर्या यांच्या या यशाची बातमी देवीचामाळ गावासह करमाळा तालुक्यात पोहोचताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून त्यांच्या यशाचा आनंद साजरा केला. एका ग्रामीण कुटुंबातील कन्येने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुण्याच्या मेट्रोचे सारथ्य करण्यापर्यंत घेतलेली झेप सर्वांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
ग्रामीण भागातील मुलींनीही मोठी स्वप्ने पाहावीत, आत्मविश्वासाने प्रयत्न करावेत आणि आपल्या कर्तृत्वाने यशाची शिखरे गाठावीत, यासाठी ऐश्वर्या पदमाकर सूर्यपुजारी यांचा प्रेरणादायी प्रवास दिशादर्शक ठरणार आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल करमाळा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिंती (प्रतिनिधी) : शालेय जीवनातील आठवणी आणि गुरुजनांनी दिलेले संस्कार आयुष्यभर विसरता येत नाहीत.…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्व मध्यम प्रकल्प व तलावांमध्ये अपेक्षित…
करमाळा प्रतिनिधी : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याची सृष्टी घडवते, तर समाजात रुजलेला सेवाभाव भावी…
करमाळा प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या आवर्तनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा देवीचा माळ येथील कमला भवानी देवी मंदिरासमोरील भव्य गार्डन उभा करणे…
सोलापूर, शहर प्रतिनिधी. ‘सरस ते साहित्य, समरस तो साहित्यिक’ हे ब्रीद घेऊन मराठी साहित्यविश्वात कार्यरत…