तसं बघायला गेलं आणि जरा बारीक विचार केला तर कष्टकरी ती पोटाची भूक भागवण्यासाठी खातात तर उच्चभ्रू फॅशन म्हणून मोठ्या स्टार हॉटेलात वेटरला त्याची ऑर्डर देतात… देहू आळंदी पंढरपूरची वारी करणारे वारकरी पूर्वी झुणका भाकर खाऊनच पायपीट करायचे पालेभाज्या… फळभाज्या… किंवा शेंग भाज्या अथवा आमटी करायला कुठे कोणाला वेळ होता वारीचा पुढचा पल्ला गाठायचा असतो आणि त्या जगजेठीचे वेध लागलेले असतात ती झुणका भाकर खाल्ल्यामुळे त्यांना जी ऊर्जा मिळते ती पंढरपूरपर्यंत पुरत असायची
आता आपण जरा दुसऱ्या दृष्टिकोनातून विचार करू मला एक समाजाचे विशेष आणि वैशिष्ट्य जाणवले की तो कुठलाही असो त्यामध्ये प्रेम… आग्रह अगदी भरगच्च भरलेला असतो पाहुणा आल्यावर किंवा पाहुणा म्हणून आपण गेल्यावर एखाद्या समारंभामध्ये आवश्यक खायचा पदार्थ मेनू हा ठरवून आखतात आता त्यांचं प्रदेश परत्वे वेगवेगळेपण आपल्याला अवश्य जाणवतं कारण तसं पाहायला गेलं तर आपली पडली ग्रामीण संस्कृती म्हणजे काही दृष्ट्या असेल नसेल तरी निभावून नेणारी भाजीला जिरे… मोहरी कमी असतील किंवा नसतील तरी चालतंय पण मिळतं जुळतं हा विशेष गुण आपल्या अंगात मुरलेला अन त्यामुळेच एक प्रकारचा निष्काळजीपणा आपल्यात असलेलं जीवन त्यांना जगता येतं पण एका दृष्टीने बघितलं तर त्यातलाच एक प्रकार आहे झुणका भाकर हा मेनू तसं पाहिला तर अक्षरशः झोपडीत वास्तव्यास असलेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही म्हणजे इथं राहणारा शक्यतो मोलमजुरी करणारा वर्ग असतो म्हणजे काम करून कसंतरी जीवनाचा आणि संसाराचा गाडा तो हाकत असतो
पण ज्यावेळी भाजीपाला वगैरे काही उपलब्ध नसेल तेव्हा झुणका भाकरीची निवड होते आणि कौतुकाचा विषय म्हणजे विना कटकट स्वयंपाक आणि तो पण पाच मिनिटात 50 माणसांचा पोटभर खा स्वयंपाक तयार भाकरी पण पोटभर सोबत बुक्कीत फोडलेला कांदा…नाहीतर तव्यावर खडे मीठ टाकून रगडलेला ओबडधोबड हिरव्या मिरचीचा ठेचा… काय जबरदस्त मेजवानी होते आता बघा तसं बघितलं तर माणसांचं जीवन कसं विस्कळीत झालं आहे नव्हं ती त्यांनी स्वतःहून करून घेतलयं 50 वर्षांपूर्वी हा स्वयंपाक एवढा मनात भरत नव्हता पण त्यात आताच्या जनरेशनला हे फार प्रिय झाले अहो त्यासाठी स्टार हॉटेल सुद्धा उपलब्ध झालेले आहेत अन तिथे सुद्धा खेड्याचा लुक येण्यासाठी हॉटेलच्या प्रांगणात बांबू किंवा वेत अथवा कुडापासून उभारलेल्या झोपड्या म्हणजे कॉटेज असतात आणि त्यात बसून झुणका भाकरीचा आस्वाद घेणे धन्य आपण खेड्यात होतो शहरातला भाजी पोळी…वरण-भात खायचा आपण पिठलं भाकरी किंवा आमटी…वांग्याची भाजी असं खायचं आपली असायची चूल त्याच्याकडे पाहुणा म्हणून गेल्यावर कळायचं त्याचे वेगळे किचन रूम काय तो थाट आपल्या इथं चुलीतली लाकडं फुकून फुकून डोळे लाल व्हायचे याच्या इथे गॅस आहे पण आता राहणीमान पूर्ण बदलले आता शहरातलाच चुलीवरची भाकरी ती पण झोपड्यात बसून खाण्यासाठी अट्टाहास करतोय
आता तसं बघायला गेलं तर झणझणीत म्हटल्यावर डोळ्यासमोर येतं ते गरम गरम पिठलं आणि ज्वारीची भाकर वर जरासा मिरचीचा ठेचा लिंबू आणि कांदा त्याचबरोबर दही अहाहा काय बहार येईल जेवायला आणि ते पण गजबजलेल्या शहरात एकाच ठिकाणी मिळालं तर दुधात साखर म्हणावी लागेल असं लज्जतदार मराठमोळं खाणं म्हणजे पर्वणी झाली की राव त्यातही शहरात हॉटेल पुष्कळ असतील पण हा खास मेनू मिळणारी हॉटेल ही विरळच काही ठिकाणी झुणका भाकरी तसेच वांग्याचे भरीत खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो त्यातही पिठल्यात असलेला अर्धवट कच्चा कांदा जेव्हा दाताखाली टच टच होतो तेव्हा खाण्याला बहार येते पिठल्यातली मोहरी चांगली तडतडली असल्याने ती दाताखाली आली की जो सुगंध छोट्याशा पाकळीत येतो तो केवळ मधुर मोहरी जळू द्यायची किंवा लसूण करपून चॉकलेटी होऊ द्यायचा ही रेसिपी इतर ठिकाणी चाखायला मिळलंच असं नाही
ज्वारी किंवा बाजरीची भाकरी भट्टीत भाजली असल्यामुळे त्याचा खरपूसपणा जिभेवर रेंगाळत राहतो भाकरीचा पापुडा खाण्यात जी मजा आहे ती आणखीन कशातच नाही काही ठिकाणी पिठल्यातील लसूण फारसा तळू न दिलेला…कारण पोटासाठी लसूण फारसा चांगला असतो हे कळाल्यावर या सामाजिक भानाचं कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही झुणका बनवताना बेसन बारीक चाळणीने चाळून घ्यावं लागतं त्यात आवश्यक पाणी घालून एकजीव करावं लागतं तेलात बारीक कांदा…जिरे… मोहरी…आलं… लसूण याची पेस्ट घालून त्या मिश्रणात आवश्यक तेवढे गरम पाणी टाकून चमच्याने घुसळल्यानंतर झुणका जन्म घेतो त्याला आपण सर्वांनी डोक्यावर घेतलं एक प्रकारचा खाण्यातला…स्वयंपाक घरातला… हॉटेलच्या टेबलावरचा सेलिब्रिटी होऊन बसलाय त्यातच त्याच्यासोबत शेंगदाण्याची लाल चटणी तिखटाची लज्जत आणखीच वाढवणार
आणखी एक दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे तोंडी लावा किंवा भाकरीबरोबर खा डोळ्यातून पाणी हे काढणारच झुणक्यातलं वांग्याचं भरीत हे गावठीपणाचा अस्सल नमुना आहे कारण एका अर्थाने पाहिलं तर झुणका हा महाराष्ट्राचा पारंपरिक शाकाहारी मराठी खाद्यपदार्थ आहे डाळीचे पीठ खरपूस शिजवून घट्ट स्वरूपात बनवलं जातं आणि हे जर थोडंसं पातळ केलं तर त्याला पिठलं म्हणतात आणि फ्राय म्हणजे बहुतेक पाणी न घालता नुसत्या तेलावर बनवलं जातं त्याला सुट्टा म्हणतात हा फार तिकड जाळ करावा लागतो बहुतेक प्रवासामध्ये अवश्य याला परगावी घेऊन जातात पिठलं आणि झुणक्यात कांदा आणि हिरवी मिरची अवश्य असते ते भाकरी किंवा भाताबरोबर खाल्ले जाते खास पदार्थाच्या विश्वामध्ये झुणका भाकर ही जोड गोळी प्रसिद्ध आहे काही ठिकाणी काळा मसाला सुद्धा वापरतात तर काही ठिकाणी हिरव्या मिरच्या बारीक तुकडे नाही तर पाट्यावर बारीक वाटून घालतात त्यात पण झुणका भाकर म्हटले की जर आपण शहरात किंवा गाव सोडून पर ठिकाणी राहत असेल तर आपल्याला अवश्य गावाची आठवण आल्याशिवाय राहत नाही लहानपणी सुट्टीत गावी गेल्यावर झुणका भाकर खाणं व्हायचं ती चव शहरात काही अनुभवता आली नाही याला कारण गावाकडचं नैसर्गिक पाण्यातलं वेगळेपण
इथे शहरात आल्यावर कधीतरी पिठलं भाकरी केली जायची त्यावेळी झटपट होणारा पदार्थ म्हणून सर्वांना आवडायचा पण पुण्यामध्ये माननीय आप्पा थोरात यांनी 19 नोव्हेंबर 1974 रोजी अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून कष्टकरी बांधवांसाठी झुणका भाकर केंद्र सुरू करून इतिहास रचला अवघ्या 50 पैशांमध्ये पोटभर जेवण झुणका भाकर देणारे हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र होते 1972 च्या दुष्काळाची झळ कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात सोसावी लागली होती हे केंद्र सुरू झाल्यापासून त्यांना थोडा दिलासा मिळाला होता शहरातील मध्यमवर्गीय सुद्धा तिथे जाऊन झुणका भाकरीचा आस्वाद घेऊ लागले काहीजण तर प्रेक्षणीय स्थळासारखं पुण्यात आल्यावर आवर्जून येथे भेट द्यायचे कौतुक करायचे आणि झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचे नंतर काही वर्षानंतर मंडळांनी झुणका भाकर बरोबरच पुरी भाजी…भजी… मिसळ इत्यादी पदार्थ पुरविणे चालू केले
अहो एवढंच काय मी स्वतः पाहिले तो काळ होता 90 चं दशक अवघ्या सात रुपयांमध्ये मोठ्या खोलगट परातीत दोन भाकरी व भरपूर रस्सा भाजी असं चुरुन मुरून जेवण व्हायचं सोबतीला चार रुपयाची कांदा भजी प्लेट तोंडी लावायला असल्यावर जेवण केव्हा संपायचं कळत पण नव्हतं आता दुसरी गोष्ट म्हणाल तर ठेचा हा आपण आपला पारंपरिक पदार्थ आता विविध कंपनीचे ब्रँड खर्डा काही लाल मिरचीचे काही हिरव्या मिरचीचे आलेले आहेत त्यासाठी भरपूर प्रमाणात मागणी पण आहे
पण खेड्यातल्या झोपडीमध्ये आपल्या आईने रानगवऱ्याच्या हारावर भाजलेल्या हिरव्या मिरच्या नाहीतर चुलीवरच्या तव्यावर थोडीशी वरून तेलाची धार टाकून लसणाच्या दहा-वीस कुड्या आणि पांढरे खडे मीठ टाकून पितळी तांब्याने तव्यावरच त्या मिरच्या चांगल्या एकजीव रगडायच्या तो ठेचा खाण्यात खरंच सुख होतं आता काही वेळेस जवस… कारळं…शेंगदाणा याची सुकी चटणी गरम झुणका वरून तेलाची धार असा बेत असल्यावर काय तो आनंद शब्दात वर्णावा आज ही सिंहगडावर फिरायला जाणारे पर्यटक वर गडावर जाताना पायथ्यापासूनच आपल्याला झुणका भाकर चे स्टॉल काहीशा प्रमाणात दिसतील त्यामध्ये आवर्जून भेट देण्यासारखा स्टॉल म्हणजे माननीय सायबू दादा यांचा झुणका भाकर स्टॉल एक पत्र्याची शेड वजा रचना केलेली कलाकृती पण या स्टॉलची कित्येक वेळा मीडियानी दखल घेतली त्यामुळे नावारूपाला आलेला स्टॉल
तसं पाहायला गेलं तर इतर स्टॉल ही नामांकितच आहेत खरोखर खूप सुंदर निसर्गमय वातावरण अगदी जिभेचे पारणे फेडणारे त्या प्रत्येकांची एक विशिष्ट प्रकारची देण्यात येणारी सेवा ते प्रेमळ गोड मायेचं बोलणं तिथली प्रसिद्ध अशी कांद्याची खेकडा भजी… वांग्याचे भरीत…मटकीची उसळ…छोट्या मातीच्या बोळक्यातील दही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ती कांदा आणि त्यामध्ये टाकलेलं भरपूर लाल तिखट आणि पिळलेलं लिंबू अन जोडीला मस्त गरम गरम झुणका सोबतीला निसर्ग अशी मजा लुटायसाठी प्रत्येक जण शनिवार-रविवार किंवा सुट्टीचे दिवस गाठून इथे अफाट गर्दी करतो आणि निसर्गाचा आणि झुणका भाकरीचा आस्वाद लुटतो
—————————🏝️——————————-
किरण बेंद्रे….. लेखक
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…