करमाळा प्रतिनिधी सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असुन महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले शिक्षण हे तर्कबुद्धी, बुद्धीप्रामाण्यवादी आणि विवेक यांवर आधारित होते आणि हेच शिक्षण आपल्याला सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करू शकते असा आशावाद व्यक्त केला. तसेच आजच्या मूल्यविवेक हरवत चाललेल्या परिस्थितून समाजाला योग्य दिशा देण्याचे सामर्थ्य केवळ महात्मा फुले यांच्या विचारात असल्याचे प्रतिपादन प्रा. कु.सरला चव्हाण यांनी केले.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी *महात्मा फुले यांचे शिक्षण विषयक विचार* या विषयावर महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. कु. सरला चव्हाण यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, सहसचिव विक्रम सूर्यवंशी, प्रबंधक कैलास देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचा प्रारंभ महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाला.
सदर कार्यक्रमामध्ये प्राचार्य मिलिंद फंड यांनी आपल्या भाषणात उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनामध्ये तळागाळातील समाज घटकांना मदतीचा हात देण्याविषयी आवाहन केले किंबहुना हीच महात्मा फुले यांची शिकवण होती असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एल्. बी. पाटील यांनी महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले शिक्षण, समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव आजच्या पिढी ने अंगिकारले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. कृष्णा कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.नितीन तळपाडे यांनी केले.