गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीला ‘नो एन्ट्री’; आदर्श गणेश मंडळांचा दिमाखात गौरव करमाळा पोलिसांचा गणेशोत्सवासाठी कडक इशारा; सामाजिक उपक्रमांतून उत्सव साजरा करा – आयपीएस अंजना कृष्णा
करमाळा प्रतिनिधी गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरेचा उत्सव म्हणून साजरा होत असताना करमाळा पोलिस प्रशासनाने यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत कडक भूमिका घेतली आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे, डॉल्बी तसेच लेझर लाईटला परवानगी दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी तथा आयपीएस अंजना कृष्णा यांनी दिला आहे. त्याचवेळी विधायक, शिस्तबद्ध आणि सामाजिक भान जपणाऱ्या गणेश मंडळांना प्रोत्साहन देत २०२५ च्या आदर्श गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात पोलिस प्रशासन, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि पोलिस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष अतुल फंड, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा, पोलिस निरीक्षक रणजित माने, नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, सावंत गटाचे नेते सुनील सावंत, वीज वितरण कंपनीचे प्रतिनिधी श्री. राजमाने आदी उपस्थित होते. बैठकीत गणेशोत्सव शांततेत, शिस्तीत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी संदेश देण्याची मोठी संधी गणेश मंडळांना मिळते. त्यामुळे मंडळांनी केवळ सजावट, विद्युत रोषणाई आणि ध्वनिक्षेपकांवर मोठ्या प्रमाणात खर्च न करता आरोग्य शिबिरे, रक्तदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना मदत अशा सामाजिक उपक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन आयपीएस अंजना कृष्णा यांनी केले. गणरायाची भक्ती करताना सामाजिक बांधिलकी जपली गेली तर गणेशोत्सवाचा खरा उद्देश साध्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विसर्जन मिरवणुकीत डीजे व डॉल्बीच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होण्याबरोबरच ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. तसेच लेझर लाईटमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांनी ढोल-ताशा, लेझीम, झांज आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप द्यावा, असे पोलिस प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, करमाळा पोलिसांच्या वतीने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या आदर्श गणेशोत्सव स्पर्धेतील उत्कृष्ट गणेश मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ यावेळी उत्साहात पार पडला. गणेशोत्सवात आकर्षक देखाव्याबरोबरच सामाजिक संदेश, शिस्तबद्ध आयोजन आणि शांततापूर्ण मिरवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. विजेत्या मंडळांना प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
देखावा विभागात छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. लोकमान्य टिळक मित्र मंडळ, किल्ला विभाग यांनी द्वितीय तर अहिल्यादेवी हिंदू खाटीक तरुण मंडळ, खाटीक गल्ली यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर मिरवणूक विभागात लोकमान्य तरुण मित्र मंडळ, फंड गल्ली प्रथम, राजेरावरंभा तरुण मंडळ, श्रीदेवीचामाळ द्वितीय आणि नवजवान सुतार तालीम तरुण मंडळ, सुतार गल्ली यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
या विजेत्या मंडळांची निवड करण्यासाठी पोलिस पाटील संदीप पाटील, प्रा. लक्ष्मण राख, ॲड. अपर्णा पद्माळे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बालदोटा यांचा समावेश असलेली समिती कार्यरत होती. उत्कृष्ट आयोजन, देखावे आणि मिरवणुकीतील शिस्त यांची पाहणी करून मंडळांची निवड करण्यात आली.
करमाळ्यातील सामाजिक सलोख्याची परंपराही या बैठकीत विशेष अधोरेखित झाली. वेताळ पेठ येथील जामा मशिदीच्या विश्वस्तांचा विशेष सन्मान करण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणूक जामा मशिदीजवळून जात असताना मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्याची परंपरा असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा हा आदर्श संदेश असल्याचे पोलिस प्रशासनाने नमूद केले. पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी या परंपरेचे कौतुक करत सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.
गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातून करमाळ्यात देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असल्याने एकदिवसीय गणेशोत्सवातील देखावे रात्री बारा वाजेपर्यंत खुले ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. यावर प्रशासनाकडून नियम व परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली.
गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीचा मार्ग, वेळ, वाहतूक नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर आणि नागरिकांची सुरक्षितता या बाबींवर मंडळांनी पोलिस प्रशासनाशी समन्वय ठेवावा. मिरवणुकीमुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीच्या प्रतिनिधींनाही मिरवणूक मार्गावरील विद्युत सुरक्षेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
एकीकडे नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा देताना दुसरीकडे चांगले काम करणाऱ्या गणेश मंडळांचा बक्षीस देऊन गौरव करण्याची भूमिका करमाळा पोलिस प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा केवळ जल्लोषाचा नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, शिस्त, पर्यावरणपूरकता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा उत्सव ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ‘डीजेचा दणदणाट नको, भक्तीचा गजर हवा; नियमांचा भंग नको, सामाजिक बांधिलकी हवी’, असा संदेश या बैठकीतून करमाळ्यातील गणेश मंडळांना देण्यात आला आहे.


