बार्शी प्रतिनिधी
मागच्या आठवड्यात तीन तास मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यालयात आणि मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी व कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे सहवासात काढले.तिथे रुग्णांचे दु:ख घेवून येणाऱ्या नातेवाईकांची दुःखं आणि मनाची चाललेली घालमेल अनुभवायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे मंगेश चिवटे ज्या आस्थेने आणि आपलेपणाने प्रत्येकाचे दु:ख हलके करण्यासाठी धडपडत होते,ते पाहून मी भारावून गेलो.मीही एका मित्राच्या शाळकरी मुलीच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी मदत मिळावी, यासाठी त्या मित्राला घेवून मंगेशभैय्यांच्या भेटीला आलो होतो. मित्राने आपली कैफियत मांडली आणि ती ऐकल्यावर लगेचच मंगेशभैय्यांनी अनेक ठिकाणी फोन लावायला सुरुवात केली.जसे जसे फोन होत होते, तसतसे फोनवरील संवाद ऐकून माझ्या मित्राच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते..एका चिंताग्रस्त मुलीच्या पित्याच्या चेहऱ्यावर उमटत असलेला आशावादी भाव लपत नव्हता..शेवटचा फोन झाला आणि मंगेशभैय्यानी सांगितले,” उद्या सकाळी त्या हॉस्पिटलमध्ये मुलीला घेऊन जा,ते व्यवस्था करतील..माझा सहकारीही तुमच्या सोबत देतो…” भैय्याचे बोलणे चालूच होते,तोच आपल्या मुलीवर उपचार होणार..या माहितीने सदगतीत झालेल्या पित्याच्या भावनेचा बांध फुटला..तो धायमोकलून रडत मंगेशभैय्यांच्या गळा पडून रडू लागला.. मंगेशभैय्याचे अक्षरशः पाय धरायचा प्रयत्न करु लागला..या प्रसंगाने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले.. हा प्रसंग अनुभवत असताना माझ्या डोळ्या समोर मात्र मंगेश नरसिंहराव चिवटे या तरुणाच्या गेल्या पंधरा वर्षांतील धडपडीचा पट एखाद्या चित्रपटाप्रमाणे उभा राहिला..
मिसरुडही न फुटललेला गावाकडचा करमाळ्याचा एक मुलगा स्वप्न,जिद्द ,कष्ट आणि प्रामाणिकपणाची शिदोरी घेवून वडिलांच्या ग्रामीण पत्रकारितेच्या वारशासह वलयांकित पत्रकारितेसाठी मुंबई गाठतो..धडपड करुन तिथे आपले अस्तित्व निर्माण करतो…. बेगडी वलयात न अडकता विश्वासार्ह लोकसंपर्काची कास धरतो.पुढे आपल्या स्वप्नांचीही कूस बदलून वलयांकित क्षेत्राचे कुंपण भेदून आय.ए.एस.होण्यासाठी दिल्ली गाठतो! कष्ट उपसतो तिथे यश दिसत नाही,असे वाटताच योग्य वळणावर दिल्ली सोडून मुंबईत नव्या धडपडीचा डाव मांडतो. एकनाथभाई शिंदे आणि त्यांचे चिरंजीव का. डॉ.श्रीकांत यांचे बोट धरुन महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचा यज्ञ मांडतो..एवढ्यावर न थांबता महाराष्ट्रातील ऐतिहासिक राजकीय परिवर्तनातील एक सक्रीय घटक बनतो… एका शाळकरी मुलीचा पिता त्याचा हात विश्वासाने आणि प्रेमाने धरुन धायमोकलून रडतो…. धन्य..धन्य !
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हा राज्यात ठसा उमटविणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांची भुमी आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी असणारे मंगेश चिवटे हे अशाच काही निवडक करमाळकर व्यक्तिमत्वांपैकी एक.
सद्यस्थितीत मंगेश चिवटे हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. या माध्यमातून राज्याच्या वेगवेगळ्या भागात आरोग्य क्षेत्रात झोकून देवून काम करणारे करमाळकर मंगेश चिवटे हे राज्यातील गोर गरीब, गरजू अबाल-वृद्ध रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांसाठी प्रत्यक्ष अन् अप्रत्यक्षपणे ‘आधार’ ठरलेले आहेत. आजोबा स्वातंत्र्य सैनिक दिवंगत मनोहरपंत चिवटे, वडील पत्रकार नरसिंह चिवटे यांच्या शिकवणीतून जडणघडण होताना सेवाभावी वृत्ती अंगी असलेले मंगेश हे विविध आजारांनी त्रस्त रुग्ण व नातेवाईकांसाठी देवदूत बनू लागल्याचे विविध घटनांवरुन समोर येवू लागले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन, ठाणे यांच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि त्यातून रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत असलेल्या मंगेश चिवटेंमुळे अदिवासी, दुर्गम भाग, पूर स्थितीने त्रासलेले भाग अशा ठिकाणीही आरोग्य सेवा आवश्यक वेळी पोहोचलेली आहे.
कोरोना काळात अनेकांना आरोग्य सेवेची गरज भासत होती. काळ मोठा कठीण होता. या काळातही मंगेश चिवटे यांनी शक्य ती पुरविलेली मदत राज्यातील अनेकांच्या कायम लक्षात राहणार आहे. कोरोनाचा धाडसाने मुकाबला करण्याच्या त्या अवघड काळात मंगेश चिवटे यांनी कित्येकांना मदत पुरविली. त्या वेळी ते खऱ्या अर्थाने ‘कोविड योद्धे’ म्हणून समोर आले होते.
कुशाग्र बुद्धिमत्ता, वेळेचे अचूक महत्व जाणण्याचा उपजत गुण आणि माणसं ओळखण्याची कला यामुळे राज्याच्या राजकारणातील सत्ताबदल प्रक्रियेत मंगेश यांची एकनाथराव शिंदे यांना बहुमोल मदत झाल्याचेही दिसून आले आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे मंगेश सत्ताबदल प्रक्रियेदरम्यानच्या महत्वाच्या वेळी शिंदे यांच्या सोबत राहिल्याचे राज्याने पाहिले आहे. या काळात त्यांनी विविध आमदारांचा समन्वय साधल्याचेही समोर आले आहे. एकूणच आपली विश्वासू उपयुक्तता सिद्ध करणारे मंगेश हे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या विशेष सहकारी फळीतील एक आहेत हे नक्की!
दरम्यानच शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मंगेश यांनी मागायचे अन् शिंदे यांनी द्यायचे, अशीच स्थिती असताना राज्याच्या आरोग्य सेवेची संधी मागून मुख्यमंत्री वैद्यकिय सहायता कक्षाची जबाबदारी सांभाळण्याची इच्छा बाळगणारे मंगेश चिवटे हे निश्चितच कौतुकास पात्र असतानाच करमाळकरांसाठी अभिमानास्पद व्यक्तिमत्त्व म्हणून समोर आले आहेत. कदाचित त्यांची राजकीय भुमिका, राजकीय समर्थन ही त्यांची वैयक्तिक भुमिका असली तरीही करमाळा सारख्या भागातील या युवकाचा शिक्षित ध्येयवेडा तरुण ते राज्याच्या मुख्यमंत्र्याचा विश्वासू हा प्रवास निश्चितच उल्लेखनीय आहे. राजकारणविरहीत रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची त्यांची भुमिका ही कौतुकास पात्र आहे.
करमाळा जन्मभुमी असलेले मंगेश हे प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा बाळगून त्या ध्येयासाठी बंधू महेश चिवटे यांच्या सकारात्मक पाठबळामुळे करमाळा सोडून पुणे, मुंबई, दिल्ली अशा प्रवासाला निघालेले व्यक्तिमत्व. त्यांच्या या प्रवासात शिक्षणाच्या जोडीने कधी कुस्तीचा खेळ आला. तर कधी बातम्यांची गोडी लागली. बातम्यांच्या या गोडीतूनच ते पत्रकारीतेकडे वळाले अन् स्टार माझा ( आता एबीपी माझा ), जय महाराष्ट्र, साम टी. व्ही. अशा टी. व्ही. चँनेलचे बातमीदार म्हणून काम करताना त्यांनी छाप पाडली. जे करायचे ते मनापासून अन् त्यात झोकून द्यायचे. या वृत्तीमुळे मंगेश हे त्यावेळचे धडाडीचे टी. व्ही. रिपोर्टर बनले होते. २६/ ११ च्या मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी केलेले वार्तांकन, विविध राजकारण्यांची मुलाखतीतून घेतलेली फिरकी यातून त्यांच्यातील वेगळी ऊर्जा जाणवत राहायची.
खूप काही करण्याची स्वप्ने उराशी बाळगलेल्या मंगेश यांनी पत्रकारीतेतून रुग्णसेवेकडे आपला मोर्चा वळविला आणि वैद्यकीय मदत कक्षासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. करमाळकर असलेला हा युवक आज राज्यासाठी आरोग्य सेवेचा दूत ठरला आहे.
मंगेशभैय्याच्या आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
*-राजा माने,*
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…