अगदी खरयं कोणती पण गोष्ट कुणालाच जमत नाही जमली तरी ती कुणाला पण शोभून दिसत नाही त्याला अंगचंच म्हणजे मूळचेच गुण असावे लागतात म्हणजे ते रक्तात भिनलेलं असावं जसं राजकारण आणि परमार्थ हा रक्तातच भिनलेला असतो कारण ते संस्कार प्रत्येकाच्या मनावर आचार विचारावर असतात घरात आजोबा, वडील, चुलता, आई,काकी,आत्या, जर धार्मिक असतील तर त्या घरातील बारकं पोरगं पण संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावर देवा पुढं उदबत्ती, तुळशीला दिवा, लागल्यानंतर शुभम करोति किंवा हरिपाठ म्हणायसाठी आपोआप देवा पुढं बसतयं
अगदी तसंच दुसरी बाजू म्हणजे राजकारणाची पण आहे घरात खासदारकी, आमदारकी, सोसायटी, बँकेचे चेअरमनपद,असलं सगळं घरामध्ये असल्यानंतर पोरगं कमीत कमी नगरसेवकापासून नाहीतर दूध डेअरी पासून तरी सुरुवात करतयं आणि युवा नेता म्हणून पुढं येतयं अगदी तसंच गुलाबाचं पण आहे फुल आहे छोटसं पण राजेशाही रुबाब तर लई भारी कारण गुलाबासारखे सोपस्कार म्हणजे लाड कोड कौतुक करून घेणारं झाड मी अजून पर्यंत पाहिलं नाही गुलाबाला वाटेल ती जागा चालणार नाही पाणी कमी झालं किंवा जास्त झालं तरी चालत नाही एक तर पाणी जास्त झाल्यावर तर सडन नाहीतर कमी पडल्यावर ते वाळल तरी आणि खत ही वेळच्या वेळी मिळाले पाहिजे मुळं ही मोकळी झाली पाहिजेत हंगाम साधून छाटणी केली पाहिजे किड टिपून मारली पाहिजे एवढं केल्यावर ही राजेश्री पुन्हा एकदा फुलणार गुलाब प्रसन्नपणे फुलू लागला की सगळे श्रम मनुष्य विसरून जातो त्याचे सारे श्रम भरून येतात गुलाबाच्या फुलाची ऐट काय वर्णावी किती त्याचे आकार,किती रंग,किती गंध,त्यांना सीमा नाही मी आयुष्यामध्ये प्रथमच काळा गुलाब पाहिला होता काळसर मखमली पाकळ्यांचे ते फुल म्हणजे एक अजब चीज होती
सायलीची वेल एकदा आळे करून लावली की मग तिच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं तरी चालतंय बाराही महिने ती फुललेली राहते पारिजातक तर कमालीचा निरीच्छक तो कोठेही लावा त्याला पाणी द्या नाहीतर देऊ नका पावसाळी ढग आभाळामध्ये भरून आले की ह्या रांगड्या झाडाला कसला आनंद होतो ते कोणास ना कळे कारण शेवटी गुलाबाला फुलांचा राजा हा राजमुकुट मिळालाय राजेशाही थाटच पहा ना त्याचा गुलाबापासून अत्तर किंवा गुलाबजल करण्याची आपली जुनी परंपरा आहे भारतातले अनेक परिवार अत्तर बनवण्याचे काम करतात एवढेच काय गुलाबाचे नाही तर पहिला पाऊस पडल्यावर जसा मातीचा सुगंध म्हणजे मातकट वास तसं म्हणजे मृदगंधाचं अत्तर तयार केलं जातं कारण काही वर्षांपूर्वी एका माणसाने खास अत्तराविषयी सांगितलं होतं एखाद्या द्रव्याला उष्णता देऊन ते थंड करून त्याला शुद्ध करण्याच्या प्रक्रियेतून अत्तर तयार होतं मान्सूनच्या अगदी पहिल्या पावसाच्या गंधाची झलक काही महक त्या अत्तरामध्ये अनुभवायला मिळते मला फक्त एवढचं माहितीयं सिंथेटिक प्रणालीतून अत्तर तयार होणारी परफ्युम्स परंपरागत अत्तर तेल आधारित परफ्युम या सगळ्यांमध्ये मृदगंधाचं फील येणारं उत्तर शोधून सापडणं कठीण जुन्या दिल्लीमध्ये गुलाबसिंग जोहरीमल या ठिकाणी हे अत्तर मिळतं
हे कुटुंब 200 वर्षापासून अत्तर निर्मितीच्या क्षेत्रात आहे सकाळी दुकान उघडल्यापासून विविध स्तरातील माणसं त्यांच्या दुकानात सुगंधी अत्तरासाठी गर्दी करतात चांगले कपडे लेवून वावरणाऱ्या महिला अंगलं भाषा आणि देहबोली असणारी देशी मंडळी आपल्या प्रेमासाठी अत्तर धुंडाळणारी तरुण मंडळी अशी सगळ्या प्रकारची मंडळी जोहरीमल यांच्या दुकानात येत असतात बावन्नकशी सुगंधाचं घर म्हणजे गुलाबसिंग यांचे दुकान दुकानाच्या परिसरात गेलं तरी आजूबाजूंनी सुगंधाच्या दुनियेत वावरल्यासारखं वाटतंय हजारो वर्षांपूर्वी चालत आलेली डिस्टिलेशन प्रक्रिया एका बंदपेटीत फुलं आणि अन्य इतर साहित्य एकत्र करून त्याच्यावर उकळतं पाणी सोडलं जातं त्यानंतर त्या फुलाचा अर्क साठवून ठेवला जातो डिस्टिलेशन प्रक्रियेसाठी तांब्याची भांडी किंवा बांबू वापरतात देशातील अत्तर निर्मितीचे केंद्र असलेल्या उत्तर प्रदेशातील कनौज येथे तयार होणारी परफ्युम्स विकत घेतली जातात दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या मनगटावर अत्तराचा सुगंध अनुभवायला मिळतो
केवडा नावाच्या अत्तरामध्ये केशराचा गंध असतो उडीसा मध्ये या अत्तराची निर्मिती होते दक्षिणेमध्ये कोईमतुर येथे जाईच्या फुलापासून अत्तर बनवलं जात उन्हाळ्याचे दिवस होते माझ्या मनगटावरच्या त्वचेतून उष्ण वैभवशाली आणि उबदार गंध उमटला उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीवर पावसाचं होणारं पहिलं आक्रमण मी अनुभवलं होतं तो क्षण आणि मातीचा तो ओलसर गंध अवर्णनीय असतो ते निसर्गानं आपल्याला दिलेलं अत्तर असतंय जरा त्यात पण कृत्रिमता नसते हाच गंध अत्तराच्या रूपात भर उन्हाळ्यात अनुभवायला अनेकांना आवडतो खूप आतवर दडलेला सुगंध यात असतो सुगंध जो पावसाची आठवण करून देतो आणि मन मोकळं करतो हे अत्तर कसं तयार केलं जातं प्रदीर्घ श्वास घेऊन मातीचा वास भरून घेताना डोळ्यासमोर ते पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट पाहणारे कामगार मग लाल मातीचा मोठा ढिगारा उपसताना आणि तो ठीग मग तांब्याच्या डेऱ्यामध्ये डेस्टिनेशन साठी रचताना दिसतात तो गंध निर्माण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यामध्ये फुटक्या मडक्याची खापरी त्याची भुकटी विखरून टाकली जाते त्यावर पाणी टाकून आणि तापल्यावर त्या भांड्यातून निघणारी वाफ आणि चंदनाचे तेल याचं मिश्रण केलं जातं
ज्यावेळेस आपण या अत्तराचा गंध टिपतो त्यात चंदन हा गाभा असतो पण मृदगंध भरून राहिलेला असतो तो पहिल्या पावसाचा गंध असतो सुगंधी भाषण सुरू असताना एक जोडपं अवतरलं महिलेने विचारलं रात राणीच्या सुगंधाचं अतर आहे का जुईच्या सुगंधाच्या अंतराचा उल्लेख करीत तिने विचारलं रात राणीच्या सुगंधाचं अत्तर त्याच्याकडे नव्हतं पण आमच्याकडे फिरदोसचं अत्तर आहे असं त्याने सांगितलं व काचेची कुपी काऊंटरवर वर अवतरली महिलेने दुकानदाराच्या हाताकडे पाहिलं अनेक अत्तराच्या वासाने तिचा पण हात सुगंधित झाला होता त्यांनी शेवटी अगदी नैसर्गिक फील देणारा मृदगंध अत्तराची कुपी घेतली हे बघा सण, समारंभ,पार्टी लग्न,नाटक,वाढदिवस,आपण हे अत्तर प्रसंग परत्वे वापरतो अगदी अत्तर म्हणून नाहीतर आफ्टर शेव लोशन आणि शाम्पू म्हणजे सुगंधाची आपल्या आयुष्यात येणारी पहिली पायरी म्हणावी लागेल
भेटवस्तू म्हणून व प्रेमाचे प्रतीक म्हणून अत्तराला पहिली पसंती खाद्य पदार्थांमध्ये सुगंधी द्रव्य म्हणजे इसेन्स वापरतात हा अत्तर शब्द आला कुठून अत्तर हा इत्र म्हणजे हा अरेबिक मूळ शब्द यापासून आला… तर अत्तर म्हणजे एक प्रकारचे सुगंधी तेल मुळातच तो फुलांचा अर्क असतो अशी अत्तरे कृत्रिम असली काय किंवा नैसर्गिक असली काय ही अत्तरे दोन प्रकारची असतात 200 किलो गुलाब पाकळ्या पासून फक्त एक ग्रॅम नैसर्गिक गुलाब तेल मिळते व ते एक ग्रॅम गुलाब तेल हजार लिटर पाण्याला गुलाब जल बनवतं त्यावर पण एक ठराविक प्रक्रिया करावी लागते गुलाब तेलाचा भाव पाहायला गेलं तर 700 ते 800 रुपये लिटर असतो तर नैसर्गिक गुलाब तेल 18000 रुपये लिटर भाव असतो प्रत्येकाचा श्वास हा शरीर आणि मनाला जोडणारा पूल आहे सुगंध हा पुलावरून जाणारा जादूगार आहे त्या प्रचंड उकाड्यात मोगरा, जाई,जुई अशा जादूच्या कांड्या फिरवून शरीराचे आणि मनाचे क्लेश हा कमी करतो कृत्रिम थंडावा निर्माण करतो सूर्योदयाच्या प्रसन्न वेळी प्राजक्ताच्या फुलांच्या मंद सुगंधाने मनाला आणखीनच प्रसन्न करते पौर्णिमेचे टिपूर चांदणे रात राणी,रजनीगंधाच्या सुगंधाने आणखीनच खुलते पहिल्या पावसानंतर मृदगंध हा धुंद करत असतो सूर आणि गंध एकाच जात कुळीचे त्यांची जात म्हणजे सुख वाहक जिचे नाव हवेवर स्वार होऊन येतात आणि काळजात घुसतात पण ही घुसखोरी नाही दुधात साखर विरघळते तसे काळजात विरघळतात जीवनाची गोडी वाढवतात आणि छान वातावरण निर्माण करतात
आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक फुलाचा हा अंगभूत एक स्वभाव असतो चाफा उदार तर मोगरा थंडगार पाण्याची समृद्धी काही व्यक्ती अशा असतात की त्यांचं केवळ अस्तित्व प्रसंगांमध्ये रंग भरते पचोलीचा गंध याच जातीचा तो सुगंध खुलवतो अनेक अत्तरामध्ये त्याचे अस्तित्व असते पण ते कळत नाही सुगंधाचे सुद्धा स्वभाव वेगवेगळे असतात हिरवा चाफा, सोन चाफा,केवडा यांचे उग्र स्वभाव लांबूनच हाय हॅलो केलेले बरे मोगरा अगदी शांत स्वभावाचा हातात बांधा डोक्यात घाला अगदी शांत त्याच्या सुगंधाचा त्रास म्हणून नाही चमेली मात्र मादक किती चावट…बाईच्या केसातील चमेलीचा गजरा जाता जाता दुसऱ्याला मिश्किल पणे खुणावतो व नादी लावतो प्राजक्त साधा सरळ सात्विक स्वभावाचा देव्हाऱ्यात राहायला आवडतं
संगीत आणि सुगंध यांचं एक मजेशीर नातं आहे हिना, मज्मूआ,फिरदोस, म्हणजे बडा ख्याल या अत्तरांचा फाया कानात ठेवला की तासनतास त्याचा सुगंध दरवळत राहतो चमेली रात्र आणि निशिगंध म्हणजे प्रेमगीते गुनगुणत राहावी आणि शांतपणे मजा लुटावी चंदन,उद,धूप,अगरबत्ती, म्हणजे भक्ती गीत भजन धुपाच्या सुगंधात टाळ मृदंगाचा आवाज खूप छान वाटतो फुलांच्या सुगंधाचे वेगळेपण ठरलेले असतात चमेली,मोगरा ही फुलं पहाटे पाचच्या सुमारास जास्त सुगंधित असतात सोन चाफा,प्राजक्त यांची वेळ सूर्योदयाची रातराणी, निशिगंध आणि आंब्याचा मोहर यांचा मादक सुगंध रात्री नऊ नंतर दरवळायला सुरुवात होते कामिनीच्या फुलाचे झाड पंधरा वीस दिवसांनी एकदाच फुलते संपूर्ण झाड टपोऱ्या फुलांनी अगदी भरून जाते रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत सारा आसमंत सुगंधित करते
रात्रीच्या मंद प्रकाशात ही फुलं चमकून उठतात जणू चांदणेचं झाडावर उतरलेले आहेत स्पायडर लिलीचे फुल बरोबर दुपारी चार वाजता उमलते त्याचा मंद वास संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत दरवळतो उद व धुपाचा वास तिन्ही सांजेच्या वेळी छान वाटतो देशी गुलाबाचा सुगंध काही औरच सुगंधाचा बादशहाचं जणू मुघल सम्राट म्हणजे चित्रात तरी नेहमी गुलाबाचे फुल का हुंगत असतात ते ओंजळभर देशी गुलाबाचा वास घेतल्याशिवाय कळणार नाही थंडीच्या दिवसात सूर्योदयापूर्वी माळरानामध्ये किंवा जंगलात गेल्यावर दवाने गच्च भिजलेल्या गवताचा किंवा मातीचा एक मंद वास येत असतो संध्याकाळच्या पक्ष्यांच्या किलबिलाटामध्ये तो कमालीचा आनंददायी वाटतो ऑक्टोबर महिन्यात भाताच्या शेताजवळून संध्याकाळी जात असताना मंद गोडसर वास मनाला सुगंधी चाहूल देतो परंतु असे सुगंध रहित गंध घेण्यास आपले मन शांत व तरल असल्याशिवाय अशा गंधाची मजा लुटता येत नाही
काही वेळेस गोठ्यातील गाई म्हशीचे शेण,मूत्र, आणि कच्च्या दुधाचा वास आवडतो म्हशीचे दूध काढताना चुर चुर आवाज गायीचं मद्र सप्तकातलं ते हंबरणं गाई आंबोण खाताना येणारा आवाज व वास या गोष्टी समृद्धी दाखवणाऱ्या वातावरणात घेऊन जातात तिन्ही सांजेला भूक लागली असताना रस्त्यावरून जाताना मक्याची कणसं भाजल्याचा वास कितीतरी माणसांना आवडतो काही वासाने अनेकांचे डोकी गरगरायला लागतात उदाहरणार्थ फणस किंवा मडक्यात शिजवलेले करपट वासाचे अन्न धुरकट वास कोकणातील सर्व फळांचे वास आंबा,काजू,फणस, व अननस त्यात आंबा थोडा फार अपवाद आहे त्याच्या अढीतील सडलेल्या आंब्याचा तो वास कस्तुरीचा सुगंध हा एक असा आहे की त्याचा खरोखरीच कोणी अनुभव घेतला असेल का याविषयी शंका आहे पण त्याची कीर्ती सुगंध मात्र अनेक वर्ष झालं दरवळतोय
पण एवढं मात्र नक्की तसं बघायला तर अत्तराचं अन माझं खूप जुनं नातं अत्तर मला फार आवडतं पानांचा झाडांच्या मुळाचा अर्क ज्याच्या डोक्यात ही कल्पना आली असेल अत्तर जिथं ठेवलं जातं त्याला कुपी म्हणतात काही वर्षांनी त्यातला कापसाचा बोळा जरी सुकला असला तरी कुपी उघडताचं त्याचा दरवळ सुटत असतो म्हणून माणसांच्या मनाला पण खूपदा विशेषण लावलं जातं मनाच्या कुपीत साठवलेले आनंदाचे हळवे क्षण आपण पुन्हा पुन्हा तितक्याच तीव्रतेने अनेक वर्षानंतर ही जगू शकतो
………………………🌹……………………………
प्रस्तुती……© किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…