प्रा. डॉ. महेश निकत यांची शिक्षक दिनानिमित्त ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड
करमाळा प्रतिनिधी: शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, प्रतिकूल परिस्थितीत नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर, उपक्रमशीलता तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचे संस्थापक व संचालक प्रा. डॉ. महेश निकत यांची ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ साठी निवड झाली आहे.
SwiftNLift Media Group यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिक्षणासोबतच समाजाशी असलेल्या जडणघडणीत मोलाचे योगदान, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविलेले विविध उपक्रम आणि नाविन्यपूर्ण अध्यापन कार्याची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.या पुरस्काराचा भव्य सन्मान सोहळा ६ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आला आहे.प्रा. डॉ. महेश निकत यांच्या या निवडीबद्दल ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट परिवार, विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमींमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याला मिळालेली ही राष्ट्रीय स्तरावरील दखल करमाळ्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.


