Thursday, October 29, 2026
Latest:
Uncategorized

लोकशाही बचाव अराजकता हटाव सोलापूरच्या भाजप मोर्चाच्या नियोजनासाठी भाजप जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत करमाळ्यात १ नोव्हेंबरला बैठक- सचिन पिसाळ

करमाळा प्रतिनिधी
काँग्रेस इंडी आघाडी आणि डाव्या पक्षांकडून भारतीय जनता पक्षाविरोधात खोटा प्रचार करून पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकशाही बचाव, अराजकता हटाव’ हा उद्देश समोर ठेवून भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी २४४ करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील तीनही मंडलांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता भाजप कार्यालय, विद्यानगर, करमाळा येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती भाजप ग्रामीण मंडलाध्यक्ष सचिन पिसाळ यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना सचिन पिसाळ म्हणाले की, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. काँग्रेस, इंडिया आघाडी आणि डाव्या पक्षांकडून विविध आंदोलनांच्या माध्यमातून भाजपविरोधात चुकीचे कथानक मांडून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भूमिका भाजपने मांडली आहे.
निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेवरून आक्षेप घेणे आणि तरुणांमध्ये संभ्रम निर्माण करणे, असे आरोपही भाजपकडून करण्यात आले आहेत. संविधानाचे रक्षण, लोकशाही मूल्यांचे जतन आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम ठेवण्याच्या मुद्द्यांवर भाजप आपली भूमिका जनतेसमोर मांडणार असल्याचे पिसाळ यांनी सांगितले.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोपांना आणि प्रचाराला उत्तर देण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी सोलापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग निश्चित करण्यासाठी तसेच मोर्चाच्या यशस्वी नियोजनासाठी करमाळ्यातील बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत मोर्चासाठी कार्यकर्त्यांची उपस्थिती, विविध मंडलांमधील समन्वय, नियोजन आणि सहभागाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीनही मंडलांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित जबाबदार व्यक्तींनी रविवारी सकाळी १० वाजता भाजप कार्यालय, विद्यानगर, करमाळा येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सचिन पिसाळ यांनी केले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!