…………… तसं बघायला गेलं तर विषय खूप जिव्हाळ्याचा आहे खूप दिवस मनात जलबिचल चालली होती लिहावं का लिहू नये पण आपल्या संस्कृती आणि लोककलेबद्दल लिहायला मला आधीच स्फुरण चढतं म्हटलं लिहावं तरी एकदा… आणि विषय होता वारकरी संप्रदाय…मी याबद्दल पुष्कळ मथळे पाहिलेत कोणी अभियान, कोणी चळवळ,तर कोणी ध्येय अशा अनेक विविध उपमा दिल्या गेल्यात तसं पाहायला गेलं तर ही चळवळ नाही कारण चळवळ ही एका मागणीसाठी केली जाते राबवली जाते पण उद्दिष्ट एकच आहे ठराविक ध्येयापर्यंत पोहोचायचं त्यालाही अनेक मार्ग आहेत उपोषण,मागणी,निवेदन,बैठका,चर्चा, शेवटी संप किंवा मोर्चा पण यामध्ये वरीलपैकी वारकऱ्यांना कुठलेही व्यंजन लागू होत नाही
हा ध्येय म्हणजे चळवळीतील व्यक्ती ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय स्वस्त बसत नाही अगदी तसंच एका ठराविक ध्येयाने तल्लीन झालेले माझे भाविक वारकरी एक ध्येय धरून असतात ते म्हणजे त्या जगजेठीचे प्रत्यक्ष दर्शन… एवढ्यासाठी केवढा हा जीवाचा आटापिटा खरंतर एकादशीच्या अगोदर साधारण वीस-पंचवीस दिवस अगोदर पासून त्यांची वारीला निघायची लगीन घाई असल्यासारखी लगबग सुरू असते घरी अडचणी काय कोणाला नसतात हो सकल जनाला आहे कोणाला मोठ्या प्रमाणात कोणाला छोट्या प्रमाणात सर्व अडचणी जेव्हा तो वारकरी घराचा उंबरा ओलांडतो तेव्हा त्या घरातच एका कोनाड्यात कुठेतरी ठेवलेल्या असतात आणि एखादी जरी अडचण जवळ राहिली तरी गावा बाहेरच्या वेशीवर ती अडचण ते असणार गावकीचं पद वेशीला टांगून तो वारीचा मार्ग क्रमण करीत असतो अहो साधं काम नाहीये हे दररोज साधारण 15-20 किलोमीटर पायी चालत संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी धरणीवर अंग टाकल्यावर सर्व काही पायाच्या पिंडऱ्या,पट किती ठणकतात कमरेचा काटा कसा ठस ठस करीत असतो पण विठ्ठल नामाच्या आठवणीत हे सर्व दुःख क्षणात सुख वाटू लागतं आणि तो प्रत्येक वारकरी स्वतःला धन्य मानतो
ही सारी अगतिक ओढ अन दररोजची दिंडीतील पायपिट वारकऱ्याला एक ऊर्जा देत असते ती त्या विठू माऊलीला भेटण्याची त्यासाठी ऊन,वारा, पाऊस काय जेवलो,किती जेवलो काय दुखतं,काय खूपतं याकडे तसं पाहायला गेलं तर कोणाचं लक्ष नसतं एकदा का पंढरपूरच्या शिवंच्या हद्दीत गेल्यावर एखाद्या किलोमीटर वरून विठू मंदिराचा कळस जरी दिसला तरी स्वर्गसुख मानणारा हा आदरणीय वारकरी संप्रदाय बस नुसतं रस्त्याने जाताना मला तर वारकरी दिसला आता तो काही युनिफॉर्म वगैरे नसतोय पण ओळखण्याची खूण म्हणजे गळ्यात तुळशीमाळ,कपाळी केशरी गंध,अष्टगंधाचा टिळा, खांद्यावर भगवी पताका,मुखी हरिनाम बस झालं…हे दिसल्यावर समजायचं माणूस आणि विठोबाराया यांना भक्तिमार्गाने जोडणारा दुवा सापडलाय धन्य धन्य होतोय मनुष्य प्राणी आपोआप माऊली म्हणून
अथवा राम कृष्ण हरी म्हणून त्याच्या पायाला हात लावला जातो बरं अजून एक या संप्रदायात पायाला हात लावून वंदन करायचा रिवाज आहे दोघांनी वयाचे बंधन जुगारून पदस्पर्श करावयाचा हा संकेत आहे
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्ती संप्रदाय वारी करणारा म्हणून वारकरी म्हणतात वारी या शब्दाचा अर्थ नियमित फेरी,व्रत असा होतो हे लक्षात घेतलं तर आपल्या उपास्य देवतेला मग ती कोणतीही असो जो नियमितपणे जातो त्याला वारी संबोधतात काही लोक खेट्या घालणं असंही म्हणतात तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पांडुरंगाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय असाच अर्थ घेतला जातो वारकरी संप्रदायास माळकरी संप्रदाय हे एक पर्यायी नाव आहे प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते धर्मपंथात माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहे पण या संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घालणे म्हणजे एक नवा अध्यात्मिक जन्म घेणे असे मानले जाते
आता बघा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी अगदी साधा असतो या संप्रदायात फड म्हणजे प्रत्येक महंताच्या व वारकरी प्रमुखाच्या भोवती असलेला शिष्यमंडळींचा समुदाय असतो दीक्षा घेऊ इच्छीणाऱ्याला अशा एखाद्या फड प्रमुखांकडून तुळशीच्या 108 मण्यांची माळ घ्यावी लागते दीक्षाची पद्धत अशी ही माळ आणून दीक्षा देणाऱ्याकडे जावयाचे तो ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो आणि प्रतिवर्षी पंढरपूरची वारी करण्याचे वचन दीक्षा घेऊ इच्छीणाऱ्याकडून घेतो वर म्हटल्याप्रमाणे पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे तसेच आळंदीचीही वारी केली पाहिजे संप्रदायाच्या इतर नियमांची आणि आचार धर्माची कल्पनाही दीक्षा घेणाऱ्याला फड प्रमुख देतो तो नियम म्हणजे सत्य बोलावे, परस्त्रीला माते समान मानावे, कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज करावा, मद्यपान वर्ज करावे, रोज हरिपाठ करावा,तसेच राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करावा,प्रपंचातील कर्मे ही श्री विठ्ठल स्मरण करीत पार पाडावीत, हे सर्व नियम पाळायचे कबूल करून ज्ञानेश्वरीवर ठेवलेली माळ तो भक्त उचलतो आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या गजरात गळ्यात घालतो
दीक्षाविधीच्या वेळी गळ्यात घातलेली माळ काही कारणास्तव तुटल्यास ती गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही वारकऱ्यांच्या आचार धर्माचा एक भाग म्हणजे त्यांनी गोपीचंदनाचा उरधव पुंड्र लावून मुद्रा लावल्या पाहिजेत त्याचप्रमाणे द्वादश टिळे ही लावले पाहिजेत वारकरी संप्रदाय नेमका केव्हा उगम पावला हे सांगता येत नाही परंतु संत बहिणाबाईंनी 1628 ते 1700 या शतकामध्ये संत कृपा झाली इमारत फळा आली या आपल्या प्रसिद्ध अभंगात म्हटलेले आहे थोडक्यात विचार करावयाचा झाला तर वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्ती संप्रदाय नाही तर शैव,नाथ,दत्त,सुफी इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले एक केंद्र आहे या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती,सर्व पंथांच्या स्त्री पुरुषांना खुले असते यात उच्च निच,गरीब श्रीमंत असा भेदभाव नाही सर्व जातीच्या भक्तांना सारखेच स्थान आहे या संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातीय व्यवस्थेला धक्का न लावता सर्वांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले बाह्य परिस्थिती ही पूर्वकर्मानुसार प्राप्त होते त्यात असा आपण बदल करू शकत नाही पण भक्ती पंथाच्या साह्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापंचिक दुःखावर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्या मनात निर्माण केला
वारकरी संप्रदायामध्ये व्रतवैकल्याचे स्तोम नाही, कर्मठ पणा नाही,तर त्याग भोग, स्वधर्माचरण व नैष्कर्म याचा मेळ घालायचा उपदेश आहे अद्वैत भक्ती, ज्ञान,उपासना,श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती रात्रंदिवस लोकांमध्ये राहून समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिले व त्यासाठी नाम संकीर्तनासारखे सोपे साधन लोकापुढे ठेवले परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यवहारी कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले आता आपण पाहू वारकरी संप्रदायात प्रवेश करण्यापूर्वी या गोष्टी आचरणात आणणे तितकेच महत्त्वाचे मानले जाते
त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे तुळशीमाळ धारण करावी लागते आता त्यानंतर बुक्का म्हणजे वारकरी उपासनेचे दुसरे साधन पूजेच्या वेळी बुक्का देवाला वाहिला जातो प्रत्येक वारकऱ्यांच्या कपाळावर बुक्का असतो हा दोन प्रकारचा असतो एक तर कोळशाची पूड,चंदनपुड,नागरमोथ्याची पावडर,बकुळ फुल,दवणा, मरवा,इत्यादी वस्तू पासून काळा बुक्का तयार करतात तर कापूर,चंदन, दावणा, नाचणी,देवदार,लवंग, वेलची इत्यादी वस्तू पासून पांढरा बुक्का तयार करतात त्यानंतर वारकरी उपासनेचे तिसरे साधन म्हणजे गोपीचंदन ही एक प्रकारची मुलतानी माती असते त्वचेचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी ती वापरतात ज्या ज्या ठिकाणी बुक्का लावला जातो त्या त्या ठिकाणी गोपीचंदनाचे ठसे उमटवण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे वारकरी संप्रदायाचे चौथे साधन पताका गेरूच्या रंगात बुडवून तयार केलेले जाड्या भरड्या कापडाचे विशिष्ट आकाराचे ते निशाण असते वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत श्री विठ्ठल हे श्रीकृष्णाचे रूप आहे राम कृष्ण हरी हा वारकऱ्यांचा महामंत्र तर पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे
आता इथपर्यंत आलोच आहे तर जरा पंढरपुरामध्ये आपण फेरफटका मारून येऊ तेथील विठ्ठल मंदिरामुळे हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रख्यात आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वारे त्यातील पूर्वेकडील पूर्व द्वाराला नामदेवाचे नाव दरवर्षी आषाढी एकादशीला अनेक भाविक विठ्ठल रुक्माईचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत येतात क्षेत्र महात्म्यामुळे पंढरपूरला दक्षिणकाशी तर विठ्ठलाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणतात हे विठ्ठल मंदिर अवघ्या महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्ती स्थान आहे गोरगरिबांचा, सर्वसामान्यांचा देव म्हणून विठ्ठलाची ओळख आहे पंढरपूरच्या उत्तर दिशेला कैकाडी महाराजांच्या मठात असलेल्या गुंफेत साधुसंतांच्या मूर्ती आहेत आणि भीमा शंकरावर उगम पावलेली भीमा नदी इंद्रायणी,भामा,निरा यांना पोटात घेऊन पंढरपुर जवळ येते रेल्वे पूल ते विष्णुपद या पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये ती अर्धवर्तुळाकार तीन वेळा होते म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले स्कंद पुराणातील महात्म्यानेच चंद्रभागा नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ ( जे मंदिर विठ्ठल मंदिराच्या आधीचे आहे ) होते असे सांगते तर संत जनाबाई भीमा व चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात
एकदा का पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा हे नावाचे कोडे उलगडलेले नाही 1850 च्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते काळाच्या ओघात आता काही राहिलेलं नाही पंचक्रोशीतील जवळच्या नद्या म्हणजे दुर्गादेवी जवळची धारीणी,भुवनेश्वरी जवळची पुष्पावती जी मूळची यमुना कृष्णा बरोबर पंढरपुरात आली, संध्यावळी जवळच्या शिशु माला, भीमा संगम उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा,सती, सुना भृंगारी आणि पंचगंगा यांचा भीमेशी संगम होतो त्यामुळे संत मंडळी पुष्कळदा अभंगामधून भीमा-भिवरा काठी देव असा उल्लेख
……………………… 🌹🌹🌹…………………….
प्रस्तुती… किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी भाजपच्या युवा मोर्चा तालुका अध्यक्ष पदी शुभम शिवाजीराव बंडगर यांची निवड झाली…
कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे,…
करमाळा प्रतिनिधी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप…
करमाळा प्रतिनिधी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून करमाळा तालुक्यातील पत्रकारिता लोकशाहीचा पुरस्कार करणारी असून…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देशभक्त स्वर्गीय नामदेवरावजी जगताप यांची 105…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा पोथरे येथे ज्ञानज्योती फातिमाबी शेख यांची जयंती साजरी करण्यात आली…