करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यामध्ये सुरताल संगीत विद्यालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम बाळासाहेब नरारे सर यांनी केले असून करमाळा तालुक्याचे नाव साता समुद्रा पार नेणाऱ्या प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक गणेश भाऊ करे पाटील यांनी व्यक्त केले.करमाळा फेस्टिवल कार्यक्रमामध्ये श्री जगदंबा देवी बहुउद्देशीय संस्था व महाप्रसाद वाटप मंडळ (अन्नछत्र मंडळ) यांच्या वतीने अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे यांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करण्याचे ठरविले असून आंतरराष्ट्रीय “श्री कमलाई देवी गौरव” या नावाचा पुरस्कार यावर्षीपासून सुरू केला आहे. पुढे बोलताना गणेश भाऊ म्हणाले की प्रतिकूल परिस्थितीवर मात करून कुठलीही पार्श्वभूमी नसताना आपल्या संगीतकलेद्वारे अनेकांना या संगीताचे ज्ञान देऊन करमाळा तालुक्यात सांस्कृतिक चळवळ निर्माण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचा संगीत महोत्सव कार्यक्रम करमाळ्यासारख्या ठिकाणी घेऊन करमाळा तालुक्याचे नाव उंचवण्याचे काम नरारे सर यांनी केले असून त्यांच्या कार्यास यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने सदैव पाठिंबा असून करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानी यांचा आशीर्वाद रुपी पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे हीच त्यांच्या खऱ्या कामाची पावती आहे. बाळासाहेब नरारे सर यांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने करमाळा रत्न पुरस्कार,गुरु सन्मान अवॉर्ड भिलाई सिक्कीम, गुरु नमन अवॉर्ड माझोली आसाम, सत्रिय गुरु सेनिराम मुक्तीयार अवॉर्ड गुवहाटी, सुर सरस्वती अवॉर्ड देहरादुन उत्तराखंड, श्रीरस संगीत शिरोमणी अवॉर्ड ऋषिकेश असे विविध पुरस्कार त्यांना २०२२ या वर्षात मिळाले आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी संगीत विशारद झाले आहेत. संगीत प्रशिक्षक आणि परीक्षक म्हणून अनेक विद्यापीठात तसेच राज्य व परराज्यात जात असतात. अनेक ठिकाणी मोफत संगीत सेवा देत आहेत. आंतरराष्ट्रीय श्री कमलाई देवी गौरव पुरस्कार प्राचार्य बाळासाहेब नरारे सर यांना देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे, गणेश भाऊ करे पाटील, जिल्हा परिषद सदस्य संतोष वारे, देवीचे माळचे सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दीपक थोरबोले, राजाभाऊ फलफले, योगेश सोरटे, शिवाजी पकाले, लक्ष्मण लष्कर गुरुजी, संतोष पोतदार गुरुजी, श्रीराम सोरटे, पत्रकार दिनेश मडके, मुकुंद साळुंके सर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. प्रभावी सूत्रसंचालनाद्वारे कमलाई फेस्टिवल मध्ये उल्लेखनीय निवेदन केल्याबद्दल करमाळयाचे सुपुत्र चंद्रशेखर जोगळेकर यांचाही शाल श्रीफळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यशकल्याणी संस्थेच्यावतीने समाजरत्न पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला असून दिवाळी पहाट या कार्यक्रमांमध्ये रोख अकरा हजार रुपये व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .करमाळा फेस्टिवल कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार चंद्रशेखर जोगळेकर यांनी मानले.