कसं आणि का जगावं? हा प्रश्न तरुण आणि म्हाताऱ्यांच्याही मानगुटीवर सदैव बसलेला असतो. बरं,हे पिढ्यान् पिढ्या चालत आलेला आहे.त्यातूनच आत्महत्ये सारख्या समस्येचे अक्षरशः पेवच फुटतेपण परमेश्वराने दिलेले जीवन जसे आणि जिथे दिलेले आहे,ते अतिशय सुंदर आहे.जगण्यावर प्रेम करण्याला मनाच्या मजबूत जिद्दीची जोड दिली की जीवनातील सगळीच कोडी सहज सुटतात… हो, हे खरं आहे!..ते खरं असल्याचा पुरावा देत आपल्या जगण्यातून नव्या पिढीला सहज समजावून सांगणाऱ्या आयपीएस मनोजकुमार शर्मा यांची भेट झाली आणि मन प्रफुल्लित झाले. ते सध्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा विभागा प्रमुख या डीआयजी दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत.महाराष्ट्रासह चार राज्यांत त्यांचे कार्यक्षेत्र आहे.राज्यातील सर्व विभागांत विविध पदांवर काम केलेले मनोजकुमार एक संवेदनशील, लोकाभिमुख, धडाकेबाज आणि स्वच्छ प्रतिमा असलेला अधिकारी म्हणून लोकप्रिय आहे.गडचिरोलीतील नक्षलवाद असो अथवा कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलन असो त्यांनी बजावलेली भूमिका महाराष्ट्र आजही विसरलेला नाही.पण असा हा माणूस आपल्या शालेय जीवनात कॉपीबहाद्दर होता,नापासांच्या जातकुळीचा होता,हे कोणाला खरे वाटेल काय? पुढे आपली प्रेयसी-पत्नीने दिलेले चॅलेंज स्वीकारुन चक्क आयपीएस झाला! अगदी सिनेमात शोभाव्या अशा या गोष्टी प्रत्यक्षात आणणारे मनोजकुमार हे देखिल माझ्या “ज्यांनी आभाळ कवेत घेतलं..”या पुस्तकातील ७५ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत,हे माझ्यासाठी भूषणच! त्यांना माझे पुस्तक आणि पुस्तकासाठी ख्यातनाम चित्रकार नितीन खिलारे यांनी रेखाटलेल्या त्यांच्या व्यक्तिचित्राची फ्रेम त्यांना भेट देण्यासाठी त्याच्या नवी मुंबईतील कार्यालयात गेलो होतो. आज दुसरी एक महत्त्वाची घटना घडली.मी कोल्हापुरात एमबीए करीत असताना छत्रपती श्री.शाहू इन्स्टिट्यूट (आता “सायबर” म्हणतात) मध्ये माझा वर्गमित्र असलेला क्यू.के.मुल्ला हा माझा वर्गमित्र तब्बल ३९ वर्षांनी भेटला. तो,मी आणि माझे मित्र कुंदन हुलावळे मनोजकुमारना भेटलो.अनेक विषयांवर गप्पा झाल्या.त्या माझे मित्र स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांची गडचिरोलीतील आठवण मनोजकुमार शर्मा यांनी सांगितली आणि आबांच्या आठवणीने मन भरुन आले.असो.पण या भेटीत सचिन तेंडुलकर पासून ऋत्विक रोशनच्या भूमिकेने गाजलेल्या “सुपर ३०” या क्रांतिकारी संस्थेचे जनक आनंदकुमार यांनी प्रशंसा केलेली “ट्वेलथ फेल” ही शर्मा यांच्या जीवनावरील कादंबरी दाक्षिणात्य भाषांमध्ये देखिल आली पाहिजे,हे मी त्यांना आवर्जून सांगितले.त्यांचा आस्थेवाईक पाहुणचार घेत त्यांना पुस्तक व व्यक्तिचित्राची फ्रेम भेट देत मी माझ्या आठवणींचा खजिना समृध्द केला आणि त्यांचा निरोप घेतला.
*-राजा माने,*
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.