करमाळा प्रतिनिधी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन सैन्य दलात भरती व तेथील सेवेनंतर पोलिस दलात सेवा देताना ॲन्टी करप्शन ब्युरो मुंबई येथे नुकतीच उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर निवड झालेले येथील बजरंग चौगुले यांचा भटके विमुक्त जाती अदिवासी ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वातीताई माने, क्रांती माने, संग्राम माने, देवराव सुकळे, बिभिषण जाधव, राजेंद्र माने, लक्ष्मण लष्कर, शामराव ननवरे, सुभाष लष्कर, ह. भ. प. रामचंद्र काळे, बळीराम माने, औदुंबर पवार, हरिदास काळे, गोरख पवार, शिवाजी माने, धनंजय माने, प्रफुल्ल जाधव, साहिल चौगुले, चंद्रकांत पवार, हनुमंत जाधव आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला माने यांच्या हस्ते चौगुले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना माने यांनी, उपविभागीय पोलिस अधिकारी बजरंग चौगुले यांनी कठीण परिस्थितीला मागे सारुन जिद्दीने यश मिळविले आहे. चौगुले यांचा पोलिस अधिकारी पदापर्यंतचा प्रवास वंचित, उपेक्षित घटकातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. त्यांचा आदर्श घेवून इतरांनीही वाटचाल केली पाहिजे. असे मत व्यक्त केले आहे.
सत्काराला उत्तर देताना चौगुले यांनी, दगडफोडीचे काम करणाऱ्या कुटुंबातून जीवनाचा प्रवास करताना खूप अडचणी आल्या. मात्र दगडफोडीचे पारंपरिक काम करायचे नाही ठरवून कमवा अन् शिका या तत्वाचा आधार घेत शिकत राहिलो. शालेय काळात कबड्डी चांगले खेळता येत होते. त्या खेळामुळेच सैन्यदलात भरती झालो. त्याकाळात कोपरगाव भागात असताना तेथील तत्कालीन नेते शंकरराव कोल्हे यांची मोठी मदत मिळत राहिली. सैन्य दलातील सेवेनंतर सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण माने यांच्या सल्ल्याने पोलिस उपनिरिक्षक पदासाठीच्या परीक्षांची तयारी केली. तेथेही यश मिळाले. आता उपविभागीय पोलिस अधिकारी झाल्याने आनंद असून पदाचा उपयोग विकासात्मक कामासाठी करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम माने यांनी तर सुत्रसंचालन किशोरकुमार शिंदे यांनी केले. आभार विठ्ठल जाधव यांनी मानले. यावेळी एकलव्य आश्रमशाळेचे मुख्याध्यापक अशोककुमार सांगळे, भास्कर वाळुंजकर, विलास कलाल, कुमार पाटील, उमेश गायकवाड, सैदास काळे, दादा वाघमारे आदि उपस्थित होते.