Friday, April 25, 2025
Latest:
Uncategorized

आमदार संजयमामांची आणखी एक उत्कृष्ट कामगिरी करमाळ्याच्या किल्ल्यासाठी दोन कोटी मंजूर

आमदार संजयमामांच्या विकासकामांचा वेग,सकारात्मक दृष्टिकोन,प्रपोगंडा न करता विकासाची व सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याची अभ्यासपुर्ण हातोटी आदींविषयी आता प्रस्तुत लेखात लिहिण्याची गरज नाहीय, कारण गेल्या चार-सव्वाचार वर्षांमध्ये आदर्श व जागृत,लोकाभिमुख,कार्यक्षम आणि अखंड तत्पर लोकप्रतिनिधी कसा असावा…असतो याचा आदर्श वस्तुपाठ मामांनी आपल्या कार्यकर्तृत्वातून या तालुक्यातील जनतेला दाखवून,घालून-दाखवून दिलेला आहे.१९८५ पर्यंत या तालुक्याचं,जिल्ह्याचं नेतृत्व आणि तालुक्याचं लोकप्रतिनिधीत्व कै.नामदेवरावजींकडे होते.अर्थात तो काळ,त्यावेळचं राजकारण,सामान्य जनतेच्या निष्ठा,सामाजिक पातळीवर जपली जाणारी नीतिमत्ता,नैतिकता,ध्येयवाद,दिल्या शब्दाला आणि खाल्ल्या अन्नाला जागण्याची बऱ्यापैकी शाबूत असलेली सामाजिक वृत्ती अशा अनेक बाबी आता कालबाह्य, इतिहासजमा झालेल्या आहेत.नामदेवरावांनंतर बदलत्या काळाच्या,बदलणाऱ्या पिढीच्या-समाजाच्या मानसिकतेचा,अपेक्षांचा अचूक अभ्यास करून काळाचा अचूक अंदाज घेऊन मतदारांनी टाकलेल्या विश्वासाशी बांधीलकी मानून व्रतस्थपणे(इथं व्रतस्थ हा शब्द महत्वाचा)अहर्निश कार्यरत राहणारा,सर्वांगीण विकासाचं ध्यासपर्व घेतलेला आमदार या तालुक्याला जवळपास चाळीस वर्षांनी मामांच्या रूपाने मिळालेला आहे हे वास्तव आहे.
तर या लेखनाचा मूळ मुद्दा आहे तो मामांनी राजे रावरंभा जानोजी निंबाळकर (रावरंभा ही वंशपरंपरागत पदवी होती) यांना करमाळ्याची जहागिरी मिळाल्यानंतर त्यांच्या काळात १७२७-२८ च्या दरम्यान सुरू झालेले कमलाभवानी मंदिर व भुईकोट किल्ल्याचे बांधकाम, उभारणी ही त्यांचे पुत्र रंभाजी यांचे काळात पूर्ण झाले,या मंदिराला पर्यटन खात्याकडून चार कोटी रुपये आणि किल्ल्याच्या जतन-संवर्धनासाठी दोन कोटी रुपये मिळवून दिले हा ! यापूर्वीच्या कुठल्याही आमदारांना ही सुबुद्धी सुचली नव्हती हे महत्वाचे.निंबाळकरांच्या जहागिरीची त्यांनी करमाळा ही राजधानी केली,या जहागिरीमध्ये माढा,परंडा,भूम,तुळजापूर आदी परगण्यांचा समावेश होता. त्यामुळे तुळजाभवानी भक्त असलेल्या जानोजीनी करमाळ्याप्रमाणेच माढ्यात माढेश्वरी मंदिर, छोटासा गढीवजा किल्ला,रोपळे येथे गढीवजा वाडा आदी बांधकामे केली.त्यामुळे कमलाभवानी,माढेश्वरी ही तुळजाभवानीची प्रतिरुपे मानली जातात.
पैकी करमाळा ही राजधानी असल्यामुळे येथील किल्ल्यात रावरंभाकाळापासून लोकवस्ती होती,जुन्या कोर्टाच्या आवारात आधी रावरंभांचा राजवाडा होता,त्याचा पूर्वेकडील वेसवजा दरवाजा व अन्य काही भग्नावशेष अजून शिल्लक आहेत.त्याच्या पूर्वेकडील एका बुरुजात आजही तत्कालीन तालमीचे अवशेष शिल्लक आहेत.पूर्वी राजवाड्याच्या मुख्य पूर्वेकडील दरवाजासमोर खुले मैदान व त्यापुढे कारंजे नावाची विहीर/बारव हे राजघराण्यातील व्यक्तींचे स्नानगृह (स्विमिंग टॅंक) होते.या कारंज्यात उतरण्यासाठी रुंद दगडी पायऱ्या आणि खाली पाण्याच्या पातळीसम पश्चिम व उत्तर बाजूस ओवरीवजा खोल्या,ज्याचा वापर प्रसाधनगृह म्हणून केला जात असे हे सगळं बांधकाम आजही मजबूत पण दुर्लक्षित अवस्थेत शाबूत आहे.
आता मुद्दा महत्वाचा हा आहे तो म्हणजे गेल्या साठ-सत्तर वर्षांमध्ये करमाळा पालिकेच्या प्रशासन व लोकनियुक्त प्रतिनिधींनी अज्ञान,बिनडोकपणा व तात्कालिक स्वार्थ या पायी हा मौल्यवान ऐतिहासिक ठेवा जपण्याऐवजी किल्ल्याचा तसेच शहर परिसरातील इतिहासकालीन वास्तू,अवशेष यांचा वेळोवेळी विध्वंस केल्यामुळे आजमितीला बरेच ऐतिहासिक अवशेष नामशेष झालेले आहेत. त्याचे काही तपशील इथे देणे गरजेचे आहे.अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे आमच्या लहानपणीच्या काळात साधारणतः पन्नास वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पूर्व वेशीच्या उजव्या बाजूपासून तो सध्याच्या पालिकेच्या दक्षिण बाजूकडील बुरुजाच्या बाहेरील बाजूस असलेल्या खंदकात दरवर्षी पावसाळ्यात काठोकाठ पाणी असायचे,या खंदकाला कडेने फूट-दीड फूट कठडे होते.पावसाळ्यात हा खंदक काठोकाठ भरून वाहिला की परिसरातील आड-विहिरी तुडुंब भरायच्या.मला आठवतंय माझ्या लहानपणी किल्ल्यातल्या बहुसंख्य वाड्यांमध्ये आड आणि त्यावर पाणी शेंदण्यासाठी रहाट व पोहरे होते.हा खंदक बुजवून पालिकेने तीस-चाळीस वर्षांपूर्वी या जागेवर गाळे,संडास,भकास बगीचा असले भुक्कड प्रकार करून ठेवले आहेत.
पालिकेच्या तत्कालीन दवाखान्याची जुनी इमारत व त्यातील छोटासा अष्टकोनी हॉल ही रावरंभा यांची खाजगी नृत्यशाळा होती,चुन्यामध्ये बांधकाम असलेली ही ऐतिहासिक इमारत पालिकेने सुमारे तीस वर्षांपूर्वी गुपचूप पाडून टाकली.भवानी नाक्यावरील चौकाच्या डाव्या कोपऱ्यात असलेली ९६ पायऱ्याच्या विहिरीची प्रतिकृती असलेली पुरातन विहीर पालिकेने याच पद्धतीने नष्ट केली.किल्ल्यातील वर उल्लेखलेल्या कारंज्याच्या पूर्वेकडील दर्शनी भागातील मोकळ्या जागेत काही वर्षांपूर्वी एक सभागृह बांधून या बारवाकडे जाण्याची वाट पालिकेने बंद करून ही वास्तू आणखीनच दुर्लक्षित केली आहे.
याच पद्धतीने पालिकेने इंग्रजी अमदानीतल्या काही ऐतिहासिक वास्तू,बांधकामे नष्ट करून शहराच्या विद्रुपीकरणात भर घातली आहे.इंग्रज आमदानीत करमाळा पालिकेची स्थापना १ मे १८६७ ला झाली.त्याकाळी किल्ल्यात व किल्ल्याबाहेरील लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी गावाच्या नैऋत्य दक्षिण बाजूस बांधलेली प्रचंड घेर असलेली, एकाच विहिरीत सात विहिरी (खड्डे) असलेली पूर्ण वीट बांधकामाचा कठडा असलेली ही विहीर आज अत्यंत दुर्लक्षित,पडझड झालेल्या अवस्थेत अजून तग धरून आहे.चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत ही विहीर व परिसर शहरवासीयांचे सहलीचे ठिकाण होते.या विहिरीतून त्याकाळी अंडरग्राउंड चिनी मातीच्या पाईपलाईनमधून सायफन पद्धतीने शहरात वेताळपेठेतील राममंदिरासमोर(आता तिथं बांधलेली नादुरुस्त टाकी आहे),सरकारी दवाखान्यासमोर(सद्या त्या जागेवर महाराणा प्रताप पुतळा आहे),दत्त पेठेत दत्त मंदिरासमोरील माळहाटीत(आता तिथं शॉपिंग सेंटर आहे) आणि सध्याच्या पालिकेसमोर बांधलेल्या दगडी चौकोनी हौदांमध्ये पाणी सुटायचे आणि शहरवासीय स्त्रिया ते पाणी आपापल्या पोहऱ्यानी शेंदून भरायच्या.
वेताळपेठेतील शाळा नंबर १ ही शाळा व तिची इमारत ही सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीची दगडी,कौलारू बांधकाम असलेली भव्य-पुरातन अशी होती.२००८-०९ च्या दरम्यान शाळा इमारत बांधणीसाठी आलेला निधी खर्ची टाकण्यासाठी पालिकेने बिनडोकपणे ही इमारत पाडून तिथे नवीन इमारत बांधली.त्याऐवजी जर त्या पुरातन इमारतीची डागडुजी करून जतन केले असते तर तो एक अनमोल पुरातन ठेवा ठरला असता.
१९४९ साली स्थापन झालेल्या करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित येथील महात्मा गांधी विद्यालयाची इमारत१९५६-५७ दरम्यान पालिकेमार्फत बांधण्यात आली.त्यावेळी या संस्थेचे संस्थापक हेच पालिकेचे नगराध्यक्ष होते,त्यामुळे विद्यालयाची इमारत बांधताना किल्ल्याच्या बुरुजांचे दगड,माती उकरून वापरण्यात आली.किल्ल्यातील अनेक घरे ही त्या-त्या काळी बुरुजांचे दगड,माती वापरून करण्यात आलेली आहेत.अशा रीतीने या पुरातन किल्ल्याचे जतन संवर्धन होण्याऐवजी पालिकेच्या कृपेने तसेच अक्षम्य दुर्लक्ष्यामुळे आणि रहिवासियांच्या संधीसाधुपणामुळे आजतागायत विल्हेवाटच लागणे सुरू आहे.किल्ल्याच्या दर्शनी दोन वेशी व काही बुरुज सोडले तर जवळपास सर्वच बुरुज,तटबंदी ढासळलेल्या धोकादायक अवस्थेत आहे,किल्ल्याच्या अंतर्गत भागातील मोकळ्या जागांवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत.रावरंभा काळापासून या किल्ल्यात लोकवस्ती असल्याने पुढील काळात,बहुदा पालिकेच्या स्थापनेनंतर कधीतरी किल्लावेशीतून बुरुजाच्या आतील भागाच्या कडेने सध्या असलेल्या पालिका कार्यालयासमोरून गांधी विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची निर्मिती ही दक्षिणेकडील बुरुज पाडून-तोडून करण्यात आलेली आहे.याच पद्धतीने किल्ल्यातील राम मंदिराच्या समोरील किल्ल्याबाहेर दक्षिणेकडे जाणाऱ्या रस्त्याची निर्मिती ही तेथील तटबंदी पाडून झालेली आहे.किल्ल्याच्या पश्चिम बाजूस धोबी वेस नावाने ओळखली जाणारी छोटी वेस व किल्ल्याच्या बाहेर पश्चिम व उत्तर बाजूस दगडी बांधकाम असलेले धोबी घाट अजूनही मजबूत व दुर्लक्षित अवस्थेत आहेत.गेल्या तीस-चाळीस वर्षांपूर्वीपर्यंत या धोबी घाटाचा व धोबी वेशीचा वापर सुरु होता.
सध्या मात्र पालिकेने या वेशीच्या आतील बाजूस केलेल्या काँक्रेट रस्त्यामुळे तसेच बाहेरील बाजूस असलेली घाण-राडारोडा यामुळे ही वेस बंद अवस्थेत आहे.असाच किल्ल्याच्या बुरुजाला भगदाड पाडून रस्ता करण्याचा प्रकार किल्ल्यातील ब्रम्हदेव मंदिराच्या शेजारून करण्यात आलेला आहे.ब्रम्हदेवाचे हे मंदिर देखील दुर्लक्षित,भग्न स्थितीत आहे. पालिकेने पूर्वीपासून केलेले अक्षम्य दुर्लक्ष,हलगर्जीपणा आदींमुळें सध्या हा किल्ला भग्न व भग्न व धोकादायक अवस्थेत अवस्थेत अवशेष रूपाने उभा आहे. किल्ल्यातील पालिकेची जुनी इमारतदेखील सध्या जीर्ण अवस्थेत पण उभी आहे,या इमारतीत गणेश मंदिर आहे.ही इमारत तत्कालीन बांधकाम शैलीतील असून बरेचसे लाकडी व सुबक बांधकाम असलेली ही वास्तू हेरिटेज म्हणून तिचे जतन होणे गरजेचे आहे.
या एकंदर पाश्र्वभूमीवर या किल्ल्याच्या जतन,संवर्धनासाठी आमदार संजयमामा शिंदे यांनी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत पण हा निधी सार्थकी लागण्यासाठी हा निधी वेगळ्या यंत्रणेकडे सुपूर्द करून हे काम दर्जेदार पध्दतीने व्हायला हवे. कारण पालिकेला आजवर वेगवेगळ्या विकासकामांसाठी मिळालेला करोडो रुपयांचा निधी अपवाद वगळता शब्दशः मातीमोल झालेला आहे कारण रुपयातले जवळपास पन्नास पैसे हे संबंधितांच्या “विकासासाठीच”
खर्ची पडतात हे येथील भ्रष्टाचाराचे सर्वश्रुत गुपित आहे.
तसेच या किल्ल्याचे जतन,संवर्धन टिकाऊ पद्धतीने होण्यासाठी हा किल्ला तसेच रावरंभाकालीन असलेले श्री कमलाभवानीचे अतिभव्य,सुबक,विविध बांधकाम शैलीत बांधण्यात आलेले मंदिर या दोन्ही वास्तू पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित होणे गरजेचे आहे. किल्ला जतन,संवर्धनासाठी आणखी खूप निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. पुढील काळात मामांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत अशी सार्वत्रिक अपेक्षा व मागणी असल्याचे दिसून येते.
-*विवेक शं.येवले,करमाळा*
दि.०९/०२/२०२३

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group