Sunday, October 18, 2026
Latest:
Uncategorized

श्री कमला भवानी मंदिरात सातव्या माळेला भाविकांची अलोट गर्दी; ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला!

 

करमाळा प्रतिनिधी : करमाळा येथील श्री कमला भवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळेनिमित्त हजारो भाविकांनी आई कमला भवानी देवीचे दर्शन घेतले. पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. आजूबाजूच्या गावांतील आराधी मंडळी देवीचा जागर करत, हलगी व इतर पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवीची विविध भक्तिगीते गात दर्शनासाठी दाखल होत होती. ‘आई राजा उदो उदो, सदा आनंदीचा उदो उदो!’ या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

सातव्या माळेनिमित्त सकाळी आई कमला भवानी देवीला राखाडी रंगाचा भरजरी शालू नेसवून विविध अलंकारांनी सजवून मंदिराचे पुजारी श्री. संदीप पुजारी यांनी देवीची पूजा मांडली. त्यानंतर देवी पंचायत आरती पार पडली. देवीचे मनमोहक रूप पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवानिमित्त श्री राजे रावरंभा तरुण मंडळाच्या वतीने आयोजित अन्नछत्रात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी करमाळा शहरातील विविध गल्लींमधील तरुण मंडळांचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सेवा बजावत होते. भाविकांना व्यवस्थित महाप्रसाद मिळावा, यासाठी तरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने सहकार्य केले. त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी श्रीदेवीचामाळ ग्रामपंचायत आणि श्री राजे रावरंभा तरुण मंडळाच्या वतीने पिण्याचे पाणी स्वच्छता याबाबतची योग्य व्यवस्था करण्यात आली होती मंदिर परिसरात शिस्त राखण्यासाठी तसेच भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी करमाळा पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
नवरात्र उत्सवानिमित्त भरलेल्या यात्रेत खेळणी मिठाई विविध वस्तूंची दुकाने तसेच मनोरंजनाच्या साधनांवर भाविकांची मोठी गर्दी दिसून आली यात्रेतील बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण होते देवीच्या दर्शनासोबत यात्रेचा आनंद घेण्यासाठी लहान मुलांसह कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
सातव्या माळीच्या निमित्ताने मंदिरामध्ये झालेल्या या भक्तांच्या गर्दीमुळे मंदिरामध्ये सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते आई कमला भवानीच्या जयघोषात आणि भक्तांच्या उत्साहात नवरात्राची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!