Wednesday, October 21, 2026
Latest:
Uncategorized

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी; वाहतूक ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

करमाळा, प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या बेमुदत आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ अहिल्यानगर करमाळा-टेंभुर्णी बायपास रोडवरील बायपास चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच विविध शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रियेत नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबतही आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजातील पात्र बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच त्यास वैधता द्यावी, यासह मराठा समाजाच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शासनाचे मंत्री तसेच संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा तीव्र भावना काही आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे व तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
सदर रास्ता रोको आंदोलनात सकल मराठा समाजाच्या समाजबांधवांसह बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनामुळे करमाळा-टेंभुर्णी बायपास रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाने आवश्यक सहकार्य केले. प्रशासनाच्या सहकार्यामुळे आंदोलन शांततेच्या वातावरणात पार पडले.
यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा आणि समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!