खरंच पदर हा शब्द किती जादुई आहे ऐकल्यावर असं वाटतंय आपल्यावर कोणीतरी माया करतोय चेहऱ्यावरून हात फिरवून स्वतःच्या कानशिलावर बोट मोडतय इतकी माया आणि त्याचे विश्व या काना मात्रा वेलांटी नसलेल्या शब्दांमध्ये सामावले आहे
आपल्या परंपरेमध्ये महिला वर्गाने नेसायच्या साडीचा नेसल्यापासूनचा शेवटचा साधारण मीटरभर त्या साडीचा भाग एक वेगळाच इतिहास बाळगून बसलाय त्याला मोठ्या आदराने ” पदर ” असं संबोधतात काना,मात्रा,वेलांटी,उकार नसलेला स्वतंत्र्य अस्तित्व असलेला शब्द त्या वारभर पदरात पिढ्यानपिढ्याचा इतिहास वारसा आणि परंपरा दडलेली आहे कारण पदर म्हणजे मांगल्याचे प्रतिक, वात्सल्याचं दुसरं नाव,कुटुंबातील थोर अधिकारी समोर येताच तो आपोआप वितभर पुढे येऊन मानपान देतो, आदर व्यक्त करतो एवढंच काय माहेरची माणसं बघितल्यावर कदाचित लाडानी मागं पण जात असेल पण सासरच्या मंडळीची चाहूल लागताचं डोक्यावर यायची घाई करतोय तो पदर…
समजा एखादी चूक झाली असेल तर चूक भूल द्यावी घ्यावी म्हणून पदर पसरला जातो आणि कुलदेवते पुढे हातात पदर धरून पायाशी लीन व्हावं लागतं काही वेळेला गळ्यापर्यंत आलं तर पदर कमरेला सुद्धा खोसावा लागतो तर कधीतरी तो स्वच्छंदीपणे वाऱ्याच्या लाटेवर स्वार पण होतो जरतारीचा पदर म्हणजे मोराला नाचायला सापडलेली हक्काची जागा म्हणावी लागेल याने तर तमाम स्त्री वर्गाला एक भुरळच पाडली काही कमी पडलं तर स्वतःची पदरमोड करून भर घालावी लागते हा पदर हिंदू संस्कृतीमध्ये डाव्या खांद्यावरून तर गुजराती,मारवाडी अथवा दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये उजव्या बाजूने खांद्यावरून घेतलेला शक्यतो दिसतो मध्यंतरी एक चित्र व्हायरल झाले होते घराच्या अंगणात चार-पाच आजीबाई प्रत्येकीचे डोईचे केस पांढरे झालेले चेहऱ्यावर निसर्गाने सुरकुत्यांची डिझाईन काढलेली साधारण 70 वर्षे पार केलेली पण प्रत्येकजणीची नऊवार साडी आणि डोक्यावर पदर आणि खाली लिहिलं होतं की यांच्यामुळेच आपली संस्कृती टिकून आहे वय झालं पण डोक्यावरचा पदर ढळू दिला नाही ही आपल्या संस्कृतीची फार मोठी साक्ष आहे
लग्न समारंभ असो किंवा धार्मिक कार्यामध्ये ओटी भरल्यानंतर ती आपल्या भगिनीला पदरातच घ्यावी लागते असा रिवाज आहे तान्ह्या बाळाला भूक लागल्यावर त्या आईच्या पदराआड जाऊन पोटभर दूध पिऊ शकतं आणखी त्या पदरानं काय काय करावं ही झाली प्राथमिक स्वरूपाची गरज लग्नामध्ये पण वधू-वरांची लग्न गाठ नवरीच्या पदरासंग नवरदेवाचे उपरणं असं त्यांचं नातं असतं आणि ते पुढे आयुष्यभर टिकवायचं असतं घेतलेला पदर हा एका विशिष्ट पद्धतीचा असेल तर एक प्रकारे राजेशाही थाटच दिसतो आजच्या जमान्यामध्ये प्रत्येक लेकीला आईचा पदर हवाहवासा वाटतो मनातलं दुखणं खूपणं त्या पदराशी जोडून भावनांना वाट मोकळी करू देत असतं प्रत्येक वेळी पदर हवा तेव्हा मिळतोच असं नाही लग्नानंतर या पदरांची लेकीनां खूप आठवण होत असते या मायेची ऊब प्रत्येकीला हवीहवीशी वाटते नोकरी करणारी किंवा गृहिणी असो घर मुलं कुटुंब या सगळ्या जबाबदारीत गुंतून जात असते तरीही मायेच्या ऊबेची संध्याकाळ तिला नेहमीच हवीहवीशी वाटत असते
एक स्त्री म्हणून.. मुलगी,बहीण,बायको,वहिनी,नणंद,आई,आजी या कुठल्याही नात्यातील जबाबदारी पार पाडत असली तरी आईचा पदर तिच्यासाठी मखमलीची शाल, वासल्याची मऊ ऊब बनत असतो धकाधकीच्या जीवनात अनेक नाती मागे पडतात,काही सोडून जातात,काही रागावतात,काही जळकट स्वभावाची असतात,काही थांबतात, तर काही तोडून जातात अनेक जबाबदाऱ्या पेलावत असताना कालांतराने नात्यातील ओढ ही कमी होत असते अबाधित असते ती एकच ओढ आणि ती म्हणजे आईचा पदर जीवनात अनेक अडचणी येतात-जातात त्यावर अनेकजणी मात करतात काही शिकतात काही सावरतात तर काही धडपडतात या सगळ्यात स्वाभिमान,अभिमान,आणि आत्मविश्वास कळत नकळत कमी होत जातो अचानक काही जबाबदारीने खचूनही जातात शेवटी वेळेच्या पाठी पळताना कुटुंबाची काळजी घेताना स्वत्वाची जाणीवच मागे पडून जाते जेव्हा जाणीव होते तेव्हा हक्काची व्यक्ती समोर असेलच असं नाही
कुणाशी संवाद साधून मोकळं होईल असं नाही मात्र आईचा पदर याला अपवाद ठरत असतो तसे एका दृष्टीने बघायला गेलं तर पदर काय जादुई शब्द आहे तो पण मराठीतला तीन अक्षरी शब्द पण केवळ विश्व सामावले त्यात किती अर्थ किती महत्त्व काय आहे ना हा पदर दिसणाऱ्या स्त्रीच्या खांद्यावर रुळणाऱ्या मीटर दीड मीटर लांबीचा नक्षीदार भाग तो स्त्रि च्या लज्जेचं रक्षण तर करतोच सगळ्यात महत्त्वाचं काम… पण आणखी बरीच कर्तव्य तो पार पाडत असतो त्या पदराचा उपयोग स्त्री केव्हा अन कशासाठी करेल हे सांगताच येत नाही सौंदर्य खुलविण्यासाठी सुंदरसा पदर असलेली साडी ती निवडत असते सन समारंभामध्ये तर छान छान पदराची जणू स्पर्धाच लागलेली असते सगळ्या जणी मध्ये चर्चा तीच असते स्त्री वर्गाची खासियत अशी की आपली साडी कितीही भारी असेल तरीही समोरचीच्या साडीचे तिला भारी कौतुक वाटत असते एक प्रेमळ हेवा वाटत असतो लहान मुल अन आईचा पदर हे एक अजब नातं आहे मुल लहान असताना आईच्या पदराखाली जाऊन अमृत प्राशन करण्याचा हक्क बजावतं तेच पोरगं किंवा पोरगी जराशी मोठी झाली वरण भात खायला लागली तर तिचं तोंड पुसायला आई पदर पटकन पुढं करते
मग अजून मोठं झालं शाळेत जायला लागलं रस्त्याने चालताना आईच्या पदराचाच आधार घेऊन चालतंय एवढेच काय जेवण झाल्यावर टॉवेल ऐवजी पटकन आईचा पदर शोधतो आणि आईलाही या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात मुलानं पदराला नाक जरी पुसलं तर ती रागावत नाही बाबा जर रागावले, ओरडले तर मुलांना पटकन लपायला आईचा पदर सापडतो खांद्यावरून पुढे सोडलेला पदर मोरपिसासारखा फुलतो काही घराण्यामध्ये मोठ्या माणसांचा मान राखण्यासाठी सुना पदरानी चेहरा झाकून घेतात तर काहीजणी आपला लटका राग दर्शविण्यासाठी मोठ्या फणकाऱ्यानी पदर झटकतात सौभाग्यवातीची ओटी भरायची ती पदरातच संक्रांतीचं वाण लुटायचं ते पण पदर लावूनच बाहेर जाताना उन्हाची दाहकता थांबवण्यासाठी पदर डोक्यावर ओढला जातो तर थंडीत अंगभर पदर लपेटल्यावरच छान ऊब मिळते काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी पदराला गाठ बांधली जाते पदर हा शब्द खरोखरच किती अर्थाने वापरला जातो नवीन नवरी नवऱ्याशी बोलताना पदराशी चाळा करते पण कामाचा धबडगा दिसला की पदर खोचून कामाला लागते देवापुढे चुका कबूल करताना माझ्या चुका पदरात घे म्हणून त्या विधात्याला विनंती करतो मुलगी थोडी मोठी झाल्यावर आई तिला साडी नेसायला शिकवते आणि काय म्हणते माहितीयं का चालताना तू पडली तरी चालेल पण पदर पडू देऊ नकोस अशी आपली संस्कृती आहे
या पदरावरून कितीतरी म्हणी रूढ झाल्यात पदर सुटला म्हणजे फजिती झाली, कुणी पदर ओढला म्हणजे छेड काढली असा हा संकेत असा किमयागार पदर आपल्याजवळ फार मोठा इतिहास घेऊन प्रत्येकाच्या घराघरात संस्कृतीच्या रूपाने प्रत्येक भगिनीच्याच्या खांद्यावर सदैव हसत खेळत बागडत राहत असतो प्रत्येक लेकीला आपल्या आईकडून हौसमौज करून घ्यायला आवडते यासाठी वयाचं काय मोजमाप कधी असूच शकत नाही माहेराहून सासरी निघताना आई तिच्या लेकीची खणानारळाने ओटी भरते माझी नंदाई मात्र प्रत्येक लेकीची ओटी अनेक अनेक संपन्न गोष्टीने तिच्या विशाल मायेच्या पदराने भरते धावपळीच्या या जीवनात अनेक संकटांना अडचणींना सामोरे जावं लागतं त्याला तोंड देताना अनेकदा संपल्यासारखं वाटतं पण मायेने विचारपूस करणारा आवाज आणि तिचा पदर सोबत असला की 10 हत्तीचं बळ आल्यासारखी वीरश्री अनुभवायला मिळते आयुष्यात मागे वळून पाहताना तेव्हाची मी आणि आताची मी यात स्वतःला अनेक पैलू पहायला मिळतात हा पदर म्हणजे आनंदाची खाण आहे जितका लुटू तितका तो वाढतच असतो प्रत्येक मुलीला बहुतेक नेहमी वडीलासारखं राहायला आवडतं मुलीचं पहिलं प्रेम तिच्या वडीलावर अधिक असतं तसं असलं तरी मात्र या प्रेमासाठी लेकीला वडिलांसारखं बनवण्यासाठी अफाट मेहनत कष्ट आणि शिस्त याचं भक्कम पाठबळ हे आईचच असतं ही किमया तिने तिच्या पदराने भरलेल्या ओटीचीच असते
आता यानंतर आपण थोडसं इरकल साडीच्या पदराकडे वळू म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये इरकल म्हणून प्रचलित असलेली साडी मूळची कर्नाटकची म्हणून या साडीला इलकल म्हणतात कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावात तसं पाहिलं तर सुमारे आठव्या शतकापासून देवांग,पद्मनाभ,पद्मशाली इत्यादी जमातीचे विणकर ही पारंपारिक इलकल साडी हातमागवर विणत असायचे हातमागावर विणलेल्या साड्यांची खासियत म्हणजे मुख्य साडी आणि पदर वेगवेगळ्या पद्धतीने विणला जातो आणि कोडी नावाचं खास टेक्निक वापरून पदर मुख्य साडीला जोडला जातो या साडीचा पदर एका विशिष्ट पद्धतीचा असतो लाल,पांढऱ्या किंवा मरून रंगाचे पट्टे या पदरावर असतात या पदराला टोप पदर म्हणतात हल्ली मात्र दुसरेही रंग इरकलच्या पदरावर झळकताना दिसतात
ठराविक डिझाईन्स असलेले पदर खुलून दिसतात ते मात्र अशा सुंदर पारंपारिक गोंड्यामुळे त्याला टॅसल्स असेही म्हणतात खास करून नुसत्या पदरावरूनच असली इरकल ओळखता येथे ओरिजनल इरकल ओळखण्याची खूबी म्हणजे पदर साडीचा जिथे जोडला जातो तो भाग साडीच्या उलट्या बाजूने बघावा इंटरलॉकिंग लूप पद्धतीने साडीचे उभे धागे म्हणजे पदराचा ताना एकमेकांना जोडलेले दिसतात ज्याला कोडी टेक्निक असे म्हणतात मात्र ही गोष्ट सरावानेच कळते कारण हे अतिशय बेमालून पणे जोडलेले असते तसं खरं बघायला गेलं तर आपली संस्कृती आणि पदर यावर एक छोटासा ग्रंथ तयार होऊ शकतो परंतु इथं या धकाधकीच्या जीवनात वाचायला वेळ नाही म्हणून हा एवढासा कथासार…
****************************************
***** किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…