Categories: करमाळा

आदिनाथ बचाव मोहीम: विवेक येवले यांनी उपस्थित केले काही प्रश्न..!

आदिनाथ बचाव मोहीम:
विवैक येवले यांनी उपस्थित केले काही प्रश्न मा.एच.बी.डांगेसो
या मुलाखतीतून तुम्ही मांडलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन! या मुलाखतीमध्ये तुम्ही मांडलेल्या मुद्यांबाबत काही शंका व प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे.त्याचे निराकरण आदिनाथ बचाव समितीच्या वतीने दि.25 मार्च रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत करावे ही अपेक्षा व विनंती!
1) तुमच्या या मुलाखतीत आम्ही सामान्य व बिगर राजकीय मंडळी अशा अर्थाचा काहीतरी उल्लेख आलेला आहे.पण तुमच्यासोबत दिसत असलेल्या शहाजीराव देशमुख सर,केरू गव्हाणे,डाॅ.वसंतराव पुंडे यांना अराजकीय कसं म्हणता येईल? देशमुख व गव्हाणे यांनी संचालक व व्हाईस चेअरमन व पुंडे यांनी संचालक म्हणून प्रदीर्घ काळ काम केलेले आहे आणि यांना संधी मिळाली ते राजकारणात कोणाचे तरी नेतृत्व पत्करले म्हणूनच ना! तुम्ही तर आदिनाथचे पहिले कार्यकारी संचालक म्हणून काम केलेले आहे शिवाय सहकारी साखर कारखानदारीमध्ये अभ्यासू,जाणकार व प्रदीर्घ अनुभव असलेले व आता निर्मोही व्यक्तिमत्त्व म्हणून तुम्हाला ओळखले जाते.त्यामुळे एकेकाळी वैभवाच्या शिखरावर असलेला आदिनाथ हा अक्षरशः दिवाळखोरीत निघालेला आहे आणि ज्या-ज्या मंडळींनी येथे वेळोवेळी सत्ता भोगली आणि ज्यांच्यामुळेच कारखान्याचे वाट्टोळे झालेले सर्वज्ञात असताना त्याच मंडळींची मोट बांधून कारखाना बचाव मोहीम राबविणे सामान्य सभासद व ऊसउत्पादक शेतकऱ्यांना पटेल का? याचा साधकबाधक विचार व्हावा.
2) पवारसाहेबांमुळे या तालुक्याची जडणघडण झाली असे म्हणणे देखील संयुक्तिक वाटत नाही.स्वातंत्र्योत्तर काळात या तालुक्याची राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,सहकार आदी जडणघडण झाली ती कै.नामदेवरावजींच्या नेतृत्वाखाली.त्यांच्या आग्रहामुळे 1966 साली यशवंतरावजींच्या हस्ते वरदायिनी उजनी धरणाची पायाभरणी झाली त्या वेळी पवार हे साधे आमदार देखील नव्हते.(प्रथम आमदारकी-1967) आणि आदिनाथची मुहूर्तमेढ सहकारमहर्षींनी रोवली ती 1971.ते आदिनाथचे प्रवर्तक,संस्थापक-चेअरमन होते.पवार हे ऐंशीच्या दशकात राज्याचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले.असो…
3) तुमच्या योजनेनुसार ठेवीदारांनी आपापल्या नावावर एफ.डी.करून आदिनाथ साठी उभारण्यात यावयाच्या कर्जासाठी आपले एन.ओ.सी.म्हणजे आपली ठेव रक्कम तारण म्हणून द्यायची.बरोबर ना? आणि असे असेल तर पुढची शंका अशी की,या नियोजनानुसार कर्जउभारणी जर झालीच आणि येत्या हंगामात कारखाना सुरू झालाच आणि तुमच्या अपेक्षेनुसार पुनर्वैभव मिळवू शकला तर तालुक्याच्या व ऊसउत्पादक,सभासदांच्या दृष्टीने ते सोनियाचे दिवस ठरतील हे नक्की! पण…दुर्दैवाने काही विपरित घडले तर मग गहाण ठेवलेल्या या ठेवींचे काय? असे जर घडलेच तर आधीच जेरीस आलेल्या या उसउत्पादक शेतकर्‍यांची अवस्था ” आगीतून उठून फुफाट्यात! ” अशीच व्हायची.आणि असे होवू नये यासाठी तुमच्याकडे काय नियोजन अथवा हमी आहे?
4) आदिनाथची सभासदसंख्या ही जवळपास 35 हजार इतकी असताना अवघ्या अडीचशे-पावणेतिनशे सभासदांनी ऑनलाईन मिटिंगमध्ये दिलेला पाठिंबा हा खरेच लोकशाहीला व लोकनिर्णयाला अनुसरून समर्थनीय आहे काय…याचेही योग्य मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
5) 23 नोव्हेंबर 1993 रोजी आदिनाथ चा प्रथम चाचणी हंगाम सुरू झाला.तेव्हापासून गेल्या अठ्ठावीस वर्षांत बागल,जगताप,नारायण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमीअधिक प्रमाणात सत्ता उपभोगलेली आहे.कै.गिरधरदास देवी,कै.रावसाहेब पाटील,कै.गोविंदबापू, डाॅक्टर आबा,वामनराव बदे,जयवंतराव,मस्करतात्या,संतोष पाटील,बागल मामी आदी मंडळींनी चेअरमन म्हणून काम केलेले आहे.आदिनाथवर आजअखेर सर्वाधिक काळ वर्चस्व व सत्ता ही कै.डिगामामा व बागल गटाचे राहिलेले आहे.या पैकी सध्या हयात असलेल्यांनी व हयात नसलेल्यांच्या वारसदारांनी आदिनाथावर हात ठेवून ग्वाही द्यावी की आम्ही आदिनाथ च्या एका रूपयाला देखील हात लावलेला नाही.आणि त्यानंतर अशी ग्वाही देणाऱ्या पुण्यशील नेते व त्यांच्या बगलबच्च्यांना बरोबर घेऊन आदिनाथ बचाव ची मोहीम सर्वानुमते राबवावी.
6) उसउत्पादक सभासद या व्यतिरिक्त आमदार संजयमामांचा आदिनाथ च्या प्रगती व अधोगतीशी कसलाही काडीमात्र संबंध आजअखेर आलेला नाही.त्यामुळे आमदार या नात्याने त्यांचेकडून काही अपेक्षा करणे हे जरी अनुचित नसले तरी बचाव मोहिम लढताना या समितीला अलिबाबा और चालीस चोर! असा चेहरा नसावा ही आदिनाथ च्या खऱ्या हितचिंतक असलेल्या उसउत्पादक शेतकर्‍यांची माफक व रास्त अपेक्षा आहे!

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा इंग्लिश स्कूल संघटनेच्या नुतन तालुका अध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती

करमाळा प्रतिनिधी  महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…

1 hour ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव यांना ‘ज्ञानज्योती आदर्श पुरस्कार’ प्रदान

करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…

2 hours ago

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबतर्फे गणेशोत्सवानिमित्त १६ सप्टेंबरला मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिराचे आयोजन – प्रशांत ढाळे

  करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…

8 hours ago

२५ सप्टेंबरपासून करमाळ्यात खत विक्रीला ‘FFS’ प्रणाली गुणनियंत्रण कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांचा विक्रेत्यांना इशारा लिंकिंग, काळाबाजार व चढ्या दराने विक्री केल्यास कडक कारवाई

करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…

24 hours ago

करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न; शासनस्तरावरील नियम-अटी व विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा

करमाळा  प्रतिनिधी करमाळा तालुका मंगल कार्यालय असोसिएशनची मासिक बैठक शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पोथरे…

1 day ago