निमगाव गावच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून मामांचा राजकीय प्रवास सुरू झाला , तो आज करमाळा तालुक्याच्या आमदार पदापर्यंत पोहोचलेला आहे. यादरम्यान माढा पंचायत समितीचे सभापती , सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष , सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष , कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इत्यादी पदे त्यांनी भूषविलेली आहेत. या सर्व पदावरती असताना विकासाचाच ध्यास घेऊन मामासाहेबांनी काम केलेले दिसते .त्यामुळेच विकासप्रिय नेता हे ब्रीद आमदार संजयमामा शिंदे यांच्या नावाशी जोडले जाते.
2019 ची विधानसभा निवडणूक मामा जाणीवपूर्वक अपक्ष लढले व जिंकलेही. ही निवडणूक अपक्ष लढताना मामांना सर्वपक्षीय ज्येष्ठ मंडळींचे आशीर्वाद होते. देवेंद्र फडणवीस, शरदचंद्रजी पवार ,अजित दादा पवार यांचे सहकार्य मामांना मिळाले. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना सुरुवातीला पाठिंबा दिला आणि पुढे प्रत्यक्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले, त्यावेळेसही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना कल्पना देऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधायचा किंवा स्वतःच्या संस्थेसाठी काहीतरी पदरात पाडून घ्यायचं , कुठलंतरी पद मागायचं हा व्यवहार मामासाहेबांचा नव्हताच . मागितले असते तर मामासाहेबांना मंत्रीपदही मिळाले असते. परंतु त्याऐवजी मतदारसंघातील प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याची अट त्यांनी घातली…सत्ताधाऱ्यांच्या सहकार्याने मतदारसंघाचा विकास हीच पाठिंबा देण्यापाठीमागे मामासाहेबांची रणनीती होती. त्यामुळे आज करमाळा मतदारसंघाचा चौफेर विकास होताना दिसतो आहे. आज प्रत्येक नागरिकांच्या ओठावर विकासप्रिय आमदार म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांचेच नाव आहे.
वर्षानुवर्ष कुकडी भूसंपादनाचे रखडलेले 33 कोटी 50 लाख व दहिगाव योजनेसाठी 35 कोटी असे एकूण भूसंपादनासाठी 68 कोटी 50 लाख निधी आमदार शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. कोळगाव , दहिगाव या योजनांना गती दिली. दहिगाव उपसा सिंचन योजनेची दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 342 . 30 कोटींची मंजूर करून आणली. चालू अर्थसंकल्पात त्यासाठी 35 कोटींची तरतूद केली व पाठीमागील दोन वर्षाच्या अनुशेशासह 85 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. दहीगाव योजनेचे 5.10 कोटी वीजबिल आत्तापर्यंत भरलेले आहे.त्याचबरोबर आमदार निधी ,जिल्हा नियोजन मंडळाचा निधी, ग्रामविकास विभागाचा निधी, समाजकल्याण विभागाचा निधी , तीर्थक्षेत्र विकास, जनसुविधा, नागरी सुविधा या माध्यमातून 25 कोटी निधी मंजूर केलेला आहे. या निधीमधून सभामंडप बौद्ध विहार , हायमॅक्स , पेविंग ब्लॉक , सिमेंट रस्ते इत्यादी कामे होणार आहेत.
रस्ते विकासासाठी आ. संजयमामा शिंदे यांनी तब्बल 117 कोटींचा निधी मतदार संघासाठी खेचून आनलेला आहे. यामध्ये डिकसळ पूलासाठी 55 कोटी , प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 25 कोटी, 2020 – 21 व 21 – 22 या अर्थसंकल्पात प्रमुख जिल्हा मार्गांसाठी 54 कोटी या कामांचा समावेश आहे. स्वातंत्र्यापासून प्रलंबित असलेला रिटेवाडी रस्त्याचा प्रश्न आ.संजयमामानी सोडवलेला आहे .त्याचबरोबर टेंभुर्णी – अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे. टेंभुर्णी अहमदनगर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक असलेला राज्य सरकारचा ना हरकत दाखला मिळालेला आहे त्यामुळे लवकरच या महामार्गाचा प्रश्नही निकाली निघणार आहे.
मतदारसंघाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधेसाठी आ. शिंदे यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील 50 कॉट रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 कॉट साठी प्रस्ताव सादर करून त्यासाठी 25 कोटी निधीची तरतूद केली आहे. उपजिल्हा रुग्णालय अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी 18 कोटी 68 लाख निधी मंजूर करून घेतला आहे.एवढेच नव्हे तर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत सीझर सुविधा सुरू करणे , दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा सुरू करणे, डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देणे, नव्याने दोन 108 रुग्णवाहिका मतदारसंघासाठी देणे ,कुर्डूवाडी ट्रामा केअर साठी 7 कोटी 20 लाख निधी मंजूर करणे ही महत्त्वाची कामे केलेली आहे.
शासन पातळीवरती पाठपुरावा करून करमाळा येथे वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्यासाठी आवश्यक ती मंजुरी आमदार संजयमामा शिंदे यांनी मिळवलेली आहे. 2020-21 अर्थसंकल्पामध्ये जलसंधारण विभागातून बंधारे बांधणे , ओढा खोलीकरण करणे , जुन्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करणे इत्यादी कामांसाठी 18 कोटींची तरतूद केलेली आहे . अर्जुननगर, विहाळ,निंभोरे येथील साठवण तलावाच्या संपादनापोटी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे.त्याचबरोबर स्वच्छता व पाणीपुरवठा विभागासाठी 8 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. या निधीमधून व्होळे व इतर गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत कामे पूर्ण केली जाणार आहेत. तसेच चिखलठाण नंबर 1,2 व वांगी 1,2 या गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी योजना राबविली जाणार आहे.
या महत्त्वांच्या निधी बरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयात भूसंपादन, पुनर्वसन व प्रलंबित असलेल्या उजनी धरणग्रस्तांना पर्याय जमिनीचे वाटप करणे इत्यादी विषयासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केलेले आहे. युरिया टंचाईच्या काळात गुजरात राज्य मधून मतदारसंघासाठी तब्बल 5 हजार मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून दिला. वीज समस्या सोडविण्यासाठी मतदारसंघांमध्ये 33 K V क्षमतेची 5 नवी उपकेंद्रे मंजूर करून घेतलेली आहेत .यामध्ये कात्रज ,दहिगाव, दहिवली, म्हैसगाव, आवाटी यांचा समावेश आहे. तसेच कोर्टी व पांडे येथील उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याचे प्रस्ताव मंजूर झालेला आहे. नव्याने वांगी नं.2, राजुरी व पोमलवाडी या ठिकाणी नवीन सबस्टेशन सुरू करण्यासाठी आमदार शिंदे प्रयत्नशील आहेत.
कुर्डूवाडी नगर परिषदेच्या रस्ते व भूमिगत गटारी आदी विकास कामांसाठी 69 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. तसेच करमाळा नगर परिषदेच्या नवीन इमारत बांधणे, टाऊन हॉल बांधणे व छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभा करणे आदी कामांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. करमाळा तालुक्यातील प्रसिद्ध कमलाभवानी मंदिरासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन 2021 -22 अंतर्गत 4 कोटी निधी मंजूर केलेला आहे. या निधीमधून रस्ते, स्ट्रीट लाईट, संरक्षक भिंत बांधणेआदी कामे केली जाणार आहेत. अल्पसंख्यांक विभागाकडून मुस्लिम समाज कब्रस्तान बांधकाम, संरक्षक भिंत आदी कामांसाठी 1 कोटी , समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास करणे या कामासाठी 2 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. या निधीमधून 38 गावांमध्ये सिमेंट रस्ता, पेव्हीग ब्लॉक , भूमिगत गटारी, पाण्याची टाकी आदी कामे होणार आहेत.
मतदार संघातील कामाबरोबरच राज्य आणि जिल्हा पातळीवरतीही आ. शिंदे काम करताना दिसतात. सोलापूरच्या बोरामणी विमानतळासाठी 50 कोटी निधीची तरतूद करणे , महाराष्ट्र राज्य खाजगी सूतगिरणी संघटनेचे अध्यक्ष पद मिळवणे , सोलापूर जिल्ह्यातील मागेल त्याला शेततळे योजना प्रलंबित अनुदानाची मागणी करणे , विधानसभा आश्वासन समितीवरती सदस्य म्हणून निवड होणे, बेस्ट वाहतुकीतील सोलापूर विभागातील कर्मचाऱ्यांना वगळणे यासाठी पाठपुरावा करणे ,सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रा , लॉकडाऊन चा प्रश्न , बालकांच्या पोषण आहारासंदर्भात विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणे, राष्ट्रवादीने पंढरपूरची पोटनिवडणुक तसेच पुणे पदवीधर मतदार संघ सोलापूर जिल्ह्याची सर्वस्वी जबाबदारी आ. शिंदे यांच्यावर देणे, उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा निर्णय रद्द करणे ,भीमा कालवा सिंचन मंडळ तसेच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांचे एकत्रीकरण यास विरोध करणे, उजनी धरण क्षेत्रावर पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेणे ,उजनी जलाशयात बुडीत बंधारे बांधणे, भीमा नदीवर बॅरेजेस बांधणे आदी विषयासंदर्भात ना. जयंत पाटील यांच्यासोबत बैठक घेणे या विषयांच्या माध्यमातून आ. संजयमामा शिंदे यांचे नेतृत्व फक्त तालुक्यापुरते सीमित नाही तर ते जिल्हा आणि राज्य पातळीपर्यंत पोहोचलेले आपणास दिसते. मतदारसंघांमध्ये अडीच वर्षात कोरोनामुळे निधी उपलब्ध होण्यास मर्यादा असतानाही आ. संजयमामा शिंदे यांनी जवळपास 552 कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतलेली आहेत. एकूणच अडीच वर्षातील आमदार संजयमामा शिंदे यांचा कामाचा आवाका पाहिल्यावर आमदार शिंदे यांना जनतेने दिलेले विकासप्रिय आमदार हे बिरूद सार्थ ठरताना दिसते. डाॅ विकास वीर करमाळा.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…