खरं पाहायला गेलं तर माझा महाराष्ट्र हा विविध परंपरेने संस्कृतीने… वेशभूषेने…खाद्य संस्कृतीने पण…आणि विशेष म्हणजे बोलीभाषांनी…नटलेला आहे खरं पाहायला गेलं तर दर 50 ते 100 किलोमीटरवर महाराष्ट्रामध्ये भाषा बदलते…नाही त्याचा चढउतार बदलतो त्याचप्रमाणे खाण्यातील तिखट…मीठ… याचं प्रमाण सुद्धा ठराविक ठेवले जात नाही सारखं बदलते आणि एक आवर्जून सांगायचं म्हणजे लोक परंपरेने नटलेला महाराष्ट्र अन हे लोककलेचे उपासक प्रत्येक ठिकाणी आपली कला प्रदर्शित करून ती कला जिवंत ठेवायचं काम करतात
आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की साधारण दोन आठवड्यापूर्वी आमच्या भागामध्ये एक वासुदेव सकाळी सात साडे सातच्या दरम्यान हातातील टाळ… चिपळ्या वाजवत फेरी मारत होता तोंडातून अखंड देवाची गाणी म्हणायचं काम चालू होतं पण या कला आणि हे कलाकार यांचा खरा मानपान आपल्या गावात…वाडी वस्तीवरच…व्हायचा आता काय झाले या सिमेंटच्या जंगलात सगळीकडे इमारती दिसतात आणि हा वासुदेवाचा आवाज ऐकल्यावर प्रत्येकाची भावनिक स्वभावानुसार श्रद्धा जागी होती पण यांना मस वासुदेवाला दक्षिणा द्यावीशी वाटते पण नुसतं गॅलरीमध्ये बघून किंवा खाली रस्त्यावर येईपर्यंत हा वासुदेव दुसऱ्या गल्लीमध्ये शिरलेला असतोय आता आपण थोडं त्यांच्याविषयी जाणून घेऊ
वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग… गवळणी गात दान मागणारा लोककलाकार आहे डोक्यावर मोरपिसाची निमुळती टोपी…पाय घोळ अंगरखा… पायात विजार किंवा धोतर…कमरेभोवती शेला वजा उपरणे गुंडाळलेले..एका हातात चिपळ्या…तर दुसऱ्या हातात पितळी टाळ…कमरेला पावा… मंजिरी…अशी वाद्ये… काखेला झोळी… गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा…हातात तांब्याचे कडे…कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे… असा साधारण वासुदेवाचा वेष असतो वासुदेव ही समाज प्रबोधन करणारी संस्था आहे अशा शब्दात वासुदेवाचा गौरव केला जातो वासुदेव आपल्या गीतातून जे तत्त्वज्ञान सांगतात त्यामध्ये दैववाद आहे आपण चांगले काम करीत राहावे आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवाची जबाबदारी ईश्वरावर सोपवावी अशी वासुदेवाची जीवनदृष्टी असते वासुदेवाच्या साह्याने मावळ्याच्या घरी निरोप आणि संदेश पाठवला जायचा तसेच हेरगिरी साठी सुद्धा त्यांचा उपयोग शत्रूच्या गोटातील गुप्त बातम्या मिळवण्याकरता केला जायचा
आपल्या मराठी संस्कृतीमध्ये वासुदेवाची परंपरा सुमारे हजार ते बाराशे वर्षे जुनी असावी कारण काही संत साहित्यामध्ये वासुदेवावरील रूपके आढळतात परंतु एकनाथ महाराजांनी त्याला आणखी प्रकाश झोतात आणले जुन्या काळात मराठी मुलखातील खेडोपाडी येणारी पहाट मोठी प्रसन्न असायची घराघरातून जात्यावरची गाणी म्हणत दळणाऱ्या स्त्रिया व गल्लीगल्लीत खांद्यावर कावड घेऊन आढावरून पाणी आणणारी गडी माणसं आणि त्याच वेळी डोक्यावर उभट मोरपिसाची टोपी असलेला वासुदेव त्याचे ते मोहक रूप गाणं म्हणत नाच करणारा वासुदेव दिसायचा
अंगणामध्ये वासुदेव आला म्हणजे भाग्याची गोष्ट मानली जायची कारण त्या रूपाने भगवान श्रीकृष्ण घरी आल्याचा आनंद व्हायचा बायका सुपातून जोंधळे दान करायच्या पुरुष पैसा देऊन त्याला नमस्कार करायचे वासुदेव पण दान पावलं म्हणत अंगणात नाच करायचा असं सारं अंगण अत्यंतिक समाधानामध्ये न्हाऊन निघायचं वासुदेव हा गावोगावी घरोघरी हिंडून अभंग गवळणी म्हणत हरिनाम बोला हो वासुदेव आला अशी येण्याची चाहूल द्यायचा दिवसाची सुरुवात पवित्र करून द्यायचा तसा वासुदेव आजकाल दुर्मिळ होत चाललाय खेडोपाडी क्वचित दिसतो मात्र शहरातून तो अदृश्य झाला आहे वासुदेव हा सहसा आपणहून पैसे मागत नाही त्याला पैसे दिले की तो बासरी वाजवतो पूर्वी पहाटं पहाटं कृष्ण भक्तीची सुद्धा गाणे ऐकून झोपेतून उठवणारा गुणवान कलाकार आता शहरात पहाटे आला तर लोक हाकलतील म्हणून थोडे उशिरा म्हणजे आठ साडे आठच्या दरम्यान येतो
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे वासुदेव जरी भिक्षेकरी असले तरी ते भिकारी गणले जात नाहीत कारण त्यांना भिक्षा वाढणे हा धर्माचरणाचा भाग मानला जातो पहाटेच्या वेळी राम कृष्णाचा नामघोष करीत ते येतात गृहीणी त्यांना धान्य पैसे देतात हे दानही ते विशिष्ट पद्धतीने स्वीकारतात दान देणाऱ्याला ते त्याच्या वाढ वडिलांचे नाव विचारतात व त्यांची नावे घेऊन महाराष्ट्रातील विविध देवतांना व संतांना ते दान पावलं… दान पावलं…असे एक गाणं म्हणून ते दान पोचतं करतात पंढरपूरचा विठोबाराया…कोंढणपुरची तुक्काबाई…जेजुरीचा खंडोबा…सासवडचा सोपान देव…आळंदीचा ग्यानुबा…देहूचा तुकाराम बाबा…शिंगणापूरचा महादेव…मुंगी पैठणातला नाथ महाराज…अशी विशिष्ट ढब असलेली देवतांची नावे घेऊन वासुदेव दान पावल्याचे सांगतो
दाताही दान देताना आपल्या स्वतःसाठी नव्हे तर पूर्वजांसाठी वाढ वडिलांच्या पुण्यात भर पडावी अशीच त्याची भावना असते दान पावत्यावर वासुदेव बासरी वाजवतो व स्वतःभोवती गिरक्या घेतो एक भिक्षेकरी वर्ग यांना धुकोट असेही एक नाव आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे आढळतात त्यांचे रिती रिवाज मराठ्यासारखे असतात गावोगावी हिंडून भिक्षा मागून हे उदरनिर्वाह चालवतात मुलगा मोठा झाल्यावर त्याला ते दीक्षा देतात
एखादा शुभ दिवस पाहून उपाध्याला घरी बोलावतात उपाध्या मुलाला वासुदेवाचा वेष परिधान करून मंत्रोच्चार करीत विधीपूर्वक त्याच्या कपाळी चंदनाचा टिळा लावतो एवढे झाले की दीक्षाविधी संपतो मग उपाध्याला विडा दक्षिणा देऊन निरोप देतात व सर्व ज्ञाती बांधवासह भोजन करतात वासुदेवाच्या तोंडी एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असायची व तो ओव्या व अभंग सादर करतो वासुदेवाची गाणी खरोखरच ऐकण्यासारखी चांगुणाच्या घरी शंकर आले भोजनाला…सत्वशील माऊली टाळूनी वचनाला… स्वस्थ बसा स्वामी मनी धरुनी धीर…अशा गाण्यामधून देवाधिकांच्या कथा सांगितल्या जायच्या
*****************************************
किरण बेंद्रे
पुणे
7218439002
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…