संघर्षावर मात करत मेघा कांबळे यांची शिक्षिका म्हणून भरारी पवित्र पोर्टलद्वारे जामखेडच्या ल.ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात नियुक्ती; करमाळ्यातून अभिनंदनाचा वर्षाव
करमाळा प्रतिनिधी : प्रतिकूल परिस्थिती, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, याचा प्रत्यय करमाळा येथील मेघा अनिल कांबळे यांच्या यशस्वी वाटचालीतून आला आहे. पवित्र पोर्टलद्वारे त्यांची जामखेड येथील ल.ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशामुळे करमाळा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मेघा कांबळे यांनी करमाळा येथेच बी.ए. आणि डी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा प्रवास सुरू असताना त्यांना अनेक संघर्षमय प्रसंगांना सामोरे जावे लागले. मात्र, परिस्थितीपुढे हार न मानता जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले शैक्षणिक ध्येय पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची कास न सोडता त्यांनी मिळवलेले यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी करमाळा येथील नोबेल इंग्लिश मेडियम स्कूल व त्यानंतर भाऊसाहेब झाडबुके विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केले आहे. या काळात त्यांनी केवळ अध्यापनाचे काम न करता अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या घडविण्यात मोलाचे योगदान दिले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. अध्यापनातील आवड, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि कामाप्रती असणारी निष्ठा यामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
दरम्यान, पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत त्यांनी यश मिळविले असून जामखेड येथील ल.ना. होशिंग उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांची शिक्षिका म्हणून नियुक्ती झाली आहे. करमाळ्यात शिक्षण घेऊन याच परिसरात विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करणाऱ्या मेघा कांबळे यांनी आता जामखेड येथे शिक्षणसेवेची नवी जबाबदारी स्वीकारली आहे.
संघर्षातून उभे राहिलेले यश, शिक्षणाप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थ्यांना घडविण्याची तळमळ या गुणांच्या बळावर त्यांनी मिळविलेली ही संधी त्यांच्या मेहनतीचे फलित आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवृंद आणि करमाळा शहरातील नागरिकांकडून अभिनंदन केले जात असून पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.


