करमाळा प्रतिनिधी करमाळा शहर व तालुक्यात बेकायदा व्यवसाय करणाऱ्यावर करमाळा पोलिसांनी जोरदार कारवाई सुरु केली आहे. यातूनच शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ११ संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींमध्ये सातजण २५ वर्षाच्या आतील तरुण आहेत. याप्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल अतुल लवळे यांनी फिर्याद दिली आहे.
करमाळा शहरांमध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक मिटू जगदाळे, पोलिस नाईक गायकवाड यांचे पथक खाजगी वाहनाने शहरांमध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पेट्रोलिंग करत असताना किल्ला विभाग येथे काहीजण पत्त्याच्या डावावर पैसे लावून रमी हा जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला तेव्हा प्रताप अरुण जांभळे यांच्या पत्रा शेडच्या आडोशाला काहीजण वर्तुळाकार बसून पत्याच्या डावावर जुगार खेळत असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना गराडा घालून जागीच पकडले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. केशव संतोष साळुंखे (वय 25, रा. किल्ला वेस), पप्पू नारायण लष्कर (वय 42, रा. नागराज गल्ली, करमाळा), बबलू सुभाष दुधाट (वय २०, रा. रंभापुरा), प्रताप अरुण जांभळे (वय 24, रा. खडकपुरा), प्रकाश बबन कांबळे (वय 24, रा. सिद्धार्थनगर), धवल रमेश कांबळे (वय 21, रा. सिद्धार्थनगर), सचिन विठ्ठल घोगरे (वय 32, रा. कानड गल्ली), कपिल लक्ष्मण यादव (वय 24, रा. खडकपुरा गल्ली), विकास अशोक फंड (वय 22, रा. फंड गल्ली), बबलू सुरेश भोज (वय 35, रा. कानाड गल्ली) व नागेश राजेंद्र ओहोळ (वय 26, रा. सुमंतनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह २० हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.