कोणत्याही दिशेने करमाळा शहराच्या जवळ जाऊ लागताच साधारण 7-8 किलोमीटर लांबूनच श्री कमलाभवानीचे भव्य कलामंदिर आपल्या गगनचुंबी गोपूरांनी व शिखरांनी प्रवाशांचे लक्ष वेधून घेते. मुख्य शहरापासून पूर्व दिशेला हे मंदिर दिड किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर उभे आहे. या मंदिराला पूर्वेकडून आणि पाठीमागून म्हणजे पश्चिमेकडून अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. या मंदिरात जाण्यासाठी पश्चिम दिशेने अगदी तळापासून पुण्याच्या पर्वतीप्रमाणे दगडी पायऱ्यांची चढण व शेवटपर्यंत बांधलेला दगडी रस्ता आहे. पायऱ्यांच्या सुरवातीस उजव्या बाजूला श्री बलभीमाचे मंदिर नि त्या पाठीमागील मठ व छोटेखानी विष्णू मंदिर दृष्टीस पडते, डाव्या हाताला कोणा भक्तांच्या व सत्पुरुषांच्या समाध्या दिसतात. दगडी पायऱ्यांचा पहिला टप्पा चढून गेल्याबरोबर एका अज्ञात भक्ताच्या समाधीचा मनोहर चार खांबी चबुतरा व त्यावरील पादुकांचे दर्शन होते. थोडे आणखीन पुढे गेल्यावर एकात एक आशा दोन दगडी मजबूत तटबंदींनी घेरलेले हे कलामंदिर दृष्टीस पडते. दोन्ही तटबंदींना भव्य कमानीची व भक्कम दरवाजे असलेली प्रवेशद्वारे आहेत व या दोन्ही प्रवेशद्वारांवर दाक्षिणात्य बांधणीची गगनचुंबी गोपुरे असून प्रत्येक गोपुरावर प्रत्येकी 5 ते 7 धातूंचे कलश बसविलेले आहेत. या गोपुरांची उंची सुमारे 80 फुटांपेक्षा जास्त आहे. या दोन तटबंदी ओलांडून गेल्यावर आतील भागात भव्य कलामंदिर आहे.
◆ भव्य कलामंदिर –
मुख्य तटबंदीच्या आतील भागात 15 × 11 फुट मापाच्या खोल्यावजा ओवऱ्या दिसतात, या ओवऱ्यांची संख्या 96 भरते. मुख्य तटबंदीच्या आतील परिसराची लांबी 240 फुट व रुंदी 130 फुट आहे. हा संबंध परिसर दगडी फरस बंदी असून या विशाल परिसराच्या मध्यभागी श्री कमलाभवनीचे प्रमुख मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराची लांबी 80 फुट व रुंदी 60 फुट असून साडेसहा फूट उंचीच्या दगडी खांबांवर हे मंदिर उभारण्यात आले आहे. मंदिराचे कलापूर्ण शिखर आठ थरांमध्ये बांधण्यात आले असून प्रत्येक थरावर वेगवेगळ्या पौराणिक देवदेवतांच्या प्रतिमा, योगी-योगिनींच्या प्रतिमा, हत्ती, हरीण वगैरे प्राण्यांच्या प्रतिमांबरोबरच काही इस्लामी पद्धतीची नकक्षी मंदिर बांधणाऱ्या कुशल कारागिरांनी मोठ्या कौशल्याने कोरली आहे. प्रमुख कलामंदिराच्या मधल्या गाभाऱ्यात श्री कमलाभवानीची 4 × 3 फुटाची भव्य काळ्या पाषाणाची मूर्ती भक्तांचे चित्त आकर्षून घेते. सिंहावर आरूढ असलेल्या श्री कमलाभवानीच्या मूर्तीला अष्टभुजा आहेत. उजव्या चार हातात गदा, तलवार, सुदर्शन चक्र व चौथ्या हातात सिंहाचे शेपूट धरलेले आहे. डाव्या चार हातात अनुक्रमे शंख, मुशुंडी, राक्षसाची शेंडी व शेवटच्या हातातील बरची महिषासुराच्या शरीरात खुपसलेली आणि शेजारी महिषासुराचे मुंडके अशी कोरलेली ही मुर्ती उंची वस्त्रे, आभूषणे व रत्नजडीत टोपाने सुशोभीत केल्यानंतर त्या मूर्तीच्या मनमोहक व तेजस्वी दर्शनाने भाविक मुग्ध होऊन नतमस्तकच होतात. एवढी मोठी व सुंदर मूर्ती महाराष्ट्रातील इतर ठिकाणी क्वचीतच पाहायला मिळते. ही मूर्ती तयार करणाऱ्या शिल्पकाराने आपल्या उत्कृष्ट शिल्पकृतीचा नमूना या मूर्तीच्या रूपाने अमर केला आहे.
◆ शक्तिपंचायतन –
मुख्य मंदिरात श्री कमलाभवानीच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणाची पिंड आहे व त्यावरती पाच फण्याच्या शेष नागाचे छत्र आहे व ते पितळी काश्याचे बनविले आहे. उजव्या बाजूच्या मागील भागात श्री गणेशाची काळ्या पाषाणाची उत्कृष्ट व विशाल मूर्ती आहे. तसेच डाव्या बाजूच्या भागात श्री विष्णुलक्ष्मीची गरुडारूढ काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे व डाव्या बाजूच्या मागील भागात श्री सुर्यनारायनाची सप्त अश्व जोडलेली रथासह सुंदर काळ्या पाषाणाची मूर्ती आहे. प्रमुख एकाच मंदिरात वेगवेगळ्या पाच देवतांचे हे शक्तिपंचायतन आहे. अशा तऱ्हेचे शक्तिपंचायतन फक्त काशी शिवाय अन्य कुठल्याच क्षेत्रात नसल्याचे सांगण्यात येते.
◆ होमकट्टा व वैशिष्ट्यपूर्ण दीपमाळा –
या भव्य कलामंदिरासमोरच नवचंडी होम हवनाचा चबुतरा आहे नवरात्रत आश्विन शु. अष्टमीला येथे रात्री ठिक 12 वाजता नवचंडी होम व विधीयुक्त पूजेचा कार्यक्रम होतो. हा विधी पहाटेपर्यंत सुरू असतो. पूर्वी या होमामध्ये पशुबळी देण्याची प्रथा होती, अलीकडे मात्र ही प्रथा बंद करण्यात आली असून आता होमात कणकेचा प्रतिकात्मक बोकड करून टाकला जातो. या पूजा विधीला देवस्थानच्या विश्वस्तांनपैकी कोणीतरी यजमान म्हणून उपस्थित राहतात व त्यांच्या हस्तेच पूर्णाहुती देण्याची प्रथा आहे.
या होमकट्याच्या पूर्वेला जवळच असलेल्या हेमाडपंथी दगडी छताच्या चबुतऱ्यावर मुख्य मंदिरातील शक्ती पंचायतनापैकी प्रमुख देवता महादेव, कमलाभवानी व विष्णू या देवतांचे वाहन असलेल्या नंदी, सिंह व गरुड यांच्या असलेल्या पाषाणाच्या प्रतिमा ह्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील महाद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस सुमारे 80 फूट उंचीच्या 3 दीपमाळा सध्या उभ्या आहेत. पूर्वी 4 दीपमाळा होत्या सुमारे 127 वर्षांपूर्वी वीज पडल्याने उत्तरेकडील दीपमाळ पूर्व महाद्वारावरील गोपुरावर कोसळल्याने ते महाद्वार देखील कोसळले. त्यामुळे गोपुराच्या जागी विश्वत मंडळींनी नगारखाना बांधला त्याला डमडमीची माडी असे म्हंटले जाते. पडलेल्या या दीपमाळेचा उघडा चौथरा या दीपमाळेची स्मृती देतो. या उंच दिपमाळांच्या अगदी वरच्या टोकापर्यंत जाण्यासाठी आतून गोलाकार फिरत वर जाणाऱ्या पायऱ्या आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारप्रमाणे दिपमाळांची रचना असून पायऱ्यांच्या प्रत्येक टप्प्यावर हवा व प्रकाशासाठी झरोके असून या दिपमाळांच्या शिखरावरून मंदिराच्या चहोबाजूंचा लांबपर्यंतचा परिसर दृष्टीस पडतो. नवरात्र महोत्सवात आणि कार्तिकी यात्रेच्या वेळी कमलाभवानीची सिंहारूढ मिरवणुक निघते त्यावेळी या दिपमाळांच्या शिखरांवर मोठे दीप प्रज्वलित केले जातात.
◆ मंदिर बांधणीतील शिल्प वैशिष्ठे –
श्री कमलाभवानीच्या या भव्य कलामंदिराच्या सर्व बांधकामामध्ये विविध काळातील सांस्कृतिक कला व बांधकाम शैलीचा मनोहर संगम झालेला दिसून येतो. मुख्य मंदिराची हेमाडपंथी बांधणी पुरातन हिंदु मंदिराचा उत्कृष्ट नमुना आहे तर मंदिरासमोरील कुतुबमिनारच्या धाटणीच्या असलेल्या दिपमाळा इस्लामी बांधकाम शैलीच्या निदर्शक आहेत. तर महाद्वारे व त्यावरील गोपुरांच्या प्रत्येक शिखरांवर पंचधातूंचे 5 कलश असल्याने हे बांधकाम दाक्षिणात्य शैलीचे असल्याचे दिसून येते. या चारही महाद्वारांच्या वेशींची लांबी-रुंदी 42 × 24 फुट भरते. प्रत्येक गोपुराच्या शिखराकडे जाण्यासाठी आतील बाजूने पायऱ्या असून पहिल्या टप्प्यावर छोट्या खोल्या आहेत. मंदिराच्या बांधकाम शैलीतील या विविधतेमुळे असा अंदाज केला जातो की या मंदिराची उभारणी व बांधकाम वेगवेगळ्या कालावधीत झालेले असावे व त्यामध्ये काही पिढ्यांचे अंतर असावे.
◆ बागेतील छत्र्या व 96 पायऱ्यांची विहीर –
मुख्य मंदिराच्या समोर पूर्वेकडील बाजूस तटबंदीवजा कोटामध्ये एक छोटा बगीचा (बाग) आहे. पुर्वीच्या काळी या बागेमध्ये वृक्ष, वेली व फुलझाडे बहरलेली असावीत. सध्या मात्र या परिसरात काही मोठे वृक्ष तेवढे आहेत. याच बागेच्या परिसरात राजे रावरंभांच्या राजघराण्यातील प्रमुख व्यक्तींच्या समाध्या आहेत. पूर्वाभिमुख दोन समाध्यांपैकी एका समाधीची बांधणी गोल घुमटासारखी असून या बांधकामात उत्तम पाषाणाचा वापर केलेला आहे. पाषाणाचे हे अप्रतिम शिल्प नाशिकच्या काळाराम मंदिराच्या शिल्पाची आठवण करून देते. समाधीच्या समोर आग्नेय बाजूस अप्रतिम शिल्पाचा एक नमुना छिनीने साकारलेला आढळतो. ही शिल्पकला इस्लामी धाटणीची असून हे बांधकाम तंबूतासारखे असल्याने स्थानिक रहिवासी त्याला दगडी डोला म्हणतात. तंबूतासारखे असणारे खांब व घुमटासारखे शिखर चारही बाजूने असलेली इस्लामी महिरपीची बांधणी हा इस्लामी स्थापत्याचा नमुना आहे. पण या शिल्पाचा प्रत्येक भाग वेगवेगळ्या स्वरूपात पाहिल्यास त्यामध्ये हिंदू स्थापत्यकलेचा सुंदर मिलाफ आढळून येतो.
हा बगीचा ओलांडल्यानंतर पूर्व बाजूस दक्षिणोत्तर लांब अशी काळ्या पाषाणात बांधलेली प्रचंड मोठी विहीर आहे. या विहिरीत उतरण्यासाठी उत्तर बाजूकडून 96 दगडी पायऱ्या असल्याने तिला 96 पायऱ्यांची विहीर असे म्हंटले जाते. या विहिरीच्या कठड्यावरून आतमध्ये डोकावल्यास विहिरीची विशालता व खोली यामुळे घेरीच येते, या विहिरीचा आकार अष्टकोनी आहे. या विहिरीचे दगडी बांधकाम अतिशय सुबक व सुरेख असून पूर्वीच्या काळी या विहिरीवर हत्तीची मोट चालत असल्याची अख्यायिका असल्याने या विहिरीला हत्ती-बारव असे देखील म्हंटले जाते.
◆ 204 वर्षांपूर्वीची घंटा –
या मंदिराच्या प्रचंड वास्तुविषयी व परिसरातील तत्कालीन बांधकामांनविषयी कसलाही शिलालेख अथवा लिखीत पुरावा नाही. या संदर्भात एकच उपलब्ध लिखीत प्रमाण आहे ते म्हणजे मंदिरात असलेल्या बीडाच्या प्रचंड घंटेवर कोरलेला मजकूर होय. ही घंटा चैत्र शुद्ध प्रतिपदा, सोमवार शके 1740 मध्ये बांधल्याचे नमूद केले आहे. हे शके म्हणजे इसवीसन 1818 हे होय.
◆ राजे रावरंभाकृत या मंदिराची उभारणी –
हैद्राबादच्या निजामाचे सरदार असलेल्या राजे रावरंभा निंबाळकर यांना निजमाकडून करमाळा, माढा, परंडा, खर्डा, भूम या परिसराची जहागीर मिळाली होती. रावरंभा हे तुळजाभवानीचे निस्सीम भक्त असल्याने त्यांनी करमाळ्याच्या पूर्वेकडील टेकडीवर असलेल्या भग्नावस्थेतील महादेव मंदिराचा जिर्णोद्धार करत या ठिकाणी तुळजाभवानीचे प्रतिरूप म्हणून कमलाभवानी मंदिर व मंदिरात शक्तिपंचायतनाची उभारणी केली. या मंदिराचे बांधकाम इसवीसन 1727 च्या सुमारास सुरू करण्यात आले असावे असे अनुमान आहे.
◆ मंदिराकडे येण्याचे मार्ग –
करमाळा हे गाव टेंभुर्णी-नगर रस्त्यावर टेंभुर्णी पासून 45 कि.मी. व नगर पासून 100 कि.मी. अंतरावर आहे. मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील जेऊर रेल्वे स्थानक हे करमाळ्यापासून 18 कि.मी. अंतरावर आहे. पुण्यावरून भिगवण मार्गे करमाळ्याचे अंतर 165 कि.मी. व सोलापूरवरून 135 कि.मी. आहे.
© लेखक – विक्रांत विवेक येवले, करमाळा.
(संदर्भ – स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार कै. शंकरराव येवले लिखित “जय अंबे कमलाभवनी” या पुस्तकातून)
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये पत्रकारानी आरोग्याची काळजी घेऊन वेळोवेळी तपासणी करून तणाव मुक्त…
करमाळा प्रतिनिधी लोकमंगल सहकारी पतसंस्थेने नागरिकांचे हित जपले असून पत्रकारांसाठी कल्याणकारी योजना राबवुन पत्रकारांना…
करमाळा प्रतिनिधी करमाळा, येथील सूर ताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय सुर ताल संगीत महोत्सव उत्साहात संपन्न…
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेच्या. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या दहिगाव सबस्टेशन वर नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार’ आणि ‘पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू असून लोकशाही टिकवण्यासाठी पत्रकारांना पाठबळ द्यावे…
मुंबई /प्रतिनिधी देशभरातील माध्यमांतील पत्रकार व संपादक यांच्या न्याय हक्कांसाठी संपादक व जेष्ठ माध्यम तज्ञ…