*** ज्याचं त्याचं प्रारब्ध ***
काही काही गोष्टी अशा घडतात की विचार चक्र सहज बघता बघता गती घेतं कारण आजकाल काही पण झालं… घडलं तर लोक नशिबावर हवाला ठेवतात खरं बघायला गेलं तर प्रत्येक मनुष्य प्राण्याला विचार ही निसर्गाने दिलेली एक वेगळी आणि बहुमूल्य देणगी आहे या चराचर सृष्टीमध्ये जेवढे पशु…पक्षी… कीटक… व सजीव… असतील त्यापेक्षा विचार ही एक वस्तू फक्त माणसालाच निसर्गाने अतिरिक्त बहाल केली आणि एवढी जी प्रगती झाली ती काय झोपेतून उठून थोडसं कंबरडं खाजवून झालेली नाही तर खूप विचारांती झालेली आहे
आता आपण समजतो मी ह्यो आहे…मी त्यो आहे…मी आमका आहे…मी तमका आहे… सहाजिकच आहे पण ती फक्त एक ओळख म्हणून प्रदर्शन करावं हे सुद्धा मी मानत नाही कारण गप बस असा विचार असल तर तू ठार येडा आहे तुझ्या डोक्यावर वेगळ्या विचाराचा पगडा आहे कारण तू जो कोण आहे भले आमदार असो… खासदार असो… एखादा अधिकारी असो… समाजसेवक असो…किंवा सर्वसामान्य असो… तर तो काय तू झालेला नाहीस तर ते तुझ्या प्रारब्धातच होतं अन आपल्यापुढे उभं राहतं ते प्रारब्ध… म्हणजे ते काय कुठे विकत मिळतं का तर ते एक संचित आहे संचित म्हणजे तुम्ही केलेलं चांगलं कार्य किंवा वाईट कार्य अथवा कार्य न करता विचार बुद्धी नेहमी ज्याची अनुकूल राहती त्या संचिताचे हे एक फळ आहे
आता आपण दोन मिनिटांपूर्वी प्रारब्धाच्या जवळ होतो अजून नशीब आपल्यापासून काही क्षणापुरतं थोडं दूर आहे म्हणून पहिलं प्रारब्ध बघू आता तुम्ही इंजिनियर किंवा एखादा मोठा अधिकारी झाला तर ते काय तुमच्या हातात काहीच नाही तुम्ही फक्त मनात एक विशिष्ट ध्येय ठेऊन अभ्यास केलाय फक्त एवढंच निमित्त आपल्या मनाला थोडीशी फुंकर पण या तुमच्या होण्याला कारणीभूत आहे तुमची साधना म्हणजे तुमचे प्रयत्न कारण दे रे हरी पलंगावरी असं नसतंय आता रोड क्रॉस करायचा झाला तिकडून भरघाव ट्रक येतोय पटकन निघून जावं नाहीतर थांबावं देव तारी त्याला कोण मारी देवावर हवाला देऊन चालत नाही म्हणून आपण काही वेळापूर्वी विचार हा गुण पाहिलेला आहे आता दुसरं म्हणजे तुमच्या पाठीशी असणारा आई-वडील… संत… आणि भगवंत…यांचा आशीर्वाद आणि तिसरं म्हणजे तुमचं प्रारब्ध तरच तुम्ही ते होऊ शकता जरा विचार करा यातलं एक जरी नसेल तरी पण योजना फेल होती आता आशीर्वाद या चार जणांचा पाहिजे नाहीतर काका… मामा… सासरा… वडीलधारी…यांचा आशीर्वाद फक्त क्षणिक असतोय आता बघा आपल्याला ही संकल्पना मानण्यावर आहे आपल्याला जन्म मिळाला हे आपलं नशीब त्या मनुष्य जन्माचे भक्ति मार्गाला लागून सार्थक करता आलं ते आपलं प्रारब्ध बहुतेक जण प्रारब्ध अन् नशीब एकच आहे असं समजतात पण नशीब आपण घडवायचं असतं तर नशीब घडवायला प्रारब्ध मदत करत असतं
असं जरी काही लोकांचं मत असलं तरी जन्माला आल्यापासून लोकं नशिबाच्या फेऱ्यात अडकतात काहीजण तर आपण या वेळेतच जन्माला का आलो म्हणून कपाळावर हात मारत बसतात नशीब बदलावं म्हणून माणसं आपलं कर्म बदलतात पण नशीब प्रारब्धावर अवलंबून असतं त्यामुळे काम धंदा किंवा व्यवसाय बदलला की नशीब बदलेलच याची काय हमी देता येत नाही या जगात नशिबाचे अनेक प्रकार आहेत काही लोक आपण सदैव कम नशिबी आहोत असं म्हणणारे असतात तर काही लोक नशिबाला मानतच नाहीत तिथे अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करतात नशीब हा प्रत्येकाचा मानायचा का न मानायचा हा भाग असतो तरी त्याला प्रारब्धाशिवाय काहीही करता येत नाही
आता बघा आपण बघतो पोरांनी बंगला बांधलाय गावात एवढी कुत्री असताना ह्यानं दहा हजाराचं कुत्रं घेतलं त्याचं खाणं… पिणं… आंघोळ… साबण… क्रीम… वेगळं त्याची जिम पण वेगळी केवढा हा रुबाब यातलं कोणतंही गावठी कुत्र्याला लागत नाही तर नुसतं गुराकलं तरी चांगल्या ताकदवान चोराचं पण पुढं पाऊल टाकायची हिंमत होत नाही आणि समजा मालकाच्या घरी खायला नाही मिळालं किंवा उशिरा मिळालं तरी चार घरं फिरून याचं पोट ही भरू शकतयं आणि ती दहा हजाराचं झोपताना सोप्यावर..घरात ए.सी. असतयं एकेकाचं प्रारब्ध
आता बघा अजून दुसरं आपलं घर होतं शेतात समोर होता गोठा त्या गाया…बैलं…शेळ्या… अक्षरशः पावसाळ्यामध्ये चिखलात असायच्या त्यांची खुरं चिखलानी कायम भरलेली असायची पण बघा काळ बदलला साधं सापराचं नाही तर पत्र्याचं घर होतं त्याच्या जागी स्लॅबचं घर आलं समोर कुढानी शेकारलेला गोठा जाऊन पत्र्याचं शेड आलं खाली कॉंक्रीट आलं शेडमध्ये एक दोन सिलिंग फॅन बसवले आता त्या गाईला अन म्हशीला पंख्याची हवा मिळते का पाय चिखलानी भरत नाही असतं एकेकाचं नशीब आता इथं नशीब जागं झालं आता एक जण मनातील दुर्गुण अविचार काढून भक्तिमार्गाला लागलं ह्यांनी काही लोकांना पहिलं सावकारासारखं व्याजाने पैसे दिलेले होते काहींनी व्यवहार खराब करून पैसे बुडवल्यावाणी झाले होते आता ही या भक्ती मार्गात आलं पुढे याचं चार दोन जणांनी अनुकरण केलं काही जण त्याचे शिष्य झाले त्यांच्या ही मनातील अशुद्ध विचार निघून गेले उशीर झाला पण बुडालेला सगळा पैसा परत मिळाला तो म्हणायला लागला देवाने माझे पैसे परत मिळवून दिले काय भावना श्रद्धा असते बघा तसं नाही देवाने तर दिलेच पण देवाला काही तेवढेच काम नाही पण तू देवाच्या सानिध्यात आलास तुझ्यात आणि त्यांच्या विचाराच्या प्रवाहात बदल झाला सर्वत्र शुद्ध विचार वावरायला लागले त्यातूनच तुझा व्यवहार पूर्ण झाला याला म्हणतात प्रारब्ध
आता बघा शेतात काम करणाऱ्या शेतमजूर बाईला दीडशे रुपये रोज मजुरी मिळते आणि तेच जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या मास्तरीन बाईला पंधराशे रुपये रोज पडतोय असं कसं अगं बाई तिचं प्रारब्ध म्हणजे तिची साधना म्हणजे तिनं ग्रॅज्युएशन केलं डी.एड.केलं बी.एड. केलं आईबापान लग्न झाल्यावर सुद्धा अर्थसहाय्य पुरवलं म्हणजे एक प्रकारे आशीर्वादच एक आशीर्वाद अन तिचं प्रारब्ध आता तसं बघायला गेलं तर हीचं काम दिवस भर उन्हात सुट्टी नाही अन मास्तरीण बाईचं काम सावलीत आणि सुट्टी मात्र उन्हाळ्याची याला म्हणायचं प्रारब्ध अन अजून एक उदाहरण घेता येईल बोर्डामध्ये… ग्रॅज्युएशनला…एम.पी.एस.सी…यू.पी.एस.सी…एक दोन वेळा नापास झाला नीराश झाला साहजिकचं आहे म्हणा माणसांची अंगभूत सवयच आहे ती मी तर म्हणतो एक दोन वेळा काय चांगलं पाच सहा वेळा नापास होऊ द्या पण प्रयत्नाची पराकाष्टा सोडायची नाही पण एकदा पास झाल्यावर लाल किंवा पिवळ्या दिव्याची गाडीच आहे त्या गाडीचं दार उघडायला पण माणूस आहे बंगला मान मरातब याला म्हणायचं नशीब आता बघू यातून बोध काय तर * करून मिळतं त्याला प्रारब्ध अन आयतं मिळतं त्याला नशीब म्हणायचं * एवढा फरक आहे
लॉटरी मटका जुगारित पैसे मिळाले प्रारब्ध नाही नशीब….आणि सर्व काही घ्यावं लागतं दोन-चार समोर सीनियर असताना त्यांच्या पुढे जाऊन आऊट ऑफ टन प्रमोशन मिळालं याचं प्रारब्ध एक जण लय गरीब पण मोजमजुरी करायचं कसं तरी कधी खाल्लं कधी नाही खाल्लं त्याचा एक चुलता होता नगरला मीरावली बाबाच्या पहाडावर भिकाऱ्यांच्या रांगेत बसलेला असायचा असं किती तरी दिवस झालं चाललं होतं तिथे येणारे भाविक बाहेरच्या भिकाऱ्याला पहिल्यासारखे काय पाच दहा पैसे किंवा एक दोन रुपये देत नाहीत तर कमीत कमी 50-100 रुपये आणि नामांकित प्रकारचं खाणं…पण किती केलं तरी त्याला काय पोरबाळ नव्हतं आता तवा काय बँक अकाउंट वगैरे त्याच्या लक्षात आलं नाही त्यांनी काय केलं तिथेच आपलं मेन कापड लावून आसरा तयार केला व दोन चार उशाचे बोचके भरून नोटा जमा केल्या नंतर ती म्हातारं मेलं आता जवळचं म्हणून वारसदार याला गावातनं बोलावलं आणि ह्याला बोलावल्यानंतर भरलेल्या उशा त्याला वारसदार म्हणून दिल्या…झालं ना दोन चार लाख रुपये होते त्या बोचक्यात रात्रीत नशीब फिरलं आणि याला म्हणतात नशीब
**************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…