आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनोरंजन हे एक त्यावरचं रामबाण औषध आणि आणि तसं बघायला गेलं तर आपल्याला शक्यतो करून हा विषय घेऊन ग्रामीण भागात जावं लागल कारण आपली पडली खेड्याची राहणी आणि या राहणीमानामुळे आपल्याला खेड्यातील मोकळी हवा आणि निसर्गाचं देणं असलेलं हवामान आणि सुख सोयी एवढं असून पण दिवस कसा मावळतोय ते सुद्धा कधी कधी कळत नाही
आता आपण यावेळी विचार करू आपल्या गावात येणाऱ्या पाहुण्यांचं की जे आपली क्षणभर करमणूक करू शकतात आणि काही जण असे असतात की त्यांचे ते पोट भरतात पण आपल्याला ती करमणूक वाटते म्हणून आपण त्यांच्या भवती गर्दी करतो आता काही घटक आहेत ते करमणूक तर करतात आपण देणार असलेल्या देणगीची त्यांना फार अपेक्षा असते उदाहरणार्थ गारुडी… मदारी… नंदी बैलवाले…देऊळ वाले…देवीचे भुत्या… वाघ्या… बहुरूपी…वासुदेव… हे जे बांधव आहेत ते आपली महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवण्याचे मोलाचं कार्य करतात ती कला एका ठराविक उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुसरा घटक म्हणजे काही कारागीर गावातील चावडी जवळच्या पाराच्या आसपास किंवा पारावर ती कला दाखवतात पण त्यातून ते ठराविक दर असलेले पैसे हक्काने घेतात पण ते जे काम करतात त्यांना गावातील सर्वजण लहान-मोठे मोठ्या प्रमाणात गर्दी करून मनोरंजन करून घेतात त्यामध्ये भांड्यांना कल्हई करणारे… स्टोव्ह…छत्री…किंवा बॅटरी रिपेअर करणारे… कुकरची व्यवस्थित देखभाल करणारे… चाकू सुरीला धार लावणारे… तिथेच आपल्या अंगणात बसून गोधडी शिवून देणारे…आपल्या जवळची जुनी ऍल्युमिनियम किंवा पितळेची भांडी घेऊन ती वितळवून त्यापासून देवी देवतांच्या सुंदर मुर्त्या बनवून देणारे….जसे कल्हई वाला….सांगू शकतो 25 रुपयाला एक भांड याप्रमाणे कल्हईचं द्यावं लागतील हा त्याचा हक्क झाला तसं डोंबारी किंवा गारुडी म्हणत नाही एका खेळाचे पंचवीस किंवा पन्नास रुपये पडतील हा तो फरक आहे दोन घटकांच्या मध्ये
आणि आपण शेवटी जे देऊ स्वेच्छेने देऊ ते बिचारे स्वीकारतात नाही दिले तरी त्यांचा काही आग्रह नसतो एवढा मोठा फरक या दोन मनोरंजन करणाऱ्या घटकांमध्ये असतो आणि आपण म्हणतो ही लोककला लोप पावत चाललीयं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे पहिला सुमारे 50 वर्षापूर्वीचा काळ आपण विद्यार्थी दशेत असताना अजून चांगलं आठवतयं आम्ही राहत असलेल्या पोमलवाडी गावामध्ये त्याकाळी फक्त तीन चार रेडीओ होते करमणुकीचं कुठल्याच प्रकारचं साधन नव्हतं अशावेळी हे लोककलेचे उपासक ज्या ज्या वेळी गावात यायचे तेव्हा करमणुकीचं कोणतंही साधन उपलब्ध नव्हतं ते त्यांची कला सादर करायचे लोकं त्यातच समाधान मानायची रेल्वे स्टेशनवर फिरायला गेलं तरी दुपारी साडे बारा एक च्या दरम्यान दौंडहून येणारी पॅसेंजर आणि त्यानंतर दुपारी दोन अडीच वाजता सोलापूरहून येणारी पॅसेंजर एवढ्या दोन तासा पुरतंच हे रेल्वे स्टेशन व त्याचा परिसर जिवंत असल्यासारखं वाटायचं
पण हे आपले लोक कलाकार बांधव एकदा का गावात अवतरले तर त्यांच्याबरोबर आपल्या गावचे 10-15 पोरं पार ते गावाबाहेर जाईपर्यंत त्यांच्याबरोबर असायचे ते जोपर्यंत गावात आहेत तोपर्यंत गावात एक चैतन्य वाटायचं गाव कुठेतरी जिवंत असल्यासारखं वाटायचं पण ही कला खरंच जुन्या पिढीचे कलाकार मनस्वी अगदी हुबेहूब सादर करायचे आणि त्याचं काय झालं आता मनोरंजनाची साधनं म्हणजे रेडिओ…एफ एम… टी व्ही… मोबाईल… टेप रेकॉर्डर…इत्यादी सुविधा झाल्यामुळे या कलेकडे लोकांचं जरा दुर्लक्ष झालयं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे शासनाने या समाजाच्या प्रत्येक घटकाकडे व त्यांच्या कल्याणाकडे लक्ष देणं आवश्यक असतं योजना किंवा प्रकल्प अंमलात आणून त्यांचं पुनरुज्जिवन किंवा कल्याण करणं हे आवश्यक असतं परंतु शासनाची कोणतीही योजना अथवा प्रकल्प अजून यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही आणि त्यामुळे या घटकाकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि आज त्यांच्याकडे पाहिलं तर ते एवढे काही स्वावलंबी नाहीत तरी शासनाने त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे त्यांची लोककला त्याचा विस्तार प्रसार आणि प्रचार करणे समाजाचे दृष्टीने खूप महत्त्वाचे वाटते रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून त्यांची औटघटका करमणूक करणारे खेळ… कसरती…गायन…वादन…नर्तन…आदी प्रकार म्हणजे सामान्यपणे रस्त्यावरील रंजन प्रकार म्हणावा लागेल प्रत्येक समाजाचे रंजन प्रकार वेगवेगळे संगीत… नृत्य…नाटक इत्यादी ललित कला… शारीरिक…कसरती…हिकमती…कसब…कौशल्याचे प्रकार यांच्या रूपाने निर्माण होत असतात
काही रंजन प्रकार अगदी सुसंघटीतपणे विकसित झालेले दिसतात कला आणि क्रीडा अशा मोठ्या वर्गीकरणाखाली यांचा अंतर्भाव होऊ शकतो काही रंजन प्रकार लोकसंस्कृतीच्या काही परंपरातून चालत आलेले असतात हे रंजन प्रकार रस्त्यावर म्हणजे खुल्या वातावरणात केले जातात लोकांनी स्वेच्छेने दिलेल्या पैशावर यांचा उदरनिर्वाह चालत असतो हे या रंजनकारांचे उद्दिष्ट असते परंतु आधुनिक काळात रस्त्यावरील काही नवीनच रंजन प्रकार दिसून येतात उदाहरणार्थ डोळे बांधून मोटरसायकल चालविणे…राजकीय… सामाजिक… प्रचारासाठी केली जाणारी पथनाट्य…परंतु लोक संस्कृतीच्या या उपसकांची ही परंपरा आधुनिक काळामध्ये नष्ट होत चाललीयं पूर्वी खेडेगावी विशेषता: सुगीच्या काळात…जत्रा…उरूस…तसेच ग्रामदेवतेचा एखादा मोठा उत्सव…हे मोठ्या प्रमाणात साजरे व्हायचे अशा ठिकाणी प्रचंड जनसमुदाय जमायचा तिथे नंतर गावोगावी फिरत कोल्हाटी…डोंबारी… व गारुडी… दरवेशी…बहुरूपी…हा घटक रस्त्यावर करमणुकीचे खेळ व कसरती करताना दिसतात
आजही ते खेडोपाडी दिसतात तथापि शहरी भागात त्यांचे प्रमाण कमी होत गेले आता आपण या लोककलेच्या काही घटकांचा जवळून अभ्यास करू कारण आपण त्याचे एक साक्षीदार आहोत डोंबारी रस्त्याच्या कडेला साधारण मोकळी जागा..लोकांच्या रहदारीचा वर्दळीचा रस्ता…सोयीस्कर जागा शोधून… हा खेळ मांडतात डोंबारी हे प्रथमतः आसपासच्या लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ढोलकी वाजवतात तो पर्यंत कुटुंबातील सदस्य फुल्यासारख्या काठीचा आकार असलेल्या साधारण दोन-दोन च्या जोड्या पंधरा-वीस फुटाच्या अंतरावर उभ्या करून त्याला दोर किंवा तार बांधतात दरम्यान त्यांची लहान पोरं कोलांट्या उड्या…हाताची चक्री… यांच्या शारीरिक कसरती दाखवतात… आणखी त्यांची स्त्री लहान बाळाला घेऊन चित्तथरारक कसरती करीत असते
दुसरा घटक म्हणजे गारुडी सापाचे खेळ दाखवणे त्यांच्या उपजीविकेचा भाग यांची गावाबाहेर पालं असतात गावामध्ये मोक्याच्या चार पाच ठिकाणी खेळ केल्यानंतर दुसरं गाव शोधतात डुगडूगी…पुंगी…बासरी…ढोलकं…यासारखी वाद्य वाजवून लोकं गोळा करतात टोपलीतून नाग… साप… अजगर…मुंगूस… इत्यादी काढून त्यांची लढाई दाखवतात हात चलाखीचे नमुने दाखवून मनोरंजन करतात त्यानंतरचा घटक म्हणजे दरवेशी हे अस्वलाचे खेळ दाखवून गावोगावी भटकणे हा यांचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे अस्वलाला माणसाळवून मागच्या दोन पायावर नाचायला लावायचे लोकांची करमणूक करायची अस्वलाच्या केसाची पुडी बांधून गंडे…दोरे…ताईत…करून द्यायचे नंतर मदारी व माकडवाले हे खेळ दाखवतात डुगडूगी…डमरू…ही त्यांची वाद्य असतात माकडांच्या डोक्यावर विदूषकासारखी निमुळती टोपी माकडाचे एक कुटुंब त्यांच्याबरोबर असतं जुन्या कापडापासून त्या माकडांना ड्रेस शिवलेला असतो फार आकर्षक दिसतात त्यानंतर नंदी बैलवाले हे नंदी बैल सजवतात त्यांना घेऊन गावोगावी हिंडतात ढोलक्यापासून गुबू गुबू आवाज काढतात व नंदीबैलाचे नाच दाखवून लोकांची करमणूक करतात नंदीला विचारून आणि विशेष संकेत करून त्याची मान होकारार्थी किंवा नकारार्थी हलविणे भाग पाडतात
त्यानंतरचा घटक म्हणजे रायरंद म्हणजे पावसाळा संपल्यावर उंट घेऊन भटकत असतात बहुरूपीचे विविध सोंगं घेऊन नाना वेश धारण करून लोकांची करमणूक करतात या खेळामध्ये उंटालाही सहभागी करून घेतात संवाद… पुराण कथा…गाणी…इत्यादींचा समावेश यात असतो डफाच्या साथीवर ते गाणे म्हणतात ते बोलण्यामध्ये चतुर व हजरजबाबी असतात आता दुसरा मेहनत व कसरत करणारा कसरत पटू हे आबाल वृद्धाचे लक्ष वेधून घेतात… छोट्या लोखंडी कड्यामधून आपलं शरीर आरपार नेतात… मनगट कोपरा यांच्यामधील भागाने मोठे दगड फोडायचे… डोक्याला दोरी बांधून अजस्त्र दगडाचा एखादा प्रेक्षणीय खडक उचलायचा…गळ्याला भाल्याचं टोक लावून तो भाला जमिनीला टेकून वाकवायचा…त्यानंतर बहुरूपी म्हणजे नानाविध सोंगे धारण करून रस्तोरस्ती…बाजारपेठेत हिंडून लोकांची करमणूक करणारा वर्ग त्या परिसरात प्रचलित व काही प्रमाणात सार्वत्रिक असलेल्या विशिष्ट लोकांचे पोशाख… रंगभूषा करून त्यांच्या चालीरीती… लकवी… बोलीभाषा…व उच्चार धाटणीचे तंतोतंत अनुकरण करून वाहवा व बक्षीसही तसेच पुरस्कार सुद्धा मिळवतात हा घटक वेळोवेळी वेगवेगळी रुपे धारण करून नित्याच्या व्यवहारातील पोलीस… रेल्वेचे टी सी… ठाकूर साहेब…राजे… महाराजे… प्रधानजी… इत्यादी भूमिका व सोंगे हुबेहूब वठवतात
त्यानंतरचा घटक म्हणजे नाच करणारा वर्ग ढोलकी व एक तारा…झांजपेटी…इत्यादी सह हे लोक पारंपारिक गाणे म्हणतात विदर्भातील तुंबडीवाले हे पण याच वर्गात मोडतात ते लखलख लखा असा हातातील घुंगर गोळ्यांचा आवाज करीत गाणे म्हणतात राजस्थानी कटपुतल्यांचा नाच दाखवणारे भाट हा सुद्धा भटक्या लोकरंजनाचा प्रमुख वर्ग आहे त्यानंतर चित्रकथी एक वर्ग आहे चित्रगीत व वाद्य यांच्या साह्याने पौराणिक प्रसंगाचे कथन करणारा हा लोककलेचा एक पारंपरिक घटक आहे सीता हरण… भिल्लीण… राजा हरिश्चंद्र… यांची आख्याने गात असताना चित्रकथी त्यातील प्रसंग मोरपिसाच्या साह्याने प्रेक्षकांना दाखवतो चित्रे लोकशैलीतील असून मोठ्या आकाराची असतात यांच्या स्त्रिया ह्या काशाच्या थाळीवर मेण लावून त्या काडीने ती थाळी वाजवतात आता इतर घटक आपल्या हमेशा दृष्टिपथात येणारी म्हणजे लहान मुलांसाठी मुकचित्रे असलेली सिनेमा ची खोकी घेऊन गर्दी गंमत बघा…ताजमहाल बघा…राजाची राणी बघा…असं ओरडत मुलं गोळा करून त्यांची करमणूक करणारे रस्त्यावर जादूचे प्रयोग करणारी जादूगार मंडळी मोकळ्या रस्त्यावर खडू…कोळसा… रांगोळी…रंग पूड… इत्यादींच्या साह्याने रंगीत चित्रे काढणारे डांबरी रस्त्यावर खरोखर चा खड्डा किंवा उतरत्या पायऱ्या हुबेहूब दाखवणारे क्षणभर रस्त्यावरून जाणाऱ्याला खरोखर थांबून विचारात पाडणारे कलाकार वाळूमध्ये वास्तुशिल्प घडवणारे कारागीर इत्यादींचा समावेश पथरंजन कलाकारांमध्ये करता येईल शिवाय खेडोपाड्यामध्ये सदैव विहार करणारे परंपरेचे उपासक वासुदेव…भुत्ये…पांगुळ… पोतराज… देऊळवाले…कुडमुडे ज्योतिषी… इत्यादी उदबोधना बरोबरच लोक रंजनाचे पण कार्य करतात डोक्यावर मोरपिसाची टोपी हातात टाळ… चिपळ्या आणि बासरी वाजवत दान पावलं म्हणणारे वासुदेव
संध्याकाळी रात्रीच्या पहिल्या प्रहरापूर्वी हातात जळता पोत घेऊन…मळवट भरलेले…तेलकट कपडे अंगावर असलेले… कवड्यांचा पोशाख असलेले… देवीचे भुत्ये…जगदंबेची गाणी म्हणत असलेले दिसतात कानफाटे गोसावी म्हणजे किनरी वाले नाथ जोगी हे कुका नावाचे एकतारी वाद्य वाजवून भर्तहारी…गोपीचंद यांची गाणी म्हणतात ते भविष्य सुद्धा सांगतात भराडी हे नाथपंथी गोसावी असून ते डवूर म्हंजे डमरू वाजवत असतात दीक्षा मागताना ते अल्लख असा पुकारा करतात ते भैरवाच्या… शिवाच्या…स्तवनांची तसेच तांत्रिक उपदेश पर गाणी म्हणतात पांगुळ हा…धर्म जागो ssधर्म जागो ss असे म्हणत सूर्योदयापूर्वी गावात येतो पांगुळ आला पांगुळ आला असा आटापिटा करतो सूर्योदयाच्या आगमनाची वार्ता देतो…भिक्षा दिल्यावर तो चक्राकार फिरून उड्या मारतो आणि देव देवतांना पाऊड म्हणजे दान पोचल्याच गाणं म्हणतो
आता त्यानंतरचा घटक हा मरी आई उपासक तो स्त्री सदृश्य वेश धारण करून…डफ वाजवतात…अंगाला डावीकडे आणि उजवीकडे झोके देत नाचत गावामध्ये प्रवेश करतात…त्यांचे साथीदार सनई वाजवतात मरीआईचा देव्हारा डोक्यावर घेतलेली स्त्री अंगात आल्याप्रमाणे हावभाब करीत असते…हातात मोरपिसाचा कुंचला… देवीच्या आगमनाची वार्ता देताना दार उघड बया दार उघड तोंडाने आरोळी देते… त्यानंतरचा घटक म्हणजे बाळ संतोष याला बाळ छंद पण म्हणतात पहाटेच्या वेळी हा बाळ संतोष बाबा बाळ संतोष असा गजर करीत पहाटे पहाटेच येतो… जीर्ण झालेली वस्त्रे… लहान मुलांचे अंगडे…टोपडे…एवढ्या अल्प स्वल्प दानावर हा समाधान मानतो व संतोष मानतो त्यानंतर वाघ्या मुरळी खंडोबाची गाणी म्हणत वाघ्या मल्हारीची वारी मागत रस्त्यावरून अनेकदा जाताना आपण पाहिलाय जोगती आणि जोगतीन हे यल्लमाचे उपासक डोक्यावर देवीचा जग म्हणजे परडी कपाळी भंडार… विभूती ल्यायलेली जोगतीन देवीची गाणी म्हणत असलेली दिसते… बैलपोळ्याला सजवलेली बैलं…शृंगारलेली हत्ती…गणेशोत्सवातील मिरवणुका…ढोल ताशा पथक…चित्ररथ…आणि शोभा दृश्य… पथनाट्य पण आजच्या औद्योगिक यंत्र युगामध्ये या रस्त्यावर उभे राहण्यास वेळ नसलेल्या समाजाला मात्र हे प्रकार बव्हंशी लुप्त होत चाललेत असे वाटते नव्हं ही खरोखर वास्तव आहे
************🌹🌹🌹🌹🌹**************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…