….. ” भरीत पार्टी “…….
तसं बघायला गेलं तर गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर जरा वसारलाय पण थंडीनं थोडंसं डोकं वर काढलयं मस म्हणत्यात गुलाबी थंडी पण बोचरीच वाटतीयं पाच वाजल्यापासून डोक्यात लोकरीची टोपी अन अंगात स्वेटर घालावा लागतोय आणि अशा टायमाला बरी आठवण झाली कारण आपण सारी खवय्ये मंडळी
काहीतरी नवीन खायला कारण बस होतं अगदी तसंच आपल्याकडे एखादा कार्यक्रम अथवा काहीजण काहीतरी कारणाने एकत्र येणे किंवा खास हुरडा पार्टी असते अगदी तशीच खानदेश विदर्भ औरंगाबाद जळगाव असा पट्टा पाहिला तर तेथे वांग्याचे भरीत आणि त्याच अनुषंगाने भरीत पार्टीचं आयोजन केलं जातं तर मी शालेय जीवनामध्ये असताना माझी मोठी बहीण खानदेश म्हणजे मालेगाव तालुका व त्यांचे विस्तारलेले पाहुणेमंडळी हे आजूबाजूचे परिसरातच असायची व पाहुणचार व्हायचा म्हणून म्हटलं जरा यावर विचार करू तर बघा खाण्याचे पण काहीतरी निकष असतात जसे माणूस जेवण झाल्यावर समाधानाचा ढेकर देतो तवा कळतं कि आपल्या या खाद्य संस्कृतीची पोचपावती ती काय असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं घर असो, समारंभ असो,नाहीतर हॉटेल व ढाबा असो तसं बघाय गेलं तर यासाठी गाव सुद्धा तसचं निवडलं जातं म्हणजे बघा गावागावात नुसती नाती नव्हती त्यांना जिव्हाळ्याचं वंगण होतं आढ्याला ज्वारीची आणि बाजरीची कणसं होती गोफण फिरवणारी पण होती तसच पाखरांचा पण विचार करणारी कधी काळी दिलदार माणसं पण होती त्यांच्यासाठी सपरावर दाणापाणी ठेवायची घरांच्या दगडी चिऱ्यात जरी भेगा होत्या तरी माणसाला माणसाशी सांगणाऱ्या अनेक जागा होत्या. घरात एखादं जित्राब दुभतं झालं की घरातला खरवस गावभर जायचा आणि घरात बाई बाळंतीन झाली की अख्ख्या गावातून शेर मापट्याचा तांदूळ यायचा पोटाला पोटाशी या ना त्या कारणाने जोडणारे अनेक रस्ते होते डोंबारी,कोल्हाटी, कुडमुडे,आणि नंदीबैलवाले असे गावकुसात फिरस्ते होते कुण्या उपाशी पोटाने पसरावा कधी पसा घास घशात आढावा असा गाव होता कदाचित म्हणूनच माणसांची नाहीतर दगडांशी माणसांचं नातं असं अभेद्य होतं
पीक पाणी पिकल्यावर गावाबाहेरच्या म्हसोबाला पण निवद होता गाव म्हणून याहुन काही वेगळे नव्हतं देवळाला खेटूनच एक दगडी पार होता म्हाताऱ्या जिवांना नाहीतर थकल्या भागल्या जिवानां थोडासा तोच एक आधार होता माथ्यावर पिंपळाची सळसळ होती गावच्या छातीत अशी कित्येक पिढ्यांची कळ होती ज्या पिढीने हा पिंपळ लावला त्या पिढीचा शेवटचा साक्षीदार होता नामा उर्फ नामदेव वाणी पारावर बसून तो हरवलेला गाव शोधायचा काही वर्षात गाव अंतरबाह्य बदलले पायवाट गेली सडका आल्या आणि या सडकेने गावच्या गावपणाला धडका दिल्या पहिला फुफाटा आता राहिला नाही बैलगाडी गेली मोटार गाड्या आल्या बैल गेले ट्रॅक्टर आले मातीवर लोखंडी फाळांचे अत्याचार झाले मातीमध्ये रासायनिक द्रव्य वतून वतून माती गर्भार राहिली आणि तिच्यातून निपजलं हायब्रीड आणि ही हायब्रीड खाणारी पोकळ दमाची पिढी जन्माला आली ती जन्मली गावातच पण ग्लोबल गप्पा हाणत हाणत मोठी झाली मोठी झाली आवडीने चहा चपाती खाणारी मंडळी सकाळीच वडापाव किंवा पिझ्झा बर्गर खाऊ लागली काही कळालच नाही
शेतीची कवा माती झाली खरंच ती पण कधी काही कळलं नाही नोकरी केवळ भाकरीसाठी झाली मग दावणी वरचे म्हातारी बैलं पण आडगळ वाटू लागले रिकामे गुरांचे गोठे पाहून नामा वाण्याचं काळीज फाटू लागलं पाच वाजता शाळा सुटली की पोरं ओरडत पळायची आणि त्यात उद्या शाळेला सुट्टी असली की काय विचारूच नका त्यांना पळताना बघायचं एका हातात पाठीवरचं आठ किलोच दप्तर दुसऱ्या हाताने ती ढगळ अशी कायम खाली निसटणारी ती चड्डी पळताना दुसऱ्या हातानी धरलेली असायची अशा अवस्थेमध्ये ती पोरं मागे बघून पुढं बेफाम पळायची त्यातली काही ठेचंकाळाची पण परत उठून नव्या जोमाने पळायची आणि अशा गावात ठरवला भरीत पार्टीचा बेत…
कारण भरीत पार्टी करायची म्हटलं तर तो हंगाम ऐन थंडीत असतोय डिसेंबर जानेवारीच्या महिन्यात जरासा या खानदेशामध्ये फेरफटका मारल्यावर आणि भरताची चव न चाखताच परत जर गावी आल्यावर फेरी वाया गेली असं म्हणून समजायचे जर आपले नातेवाईक किंवा मित्र जळगाव किंवा खानदेशात किंवा त्या परिसरात राहत असतील तर त्यांनी तुमच्या पाहुणचारासाठी ठराविक परिसरातून आणलेल्या वांग्यांचं त्याच गावच्या माणसाने तयार केलेल्या भरताच जेवण ठेवलं नाही तुमच्या नातेवाईकाचं तुमच्यावर प्रेम नाही अशी खूणगाठ मनी बांधायला काय हरकत नाही इतकं तर भरीत आणि खानदेशाचं नातं पक्क जोडलेलं आहे कारण जळगावला येऊन इथलं भरीत खाऊ घालत नाही म्हणजे काय जळगावातली भरताची वांगी आणि त्यांचे विशिष्ट पद्धतीने केलेले भरीत ही चीज अशी आहे खास भ
रताचे वांगे हे दिसायला पांढरे हिरवे वांगे व विशिष्ट अशी पद्धत खास आहे वातावरणामध्ये थंडी असताना एखाद्या शेतात भरीत पार्टीला उपस्थित राहणं हा इथला उत्सव असतो अंगाला झोपणारी थंडी समोर केळीचे पान त्याच्यावर गरम गरम भरीत शेजारी तशीच कळण्याची नाहीतर बाजरीची तीळ लावलेली हिरवीगार भाकरी वरचा पापुद्रा काढला तर कधी कधी वाफचा चटका बोटांना बसतोय मुळ्याच्या फोडी आणि तोंडी लावायला दही घातलेली टोमॅटोची कोशिंबीर आ हा हा हाsss असल्या पार्टीच्या आठवणीतही अस्सल खानदेशी माणूस त्यातल्या त्यात जळगावचा असेल तर कासावीस होतो भरीत बनवण्याच्या पद्धती खूप आहेत त्यात फरक सुद्धा आहे पण तेच तर इथल्या चवीमागचं इंगीत आहे खानदेशाच्या बाहेर या भरताला खानदेशी भरीत म्हणून ओळख आहे तर खानदेशातच पण जळगावच्या बाहेर याला जळगावचं भरीत म्हणून सुद्धा लौकिक आहे जळगावकर मात्र वांगी निवडतात ते ठराविक परिसरातल्या म्हणजे विशेषता बामनोद भागातली हे एक प्रगत गाव बामनोद हे भुसावळ यावल रस्त्यावर लागणारे एक छोटसं गाव इथून वांगी थेट मुंबई पुण्याला रवाना केली जातात स्थानिक बाजारामध्ये आठ रुपये किलो असलेली भावाची वांगी मुंबई पुणे येथे 20 रुपये पावशेर म्हणजे साधारण 60 ते 80 रुपये किलो दराने विकली जातात त्यामुळे या लहानशा गावाचे अर्थकारण ही बदलत चाललयं सगळे शेतीकाम व मशागतीमध्ये मश्गुल आहेत आता या वांग्याच्या लागवडीचे आपसुकच क्षेत्र वाढलेले आहेत जळगाव जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरचे सर्वच तालुके ही वांगी पिकवतात विदर्भामध्ये थेट मलकापूर शेगाव पर्यंत ही वांगी आता सहज उपलब्ध होताना दिसतात
आणि हाच भाग आहे जिथे लेवा पाटील समाज मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि यांचं महत्त्वाचं व्यंजन म्हणजे भरीत कारण या समाजातली पुरुष मंडळी जसं भरीत बनवतात तसं कोणालाही बनवता येत नाही भरतासाठी वांगी भाजावी लागतात काहीजण कापसाच्या काड्यावर वांगी भाजल्याने या भरताला खरी विशिष्ट अशी चव मिळते काही निष्णात अशी खवय्ये मंडळी सांगतात की खानदेशी भरताची चव पाहिजे असेल तर वांगी ही या काड्यावरच भाजायला पाहिजे भाजण्यापूर्वी त्यांना बाबळीच्या काट्याने छिद्र पाडावी लागतात नंतर एका परातीत ठेवून काळे झालेले सालं काढायचे चांगल्या दर्जाच्या वांग्यांना भाजल्यावर तेल सुटते सालं व देठं काढलेला किंवा मुद्दाम फक्त देठं ठेवलेली वांगी त्याचा गर एका लाकडी भांड्यात टाकायचा त्याला बडजी म्हणतात आणि हा गर लाकडाच्या छोट्या मुसळ्यासारख्या वस्तूने ठेचला जातो त्यामुळे तो गर एकजीव होतो चविष्ट भरीत बनवण्यात जळगाव पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या असोदा या गावातले आचारी प्रसिद्ध आहेत अनेक पिढ्यांची परंपरा तेथे आहे
इथले माननीय किशोर वाणी हे नव्या पिढीतले भरतातले मास्टर भरीत बनवून ते जळगाव पासून ते पुणे मुंबई पर्यंत हॉटेलपर्यंत सर्वांना पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे लग्न समारंभाच्या पार्टीच्या ऑर्डर्स त्यांना मिळत असतात असे ठेचून एकजीव झालेल्या वांग्यांच्या गराला फोडणी दिली जाते फोडणीमध्ये तिखटा ऐवजी भाजलेल्या गावरान मिरचीचा ठेचा टाकला जातो त्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरली जाते चवीला तिखट असलेले भरीतच थंडीमध्ये मजा देते कांद्याची पात भरतासाठी आवश्यक असते हिरवी पात चिरून ती ही भरतात टाकली जाते त्या पातीचेच कांदे जेवताना तोंडी लावायला दिले जातात खोबरे शेंगदाणे हे फोडणीच्या वेळी तर ठेचलेला लसूण फोडणी दिल्यानंतर भरतात टाकला जातो आणि हे भरीत बाहेरगावी किंवा प्रवासात एक-दोन दिवस वापरायचं असेल तर फोडणी न दिलेला गर वापरण्यात येतो असा गर साधारण बारा तास चांगला राहतो भरता बरोबर कळण्याची भाकरी कळना म्हणजे ज्वारी व उडीद यांचे मिश्रण साधारण एक किलो ज्वारी व 250 ग्रॅम उडीद टाकले म्हणजे कळना तयार आता कळन्याच्या भाकरीची जागा कळन्याच्या पुऱ्यांनी घेतल्यामुळे या पार्टीला वैभव प्राप्त झालेलं आहे
पार्टीमध्ये भरीत उरलच तर ते घरोघर पाठवलं जातं फ्रीजमध्ये ठेवलं तर दुसऱ्या दिवसापर्यंत ती चांगलं राहतं शिळ्या भरताची भाजी आणि भाकरी केली जाते भरतात मिरच्या टाकून त्या तळल्या की उत्तम भजी तयार होतात भाकरी करण्यासाठी भरतामध्ये ज्वारीचे पीठ टाकून नेहमीसारखी भाकरी करता येते या भज्यांची अन भाकरीची चव पण काही वेगळीच न्यारी लागते जळगाव जिल्ह्यात पिकणाऱ्या या वांग्याची लागवड इतर प्रदेशात पण केली तरी त्यांना ती चव येत नाही या वांग्यावर संकर झालाय त्या संकरित वांग्यांना मूळ वांग्यांची चव व मजा येत नाही त्यामुळे गावठी वाणाच्या वांग्यांनाच जास्त मागणी असते वाण किती जुनं हे सांगता येत नाही पण पंधराव्या शतकातील महानुभव पंथांचे कवी माननीय नारायण व्यास बहाळीचे यांनी इथल्या भरताचा उल्लेख त्यांच्या कवितेमध्ये केलेला आढळून येतो बहुदा ही अशी वांगी जांभळासारख्या रंगाची आकाराने लांब अथवा मोठी असतात त्यामध्ये बिया नसतात आपल्याकडे सर्रास हायवेवर बैंगन भरता यामध्ये या वांग्याचा वापर करतात पण ती खानदेशातली चव जरी नसली तरी विविध कंपन्यांच्या आकर्षक चवीच्या मसाल्यामुळे याला नेमकं कोणतं भरीत म्हणायचं हा प्रश्न पडतो कारण भरीत पार्टी हा एक आनंदोत्सव असतो पार्टी देणाऱ्याला व घेणाऱ्याला पण आनंद द्विगणित करता येतो साधारण पाच पासून पाचशे लोकांपर्यंत या भरीत पार्टीचं नियोजन केलं जातं साधारणता माणसी एक किलो वांग असं भरताच गणित असते अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे परदेशी पर्यटक सुद्धा हौसेनं केळीच्या पानावर भरीत भाकरीचा आस्वाद घेतात शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक परिषदा,चर्चासत्रे ,मेळावे,असो की रोटरी लायन्सच्या बैठका असोत येथील जेवणावळीमध्ये भरीत भाकरी हा मेनू आवर्जून असतोच
खानदेशामध्ये वांग्यांचे विविध प्रकार पिकवले जातात हिरवे आणि जांभळे वांगे काटेरी वांगे या भागात पिकतात भरतासाठी लांब हिरव्या वांग्याची निवड केली जाते ही वांगी देखील या भागात मुबलक पिकतात पण आणि विकतात पण एवढेच काय साधं सिंहगडावर फिरायला गेलं तरी माननीय सायबु दादा यांचे खेकडा भजी अन वांग्याचे भरीत एक जिभेचं पारणं फेडणारा सोहळा याला पर्यटकांची लय मागणी जिथे दोन भाकरी माणूस खात असेल तिचं निसर्गाच्या सानिध्यात तीन भाकरी हाणतयं घरी हा प्रकार करता येतो पण तिथं जाऊन निसर्गरम्य वातावरणात खाण्यात वेगळीच मजा म्हणून बाराही महिने या भागात येऊन जिभेचे चोचले पुरावणारे खवय्ये मंडळी ही खूप पाहायला मिळतात
……………………………………………………….
किरण बेंद्रे
पृथ्वी हाईट्स…कमल कॉलनी… पुणे
7218439002
………………….
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…
करमाळा प्रतिनिधी छोटे छोटे भूखंड उपलब्ध व्हावे या मागणीसाठी आपण विशेष प्रयत्न केले असून उद्योग…